डॉ. भीमराव रामजी आंबेडकर

    02-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
 
विरोधकांना कशाकशात राजकारणाचा वास येईल, याचा नेम नाही. भारतीय जनता पार्टीने घेतलेल्या कोणत्याही निर्णयाला, मग तो योग्य असेल, संविधानसंमत असेल, जनहितार्थ असेल तरीही विरोध करायचाच, असा एकमेव कार्यक्रम सर्व विरोधक राबवीत आहेत. त्यांना मोदी या नावाचा असाध्य असा ‘फोबिया’ झाला आहे. मानसिक स्वास्थ्यही त्यांचे बिघडले आहे. त्याला कोण काय करणार? उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी असाच एक निर्णय घेतला- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव शासकीय कामकाजात लिहिण्याचा. आता उत्तरप्रदेशात डॉ. आंबेडकरांचे नाव ‘डॉ. भीमराव रामजी आंबेडकर’ असेच लिहिले जाईल, असा हा निर्णय. अपेक्षेप्रमाणे विरोधकांनी गहजब केलाच. आतापर्यंत ‘आंबेडकर’ असा उच्चार करण्याऐवजी चक्क ‘अंबेडकर’ असा उल्लेख अखिलेश, मायावती करायच्या, तेव्हा या लोकांना आपण चुकीचा उच्चार करीत आहोत, याचा साक्षात्कार झाला नाही. कारण, यांना आंबेडकरांचा इतिहासच माहीत नाही आणि तो त्यांना जाणून घ्यायचाही नाही.
 
डाव्यांनी तर जन्मभर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अखेरपर्यंत द्वेषच केला. त्यामुळे काँग्रेसचे राज्य असूनसुद्धा पाठ्यक्रम ठरविणाऱ्या शीर्षस्थ संस्थांवर डाव्यांचाच बोलबाला असल्यामुळे त्यांनीही कोणत्याच अभ्यासक्रमात डॉ. आंबेडकरांचा इतिहास लिहिला नाही, हा इतिहास आहे. त्यांना फक्त नक्षल चळवळीसाठी डॉ. आंबेडकरांचे अनुयायी हवे आहेत. भाजपाने मात्र डॉ. आंबेडकरांच्या विशाल कार्याचा अभ्यास करून त्यांचे कार्य केवढे महासागराएवढे आहे, हे आपल्या कृतीतून दाखवून दिले. म्हणूनच योगींनी डॉ. आंबेडकरांच्या नावासोबत त्यांचे पिताश्री रामजी यांचे नाव जोडल्याने यांचा तिळपापड झाला. प्रत्येक गोष्टीला राजकारणाच्या चष्म्यातून पाहणाऱ्या विरोधकांचा पोटशूळ उठला नसता तरच नवल. डॉ. आंबेडकरांचे पूर्ण नाव लिहिण्याने म्हणे भाजपाला आता बाबासाहेबांच्या पूर्ण नावाच्या आडोशाने राजकारण करायचे आहे, अशी टीका समाजवादी पक्ष, बहुजन समाजवादी पक्ष, काँग्रेस आणि अन्य पक्षांनी सुरू केली आहे. बहेन मायावती यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, त्यांचा डॉ. आंबेडकरांबाबतचा कळवळा हा बेगडी आहे आणि केवळ स्वस्त लोकप्रियतेसाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे; तर अखिलेश यादव यांना यामागे व्होट बँक पॉलिटिक्स दिसत आहे. त्यांनी तर पुढे असाही सल्ला दिला की, आंबेडकरांच्या नावात बदल करण्याऐवजी त्यांनी सांगितलेल्या मार्गाचा अवलंब करा. जदयुचे बिहारचे आमदार श्याम रजक यांना यात मनुवादाचा वास आला आहे. समाजवादी पक्षाचे व मायावतींचे उत्तरप्रदेशात सरकार असताना, दलितांवर कधी नव्हे इतका अनन्वित अत्याचार करण्यात आला, याची सरकारी दप्तरी नोंद आहे. आता बहेन मायावतीच्या कार्यकाळाचा आढावा घेऊ.
 
मायावती या स्वत:ला दलित की बेटी म्हणवतात. पण, त्यांच्याही काळात तर दलितांवरील अत्याचाराने परिसीमा गाठली होती. दलितांच्या घरादारांवर बसपाच्या कार्यकत्र्यांनी कब्जा केला. अनेक दलितांच्या हत्या झाल्या. तेव्हा त्यांना बाबासाहेबांची ही लेकरे आहेत, याची आठवण झाली नाही. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीवर साधी नजर टाकली, तरी अखिलेश आणि मायावती यांच्या कार्यकाळात उत्तरप्रदेशात दलितांवर किती अनन्वित अत्याचार करण्यात आले, याचे पुरावेच आहेत. अखिलेश आणि मायावती यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास वाचला असता, तर त्यांनी आंबेडकरांच्या पूर्ण नावाला कधीच विरोध केला नसता. डॉ. आंबेडकर आपली स्वाक्षरी करताना, बी. आर. आंबेडकर अशीच करायचे. यात आर हा शब्द त्यांच्या वडिलांचा म्हणजे रामजी यांच्या नावाचे लघुरूप आहे. राज्यघटना मंजूर झाल्यानंतर शेवटी सर्व सदस्यांनी ज्या स्वाक्षऱ्या केल्या, त्यातही बी. आर. आंबेडकर असाच उल्लेख आहे. बाबासाहेबांनी कधीही भीमराव आंबेडकर अशी स्वाक्षरी केलेली नाही. बाबासाहेबांचे वडील रामजी हे आध्यात्मिक प्रवृत्तीचे होते. संतवाङ्मयाचा त्यांना लळा होता. संत कबीर यांच्या वचनांचा त्यांच्यावर विशेष प्रभाव होता. ते लष्करात सुभेदार पदावर होते. त्यामुळे संतवाङ्मयाचा प्रभाव डॉ. आंबेडकरांवरही होता. त्यांनी जेव्हा प्रथमच ‘मूकनायक पाक्षिकऱ्या काढले, त्यावर मथळ्याखाली ठळक अक्षरांत- ‘काय करूं आता धरूनिया भीड। नि:शंक हे तोंड वाजविले।। नव्हे जगी कोणी मुकियांचा जाण। सार्थक लाजून नव्हे हित।।’ हे अभंग आहेत. ‘बहिष्कृत भारत’च्याही पहिल्या पानावर मथळ्याखाली संत ज्ञानेश्वरांच्या ‘आता कोदंड घेऊनि हाती...’ या ओव्या आहेत. महात्मा तथागत गौतम बुद्ध, जोतिबा फुले आणि संत कबीर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरू होते, हे तरी अखिलेश आणि मायावतींना माहीत आहे काय? काँग्रेसबद्दल तर बोलायलाच नको!
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आजन्म दुस्वास करणाऱ्या काँग्रेसला, आंबेडकरांचे नाव घेण्याचाही अधिकार नाही. आंबेडकरांना ‘भारतरत्न’ देण्यासाठी विरोध का केला होता, हे आधी काँग्रेसने सांगावे. चैत्यभूमीचा साधा विकास, डॉ. आंबेडकरांचे २६, अलीपूर येथील निवासस्थानाला स्मारक बनविण्यासाठी यांनी काहीही प्रयत्न केले नाहीत. भाजपाचे सरकार आल्यावर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा खऱ्या अर्थाने आदर केला आणि त्यांचे प्रत्येक महत्त्वाचे ठिकाण ताब्यात घेऊन तेथे स्मारक तयार केले. कोणत्या तोंडाने डॉ. आंबेडकरांच्या पूर्ण नावाला विरोधक आक्षेप घेत आहेत? योगी आदित्यनाथ यांनी काही आपल्या मनाने हा निर्णय घेतलेला नाही. त्यासाठी त्यांनी संविधानातील दस्तावेजांचा सबळ आधार दिलेला आहे. भारताच्या संविधानातील आठव्या अनुसूचीत (अनुच्छेद ३४४(१) आणि ३५१ यात भारतीय भाषांमध्ये डॉ. आंबेडकरांचा उल्लेख ‘डॉ. भीमराव रामजी आंबेडकर’ असे पूर्ण नाव अंकित आहे. अनेक राज्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले असेल, पण योगी आदित्यनाथ यांनी मात्र संविधानातील या अनुच्छेदांचा आधार देत हा नावबदलाचा निर्णय घेतला आहे; हे तरी अखिलेश आणि मायावतींना ठाऊक आहे की नाही, हे त्यांनाच माहीत! योगी आदित्यनाथ यांनी अतिशय योग्य निर्णय घेऊन डॉ. आंबेडकरांचा सन्मान केला आहे. त्यासाठी त्यांचे अभिनंदनच केले पाहिजे!