नाशिकच्या धर्म समाजकारणाचे वैभव

    दिनांक  18-Apr-2018

कुर्तकोटी शंकराचार्य न्यास

 
  

 
 
श्री बालाजी मंदिराची स्थापना
 
१९१८ पासून करवीरपीठाकडे असलेल्या डॉ. कुर्तकोटींच्या पंचधातूच्या तीन मूर्ती (बालाजी, अंबामाता, पद्मावती) न्यासास ३ मार्च २००१ मध्ये पूजेसाठी प्राप्त झाल्या. त्यावेळी शंकराचार्यांचे कुलदैवत श्री बालाजी असल्याचे लक्षात आले. त्यामुळे न्यासातर्फे श्री बालाजी मंदिर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. २ मे २००३ रोजी गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर रा. स्व. संघाचे ज्येष्ठ प्रचारक मोरोपंत पिंगळे व विश्व हिंदू परिषदेचे दादा वेदक यांच्या हस्ते गंगापूर येथील न्यासाच्या जागेत श्री बालाजी मंदिराचे भूमिपूजन. झाले. त्यानंतर अक्षय्य तृतीयेस (दि.३० एप्रिल २००६ रोजी) तिरुपती देवस्थानांकडून प्राप्त झालेल्या ७-३, उंचीच्या, बालाजीच्या भव्य व सुंदर पाषाण मूर्तीचे नाशिकामध्ये आगमन. धर्मशास्त्रानुसार मूर्ती धान्य वास. ४ ऑगस्ट २००६ (श्रावण शुद्ध दशमी युगाब्ध ५१०८)रोजी सुरत निवासी पू. वल्लभाचार्य आणि मा. दादा वेदक यांच्या उपस्थितीत प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
 
मंदिराच्या उभारणीसाठी जनता जनार्दनांच्या सहकार्याने आणि आजपावेतो दोन कोटींहून अधिक खर्च झालेला आहे. सर्वांसाठी, सर्वकाळ खुले असलेले गोदावरीच्या दुग्धस्थळी धबधब्यानजीक साकारलेले हे आगळेवेगळे मंदिर. मंदिराच्या उत्पन्नातून विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात.
 
अनेक सामाजिक उपक्रमन्यासातर्फे अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. यामध्ये वनवासी बंधूंचा सामूहिक विवाह तसेच मागास समाजातील व वनवासी गणवेशवाटप केले जाते. नाशिकच्या सरकारी रुग्णालयातील गरजू रुग्णांसाठी ८० टक्के सवलतीत रक्तपिशव्यांचा पुरवठा केला जातो. अन्नदान आणि विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमाचे आयोजन न्यासातर्फे केले जाते. भारत-भारतीच्या सहयोगाने एकात्मता यज्ञाचे आयोजन केले जाते. विश्व हिंदू परिषदेच्या सहकार्याने वनवासी विद्यार्थी वसतिगृहाची व्यवस्था केलेली आहे. सामाजिक प्रबोधनासाठी उपेक्षित बांधवांसाठी पूजा प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात येते. नाशिक जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी महिलांची आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन होते. बालाजी मंदिरात त्रिपुरी पौर्णिमेस दीपोत्सव साजरा होतो. एक लाख दीप यावेळी प्रज्वलित होतात. खर्‍या अर्थाने दीपावलीचे मनोरम दर्शन येथे घडते. श्री व्यंकटेश बालाजी मंदिर गंगापूर धबधबा येथे ब्रह्मोत्सव दर आश्विन शुद्ध तृतीयेस सायंकाळी साजरा होत असतो. श्री महालक्ष्मी मंदिर, लव्हाटे मळा, सिटी सेंटर मॉलमागे, उंटवाडी, सिडको रोड, नाशिक येथे श्री व्यंकटेश बालाजी भगवंताकडून माता श्री महालक्ष्मीला महावस्त्र प्रदान कार्यक्रम हे त्याचे स्वरूप असते. या उपक्रमातदेखील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात.
 
सामाजिक दायित्वाच्या भावनेतून कार्य
 
भाविकांनी श्रद्धेने दिलेल्या देणगीचा योग्य विनियोग व्हावा यावर न्यासाचा नेहमीच कटाक्ष असतो. म्हणूनच शहरातील विविध शैक्षणिक संस्था, गिरी व वनवासी भागातील १०-१२ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षण सुकर व्हावे यासाठी बालाजी मंदिर परिसरात वसतिगृह बांधण्यात आले आहे. हरसूलसारख्या आदिवासी विभागातील १० विद्यार्थिनींना दत्तक घेऊन त्यांचा सर्व खर्च न्यासातर्फे केला जातो. पूर्वांचलमधील विद्यार्थिनीचे पालकत्वदेखील न्यास घेते. अशा विविध जबाबदार्‍याही न्यास सक्षमपणे पार पाडीत आहे. गरजू विद्यार्थी, दुष्काळग्रस्त जनता व पशुधन, अतिशय गरीब रुग्णांना रक्तपिशव्या व अन्य वैद्यकीय मदत न्यास डोळसपणे व जबाबदारीने करीत आहे. स्व. अप्पा नांदेडकर रुग्णोपयोगी साहित्य केंद्रातर्फे गरजू रुग्णांना मोफत साहित्य दिले. आजारपणात लागणारे साहित्य/ वस्तू विनामूल्य वापरण्यास अनामत तत्त्वावर दिले जाते. यात वॉकर, कमोडचेअर, व्हिलचेअर, फॉवलर बेड इत्यादी साहित्य दिले जाते.
 
पूजा प्रशिक्षण वर्ग
 
समाजातील भटक्या विमुक्त, मागास जातीतील व्यक्तींना परमेश्वराची पूजा करण्याचा नैसर्गिक अधिकार आहे. तो काही कारणांनी मध्यंतरी नाकारला जात होता. आता मात्र दरवर्षी शंकराचार्य न्यास आणि रा.स्व.संघ धर्मजागरण विभाग यांच्या विद्यमाने पूजा प्रशिक्षण वर्ग आयोजित करून शेकडो मागासांना पूजा आणि पौरोहित्य करण्यासाठी प्रशिक्षित केले. यंदाचे या वर्गाचे हे सातवे वर्ष होते. देवाच्या गाभार्‍यात जाऊन देवाची पूजा करणे ही ठराविक समाजाची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी नाशिकच्या शंकराचार्य न्यासाच्या वतीने २०१२ पासून पूजा प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले आहेत. आजपर्यंत नाशिक जिल्ह्यातील २४५ जणांनी प्रशिक्षण पूर्ण केले असून त्यातील ८० युवक हे मागासवर्गीय आहेत. या प्रशिक्षणाला हिंदू धर्मातील कुणीही व्यक्ती प्रवेश घेऊ शकतो. आजपर्यंत विविध जातीच्या लोकांनी हे प्रशिक्षण पूर्ण केले आहे.
 
प्रशिक्षण केंद्र सुरू झाल्यापासून सन २०१२ मध्ये ३४, २०१३ मध्ये ३०, २०१४ मध्ये ३१, २०१५ मध्ये ५०, २०१६ मध्ये ३१, २०१७ मध्ये ४५, २०१८ मध्ये २४ अशा एकूण २४५ युवकांनी प्रवेश घेऊन हे प्रशिक्षण पूर्ण केले. त्यातील ८० युवक हे मागासवर्गीय आहेत. यातील बहुतांश युवक हे आपापल्या गावात पूजाअर्चा करून आपला उदरनिर्वाह करीत आहेत. ग्रामीण भागात पुरोहित मिळत नाहीत ही अडचणदेखील या उपक्रमाने दूर होण्यास मदत होते. तसेच प्रशिक्षित युवक अन्य व्यक्तींनादेखील हे प्रशिक्षण देऊ शकतो. या प्रशिक्षण वर्गात सर्वदेव पूजा, ज्योतिष पंचांग, नामकरण विधी, संस्कृत संभाषण वर्ग, योगासने शिकविली जातात. यामध्ये सत्यनारायण पूजा, विवाह, अंत्येष्टी, नामकरण विधी हे मुख्य असतात. ग्रामीण भागात वेगवेगळ्या श्रद्धा परंपरा असतात. प्रत्येक व्यक्तीला आपल्या जातीच्या-परंपरा माहीत असलेला पुरोहित हवा असतो. याकरिता येथे प्रशिक्षण घेतलेले युवक योग्य कामकरीत आहेत. या ठिकाणाहून प्रशिक्षण घेऊन गेलेले तीन मागासवर्गीय युवक हे पंढरपूर देवस्थानच्या पुजारी निवड समितीचे सदस्य आहेत. शंकराचार्य न्यासाच्या उपक्रमातून प्रेरणा घेऊन गेल्या वर्षापासून पैठण, सज्जनगड, सोलापूर, कोल्हापूर, कणेरी आश्रमया ठिकाणीही पूजा प्रशिक्षण सुरू झाले आहे. अन्य ठिकाणीदेखील मागणी वाढत आहे. त्यामुळे हिंदू धर्मजागरण होऊन आपल्या देवतांची पूजा करण्याची शास्त्रीय पद्धती सर्वांना ज्ञात होत आहे.
 
 
 
 
मोरोपंत पिंगळे गो-शाळा प्रकल्प
 
आपल्या संस्कृतीत गोधनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. समृद्ध गोधन असणे ही देशाची प्राथमिक गरज आहे. त्यामुळे गंगापूर येथेच शंकराचार्य न्यासातर्फे मोरोपंत पिंगळे गो-शाळा प्रकल्प सुरू करण्यात आला. प्रारंभीपासूनच देशी वंशाच्या गोधनाचा आग्रह न्यासाने धरला होता. आजमितीस या गो शाळेत ६५ गोवंश आहे. गायीच्या दुधाबरोबरच गोमूत्र अर्क, शेणखत, शेण्या, गांडूळ खत, यांचे उत्पादन येथे होते. गो दान, गोपालक, गोग्रास अशा विविध योजनांद्वारे देणगी देऊन या कार्यास हातभार लावता येऊ शकतो. वसुबारस तसेच विविध कार्यक्रमात गोपूजन आणि याबाबत जनजागृती असे विविध कार्यक्रमन्यासातर्फे नियमित होत असतात.
 
सांस्कृतिक विभाग
 
शंकराचार्य न्यासाचा सांस्कृतिक विभागदेखील समृद्ध होत आहे. गंगापूर रोडवरील जुना नाका येथील न्यासाच्या सुसज्ज इमारतीत ५०० खुर्च्या आणि अत्याधुनिक ध्वनी यंत्रणा असलेला भव्य हॉल उपलब्ध असून तेथे नित्यनेमाने संगीत, नृत्य, साहित्यिक कार्यक्रमहोत असतात. त्याला मान्यवर कलाकार नियमित हजेरी लावतात. अनेक विषयांवर विचारमंथन होते.
 
सिंधुताई मोगल संदर्भ ग्रंथालय
 
समाजात वाचन संस्कृतीची जोपसना व्हावी आणि महत्त्वाचे ग्रंथ वाचून त्यांचा अभ्यासासाठी उपयोग व्हावा यासाठी न्यासाच्या इमारतीत सिंधुताई मोगल संदर्भ ग्रंथालय गेल्या वर्षी सुरू करण्यात आले. या ग्रंथालयाचा उपयोगदेखील शहरातील नागरिक करीत असून नवनवे संदर्भ ग्रंथ तेथे आणून वाचन प्रवृत्त करण्यासाठी न्यास प्रयत्नशील आहे.
 
जनकल्याण रक्तपेढी
 
शंकराचार्य न्यास, नासिकच्या सहकार्याने गेल्या २८ वर्षांपासून सन १९८९ पासून सुरू असलेला प्रकल्प. यात सुरक्षित व वाजवी दरात रक्तपुरवठा केला जातो. येवला, संगमनेर, कळवण इत्यादी ठिकाणी रक्तपेढीचे केंद्र कार्यान्वित आहे. याद्वारे गरजूंना मोफत अथवा सवलतीच्या दरात रक्त उपलब्ध करून दिले जाते. थॅलेसेमियासारख्या दीर्घ आजार असलेल्या रुग्णासाठी मोफत रक्त व औषधपुरवठा केला जातो. सावित्रीबाई फुले मुलींची अभ्यासिका हल्ली अनेकदा घरे लहान असतात. अभ्यासासाठी वातावरण नसते. आसपास गोंगाट असतो. अशा परिस्थितीत विशेषतः मुलींची गैरसोय होते. त्यामुळे शंकराचार्य न्यासाच्या सहकार्याने उत्तमनगर येथे मुलींसाठी स्वतंत्र अभ्यासिका चालविली जाते. आतापर्यंत ३००० वर मुलींनी त्याचा लाभ घेऊन प्रगती साधली आहे.
अभ्यासिकेची वेळ :- सकाळी ७.३० ते रात्री ९.०० अशी असते. या वेळात मुली तेथे येऊन अभ्यास करू शकतात.(शंकराचार्य न्यास दूरध्वनी ०२५३/२२३२०६२,श्री बालाजी मंदिर दूरध्वनी: ०२५३/ २२३०९२९)
कुर्तकोटी शंकराचार्यांचा वारसा जपू डॉ. कुर्तकोटी शंकराचार्य यांची विद्वत्ता आणि जोडीला असलेली तत्कालीन सामाजिक जाणीव या दोन्ही गोष्टींचा वारसा जपून भावी काळात विविध उपक्रमन्यासातर्फे हाती घेतले जाणार आहेत. सुसंस्कृत समाज घडविण्यासाठी श्री शंकराचार्य न्यासाचे कार्य सुसंस्कृत समाज घडविण्यासाठी असून भावी काळात शहराचा होणारा विस्तार पाहता त्याची मोठी गरज आहे. या कार्याची पायाभरणी स्वतः कुर्तकोटी शंकराचार्य यांनीच केली असल्याने मोठी परंपरा व विचारधन मार्गदर्शक ठरणार आहे. - डॉ. आशिष कुलकर्णी, अध्यक्ष, शंकराचार्य न्यास
 
श्री शंकराचार्य न्यास विश्वस्त मंडळ
अध्यक्ष : डॉ.आशिष शरद कुलकर्णी
कार्यवाह : प्रमोद दत्तात्रय भार्गवे
सदस्य : राजारामहनुमंत मोगल, आनंद रंगनाथ जोशी, श्रीनिवास मधुकर ब्रह्मे, अशोक बाबाजी खोडके, हेमंत मनोहर कुलकर्णी, नरेंद्र हरिभाऊ चांदवडकर, अवधूत नारायण देशपांडे.
 
नाशिकची ओळख अध्यात्म, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात कार्य करणार्‍या अनेक संस्थांमुळे आहे. त्यात पावणेदोनशे वर्षांपूर्वीपासून कार्यरत असणारे सार्वजनिक वाचनालय किंवा जुन्या वसंत व्याख्यानमालेपैकी एक असलेली यशवंत महाराज पटांगणावर मे महिन्यात भरणारी वसंत व्याख्यानमाला, स्व. तात्यासाहेब शिरवाडकर यांच्या मार्गदर्शनाने स्थापन झालेले कुसुमाग्रज प्रतिष्ठान अशा अनेक संस्थांप्रमाणे अनेक समाजोपयोगी कार्यात अग्रभागी असलेली संस्था म्हणजे शंकराचार्य न्यास होय. न्यासाची स्थापना १९५७ मध्ये पू. डॉ. शंकराचार्य कुर्तकोटी यांच्या उपस्थितीत झाली. शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी म्हणजे सामाजिक अभिसरणात, समरसतेचा वसा घेतलेले सन्यासी ! बह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजाचे पट्टशिष्य असलेल्या शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी यांना ’महाभागवत’ ही उपाधी स्वतः गोंदवलेकर महाराजांनी प्रदान केली होती. अत्यंत विद्वान अभ्यासू अशा शंकराचार्यांनी लिहिलेल्या ''Heart of Bhagwat Gita'' या शोधप्रबंधास ''Oriental Institute America'' तर्फे डॉक्टरेट प्राप्त झाली होती. पौर्वात्य आणि पाश्चिमात्त्य अशा दोन्ही राष्ट्रांत त्यांच्या नावाचा आदराने उल्लेख होत असे. सामाजिक क्षेत्रात अत्यंत प्रागतिक आणि हिंदू धर्माला उपकारक असे विचार मांडणार्‍या शंकराचार्य कुर्तकोटी यांनी काळाराममंदिर प्रवेश आणि महाडच्या चवदार तळ्याच्या आंदोलनात स्व. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासमवेत जन आंदोलनात भाग घेतला होता. हिंदू धर्मातून अन्य धर्मात गेलेल्या लोकांना परत हिंदू धर्मात परत येण्यासाठी शास्राधार असल्याचे समाजास प्रत्यक्ष कृतीने त्यांनी पटवून दिले. मिस नॅन्सी ए. मिलर या अमेरिकन युवतीस नाशिकच्या गंगापूर येथील मठामध्ये हिंदू धर्म प्रवेश देऊन ’शर्मिष्ठा’ हे नामकरण केले. लो टिळक, स्वामी विवेकानंद, म. गांधी, स्वा. सावरकर, डॉ. हेडगेवार, पू.श्री. गुरुजी, डॉ. मुंजे आदी समकालीन महापुरुषांबरोबर त्यांचे विद्धत्तापूर्ण संबंध होते. 
 
- प्रमोद भार्गवे, कार्यवाह, शंकराचार्य न्यास, नाशिक
 
 
 
- पद्माकर देशपांडे