शॉर्ट अॅण्ड क्रिस्प : एम.जी. रोड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Apr-2018   
Total Views |

 
 
काही काही कथा, लघुपट असे असतात ना जे आपल्याला खूप विचार करायला भाग पाडतात. म्हणजे त्या १०-१५ मिनिटात आपण असं काही तरी बघतो, जे बघून आपल्या मनात अनेक विचार येतात. कुठेतरी आपण स्वत:ला देखील त्याच्याशी जोडून बघतो. ही कथा अशीच आहे. ही कथा आहे एका म्हाताऱ्या भिकाऱ्याची. एम.जी. रोड वर असलेल्या त्या म्हाताऱ्या भिकाऱ्याच्या जीवनाची. मात्र याचं महत्व इतकंच नाही.
केवळ म्हातारा भिकारी दाखवला की कथेतील 'इमोशनल कोशंट' वाढतो म्हणून मी आज या लघुपटाची निवड केलेली नाहीये. त्यामागे एक आणखी कारण आहे, आणि ते कारण म्हणजे या कथेचा शेवट. पण त्याआधी सांगायचं म्हणजे.. कथेची सुरुवात होते ती पहाटे पासूनच. फुटपाथवर राहणारा तो म्हातारा. झाडू वाल्याच्या आवाजाने त्यामुळे किंचीत तोंडावर आलेल्या धुळीने त्याला जाग येते. पुढे त्याचं रूटीन सुरु होतं. दुसरी कडे दाखवलाय एक श्रीमंत माणूस. झोपायला चांगला पलंग, अलार्मने उठतो आणि पुढे त्याचं रुटीन. पण केवळ हा विरोधाभासच दाखवण्यात आला आहे का ?  तर नाही...
रोज हा श्रीमंत माणूस त्या वृद्ध माणसाला ५ रुपये देतो. एकेदिवशी रात्री या श्रीमंत माणसाला फुटपाथवर झोपलेला तो वृद्ध दिसतो. त्याला वाईट वाटतं. सकाळी पुन्हा एकदा कार समोर तो वृद्ध व्यक्ती आल्यानंतर यावेळी मात्र हा त्याला १ हजार रुपये देतो. पहिल्यांदाच इतके पैसे बघितल्याने वृद्ध माणसाला कसंतरीच होतं. खूप आनंदही होत असतो. त्या रात्री त्याला खूप स्वप्न पडतात. मात्र आपली नोट हरवली तर नाही ना या भितीनं तो जागा होतो. ती नोट त्याच्या कडे असल्यानं त्याला खूप दडपण येतं. आणि रात्रभर चिंतेपायी त्याला झोपच लागत नाही. आणि मग...


 
तो काय करतो त्या नोटेचं? पुढे काय होतं? हे जाणून घेण्यासाठी हा लघुपट एकदा तरी नक्कीच बघा. राकेश साळुंके यांच्या या लघुपटाला ३ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. एकही संवाद नसून सुद्धा हा लघुपट खूप बोलका आहे. हजाराची नोट हातात आल्यावर त्या माणसाची होणारी तळमळ, चिंतेपायी उडणारी झोप आणि त्याहूनही महत्वाचा खूप बोलका आहे, या लघुपटाचा शेवट. त्यामुळे हा लघुपट एकदा नक्कीच बघावा.
हा लघुपट मनाला का भिडतो, तर असा पैसा ज्यावर आपला अधिकार नाही, जो खूप जास्त आहे, आपल्या जवळ आला की आपली तळमळ होते. गरजेपेक्षा जास्त हातात आलं की ते कुणीतरी हिरावून घेतंय याची काळजी लागली राहते. या लघुपटात तेच दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे असं धन स्वीकारायचं का? समाधान कशात आहे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं या लघुपटातून मिळतील.
- निहारिका पोळ
@@AUTHORINFO_V1@@