हिंदू समाजाला बदनाम करणाऱ्यांचा कट उघड : भाजप

17 Apr 2018 11:51:49



नवी दिल्ली : कॉंग्रेस पक्षाने कसल्याही तथ्यांचा विचार न करता समस्त हिंदू समाजावर लावलेला दहशतवादाचा ठप्प आता खोटा ठरला असून हिंदू समाजाला बदनाम करण्यासाठी गांधी कुटुंबीयांनी आणि कॉंग्रेस पक्षाने जाहीरपणे माफी मागावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे. भाजपच्या नवी दिल्लीतील मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत भाजप नेते डॉ.संबित पात्रा यांनी ही मागणी केली आहे.
'कॉंग्रेस पक्षाने स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी निर्माण केलेला हिंदू दहशतवादाचा बुडबुडा आता फुटला आहे. त्यामुळे कॉंग्रेसची हिंदूविरोधी भूमिका आता पुन्हा एकदा समाजासमोर आली आहे. कॉंग्रेस नेहमी तुष्टीकरणाच्या राजकारणावर विश्वास ठेवत आली आहे. त्यामुळे या ना त्या कारणाने ते नेहमी हिंदू समाजाला दोष देत आले आहेत. परंतु आता मात्र कॉंग्रेसचे पूर्ण पितळ उघड पडले आहे. त्यामुळे विनाकारण हिंदू समाजाला बदनाम केल्यामुळे राहुल गांधी, सोनिया गांधी आणि सर्व कॉंग्रेस नेत्यांनी देशांची माफी मागावी' असे मत पात्रा यांनी यावेळी व्यक्त केले.

तसेच कॉंग्रेस नेत्यांनी हिंदू समाजावर केलेल्या वेगवेगळ्या आरोपांचा देखील त्यांनी चांगलाच समाचार घेतला. राहुल गांधी यांनी २००९ मध्ये अमेरिकन राजदूतांसमोर हिंदू संघटनांवर आरोप करत, या संघटना लष्कर ए तोयबा पेक्षा देखील घातक असल्याचे म्हटले होते. तसेच दिग्विजय सिंह, सुशीलकुमार शिंदे यांनी वारंवारपणे 'भगवा दहशतवाद' हा ठप्प हिंदू समाजाच्या माथी मारला होता. त्यामुळे कॉंग्रेस जर या देशाला आपले मनात असतील, तर येथे राहत असलेल्या बहुसंख्य हिंदू समुदायाची माफी मागितलीच पाहिजे, असे त्यांनी म्हटले.
 
 
Powered By Sangraha 9.0