वाळवंटातली सौरक्रांती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Apr-2018   
Total Views |
 

 
 
मोरोक्कोच्या वाळवंटात जगातला सर्वात मोठा सौर-औष्णिक (Solar Thermal) वीज प्रकल्प साकारला जात आहे. मोठे ऊर्जाप्रकल्प आणताना त्यात पर्यावरणर्‍हास, विस्थापन असे प्रश्न निर्माण होतात. विकेंद्रित सौर-औष्णिक विद्युत प्रकल्प त्याला शाश्वत पर्याय ठरू शकतात का याचा विचार भारताच्या ऊर्जाधोरणात जरूर व्हायला हवा.
 
 
आफ्रिका खंडाच्या वायव्य टोकाला मोरोक्को हा छोटासा देश आहे. युरोप खंडातल्या पोर्तुगालचा दक्षिणेकडचा शेजारी. पश्चिमेकडे अटलांटिक महासागर आणि उत्तरेकडे भूमध्य समुद्र यांनी वेढलेला. लोकसंख्या फक्त साडेतीन कोटी. इतर आफ्रिकन देशांच्या तुलनेत हा तसा आर्थिकदृष्ट्या संपन्न देश. देशाचा बराचसा भाग वाळवंटी प्रदेशाने वेढलेला. या मोरोक्कोच्या वाळवंटात जगातला सर्वात मोठा सौर-औष्णिक (Solar Thermal) वीज प्रकल्प साकारला जात आहे.....
 
’सौरऊर्जा’ (solar energy) हा शब्द आणि संकल्पना सर्वपरिचित आहे. पण ’सौर-औष्णिक ऊर्जा’ (solar thermal energy) म्हणजे नेमके काय? ’सौरऊर्जा’ म्हणजे घराच्या छपरावर बसवलेली सोलार पॅनल्स आणि त्यातून वीजनिर्मिती होऊन पेटणारे दिवे, अथवा सौर पथदिवे एवढंच आपल्या डोळ्यासमोर येतं. कारण आपल्याकडे सौरऊर्जेचा वापर एवढ्यापुरताच आहे. वास्तविक, ’सौरऊर्जा’ ही फार व्यापक संकल्पना आहे. सूर्यापासून प्रकाश आणि उष्णता या दोन स्वरूपांत ऊर्जा पृथ्वीपर्यंत येते. आज पृथ्वीवर जी काही सजीवसृष्टी अस्तित्वात आहे ती या सौरऊर्जेमुळे आहे. वनस्पती सूर्यप्रकाशाचा वापर करून अन्ननिर्मिती करतात आणि त्यावर पुढील अन्नसाखळी उभी राहते. वास्तविक सौरऊर्जेला ’अपारंपरिक’ (Non-conventional) ऊर्जास्रोत म्हणणं तत्वतः चुकीचं आहे. कारण सूर्य हाच ऊर्जेचा सर्वात प्राचीन स्रोत आहे आणि माणूस सुद्धा सौरऊर्जेचा वापर प्राचीन काळापासून करत आलेला आहे. आपण उन्हात धान्य वा कपडे वाळवतो तेव्हा ’सौरऊर्जा’च वापरत असतो. तंत्रज्ञानाचा विकास जसजसा होत गेला तसतशी ही सौरऊर्जा वेगवेगळ्या उपयोगांसाठी आणि वेगळ्या प्रकारे वापरली जायला लागली. अन्न शिजवण्यासाठी सूर्यचूल, पाणी तापविण्यासाठी ’सौरजलतापक’ (solar water heater) अशी साधी उपकरणं निघाली आणि सौरऊर्जेद्वारे वीजनिर्मिती करण्याचं तंत्रज्ञान हे क्रांतिकारी ठरलं. सौरऊर्जेद्वारे मुख्यत्वे दोन प्रकारे वीजनिर्मिती केली जाते. एक म्हणजे आपल्या सर्वांच्या परिचयाची असलेली सौर-प्रकाश-विद्युत ऊर्जा (solar photovoltaic). म्हणजे यामध्ये सिलिकॉन प्लेट्सद्वारे सूर्यप्रकाशापासून वीजनिर्मिती होते. दुसरा प्रकार म्हणजे ’सौर-औष्णिक विद्युत ऊर्जा’ (solar thermal). हे तंत्रज्ञान आपल्या फारसं परिचयाचं नाही; पण आज अमेरिका आणि स्पेन आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये या तंत्रज्ञानाद्वारे मोठ्या प्रमाणात वीजनिर्मिती होते. या तंत्रज्ञानामध्ये विस्तीर्ण मैदानावर सोलर पॅनलसारखेच दिसणारे वक्र आरसे बसवले जातात. या आरशांच्या मध्यभागी एक धातूचा मोठा खांब बसवलेला असतो ज्यावर आरशांमधून परावर्तित झालेली सूर्यकिरणं एकत्र होतात आणि त्या खांबाचा टोकाकडचा भाग अतिगरम(सुमारे अडीचशे ते तीनशे अंश सेल्सिअसपर्यंत) होतो. (लहानपणी भिंगातून सूर्यकिरणं केंद्रित करून कागद जाळायचा खेळ खेळतात तसं.) या उष्णतेद्वारे पाण्याची वाफ होते आणि त्यावर टर्बाइन फिरवून वीजनिर्मिती केली जाते. औष्णिक ऊर्जाप्रकल्पात कोळशापासून उष्णता मिळवून, त्याने पाण्याची वाफ करून त्यावर टर्बाइन फिरवल्या जातात; अणुऊर्जेमध्ये अणूच्या विखंडनातून उष्णता मिळवून त्याद्वारे पाण्याची वाफ करून त्यावर टर्बाइन फिरवलं जातं. तसंच सौर-औष्णिक तंत्रज्ञानामध्ये उष्णतेचा स्रोत म्हणून सूर्यप्रकाश वापरला जातो. पुढची सगळी प्रक्रिया सारखीच असते.
 
असा एक भव्य प्रकल्प साकारला जातोय मोरोक्कोच्या वाळवंटातल्या ’ऑेराझेझेट’ या गावी. सुमारे नऊ अब्ज गुंतवणूक असलेला या प्रकल्पातून ५८० मेगावॅट वीजनिर्मितीचं ध्येय ठेवण्यात आलं आहे. याला ’ऑराझेझेट सोलर पॉवर स्टेशन’ वा ’नूर पॉवर स्टेशन’ असं म्हणतात. सुमारे साडेसहा हजार एकर परिसरात हा प्रकल्प विस्तारलेला आहे. यामध्ये (parabolic trough) हे तंत्रज्ञान वापरलं गेलं आहे. म्हणजे सूर्यकिरणं परावर्तित करणार्‍या आरशांनाच कलेक्टर जडलेला असतो जिथे सूर्यकिरणं केंद्रित होतात. मोल्टन सॉल्टचा वापर करून उष्णता साठवली जाते जी रात्री वीजनिर्मितीसाठी वापरली जाते. मोरोक्कोमधल्या या प्रकल्पाचं काम चार टप्प्यांमध्ये केलं जाणार आहे. यांपैकी १६० मेगावॅटचा पहिला टप्पा २०१६ मध्ये सुरू झाला. यामध्ये सुमारे पाच लाख छोटे छोटे आरसे सूर्यप्रकाश परावर्तित करतात. यामधून वर्षाला ३७० गिगावॅट वीजनिर्मिती होते. या वीजनिर्मितीसाठी वर्षाला १७ लाख घनमीटर एवढं पाणी लागतं. मात्र यामधून होणारं कार्बन उत्सर्जन कोळशापासून वीजनिर्मितीच्या प्रकल्पाच्या पाच टक्के आहे. या प्रकल्पामध्ये तीन तासांपर्यंत उष्णतेची साठवणक्षमता असलेलं मोल्टन सॉल्ट वापरलं गेलं आहे. मोरोक्कोने सौरउर्जेचं अत्यंत महत्वाकांक्षी धोरण हाती घेतलं आहे. याच प्रकल्पाचा दुसरा टप्पा गेल्या जानेवारी महिन्यात पूर्ण झाला. यामध्ये वीजनिर्मिती क्षमता दोनशे मेगावॅट असून उष्णतेची साठवणक्षमता सात तासांपर्यंत आहे. दीडशे मेगावॅटच्या तिसर्‍या टप्प्याचं काम सध्या प्रगतिपथावर आहे. यामध्ये आठ तासांपर्यंत उष्णता साठवून ठेवण्याची क्षमता असणार आहे. चौथ्या टप्प्यामध्ये ८० मेगावॅटचा सोलर फोटोव्होल्टाइक प्लॅण्ट उभारला जाणार आहे. प्रत्येक टप्प्यामध्ये उष्णतेची साठवणक्षमता वाढवण्यावर आणि पाण्याचा वापर कमी करण्यावर भर दिला गेला आहे. प्रकल्पाचे तीन टप्पे पूर्ण झाल्यानंतर हा जगातला सर्वात मोठा सौर-औष्णिक विद्युत प्रकल्प असेल. सौर-औष्णिक आणि सौर-प्रकाश विद्युत या दोन्हींच्या द्वारे मोरोक्कोने २०२० पर्यंत दोन हजार मेगावॅट सौरऊर्जानिर्मितीचं उद्दिष्ट ठेवलं आहे. उष्णकटिबंधात येत असल्याने आणि वाळवंटी प्रदेश असल्याने इथे उष्णतामान जास्त असतं. त्याचा फायदा सौरऊर्जानिर्मितीसाठी होतो.
 
सध्या जगातला सर्वात मोठा सौर-औष्णिक विद्युत प्रकल्प कॅलिफोर्नियातील सॅन बर्नार्डिनो इथे असून त्याची क्षमता ३९२ मेगावॅट इतकी आहे. कॅलिफोर्नियाच्याच मोहावी वाळवंटात ३६१ आणि २८० मेगावॅटचे दोन प्रकल्प आहेत. याशिवाय स्पेनमध्ये ५० ते १५० मेगावॅटपर्यंतचे सुमारे ३० सौर-औष्णिक विद्युत प्रकल्प कार्यरत आहेत. दक्षिण आफ्रिकेत प्रत्येकी शंभर मेगावॅटचे दोन प्रकल्प आहेत. भारतात सौर-औष्णिक वीजनिर्मितीचा फारसा विकास झालेला नाही. तरीही राजस्थानमध्ये सुमारे पावणेदोनशे मेगावॅटचे दोन प्रकल्प चालू आहेत, तर आंध्रप्रदेशात अनंतपूरला ५० मेगावॅटचा एक प्रकल्प कार्यरत आहे.
 
भारतात राजस्थानमध्ये शांतिवन येथे ’ब्रह्मकुमारी’ संस्थेतर्फे २५ एकरांच्या परिसरात एक मेगावॅटचा सौर-औष्णिक विद्युत प्रकल्प साकारला जात आहे. ’ब्रह्मकुमारी’ या आध्यात्मिक संस्थेशी संलग्न असलेली ‘वर्ल्ड रिन्युएबल स्पिरिचुअल ट्रस्ट’ या संस्थेने स्वत: संशोधन करून या प्रकल्पाचं प्रारूप तयार केलं आहे. यामध्ये सूर्यकिरणं परावर्तित करणार्‍या ६० चौरस मीटरच्या ७७० वर्तुळाकार प्लेट्‌स वापरल्या गेल्या आहेत. सुमारे ८० कोटींच्या या प्रकल्पाला भारत सरकारच्या रिन्युएबल एनर्जी मंत्रालयाने अर्थपुरवठा केला आहे. या प्रकल्पाच्या कामाला २०१७ मध्ये सुरुवात झाली असून पुढील तीन वर्षांत हा प्रकल्प पूर्णत्वास जाईल. मोठे ऊर्जाप्रकल्प आणताना त्यात पर्यावरणर्‍हास, विस्थापन असे प्रश्न निर्माण होतात. विकेंद्रित सौर-औष्णिक विद्युत प्रकल्प त्याला शाश्वत पर्याय ठरू शकतात का याचा विचार भारताच्या ऊर्जाधोरणात जरूर व्हायला हवा.
 
 
 
- हर्षद तुळपुळे
 
@@AUTHORINFO_V1@@