प्लास्टिकला पर्याय देणारा 'इकोप्रिनर'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Apr-2018   
Total Views |


सध्या ‘प्लास्टिकबंदी’ हा विषय खूप चर्चेत आहे. काही लोक त्याचं समर्थन करतात, तर काही लोक त्याच्या विरोधात आहेत. प्लास्टिकमुळे होणारं प्रदूषण, त्याचा मानवी आरोग्यावर, पशुपक्ष्यांवर आणि एकूणच परिसंस्थेवर होणारा वाईट परिणाम हा कोणीही नाकारू शकत नाही. त्यामुळे सरसकट प्लास्टिबंदी योग्य की अयोग्य, हा वादाचा विषय असला, तरी प्लास्टिकला पर्यावरणपूरक पर्याय शोधले गेलेच पाहिजेत. पण, खरंच असे पर्याय असू शकतात का? शंभर टक्के शक्य नसलं तरी बर्‍याच अंशी ते निर्माण करता येऊ शकतात. आसामच्या अमरदीप वर्धन या २२ वर्षीय युवकाने ‘प्रकृती’ या पोफळीच्या विर्‍यांपासून प्लेट्स बनवणार्‍या कंपनीच्या माध्यमातून हे सिद्ध करून दाखवलं आहे.

आपल्याकडे सर्वात जास्त घनकचरानिर्मिती कशापासून होत असेल, तर ती कुठल्याही घरगुती वा सार्वजनिक कार्यक्रमात चहा, नाश्ता व जेवणासाठी वापरल्या जाणार्‍या प्लास्टिक वा थर्माकोलच्या डिश, चमचे आणि कप यांमुळे. २०१० साली दिल्लीमध्ये व्यवस्थापन विषयाचं शिक्षण घेत असताना अमरदीपच्या ही गोष्ट लक्षात आली आणि त्याचं विचारचक्र सुरू झालं. आपण वनस्पतींच्या अवशेषांपासून विघटनशील अशा प्लेट्स बनवाव्यात ही कल्पना तो आणि त्याचा मित्र वैभव जयस्वाल यांच्या डोक्यात रूजली आणि कोईमतूर येथे ‘प्रकृती’ या कंपनीची स्थापना झाली. आजूबाजूच्या गावांमध्ये जेवणासाठी वा नैवेद्यासाठी केळीची पानं, पोफळीच्या विर्‍या (पोफळीच्या पानाचा देठाकडचा भाग) या वस्तू लोक वापरत असल्याचं अमरदीपच्या लक्षात आलं. या निरीक्षणावरून त्यांनी विर्‍यांपासून प्लेट्स तयार करण्याच्या उद्योगाचं मॉडेल तयार केलं. हे मॉडेल त्यांनी आयआयटी मुंबई, आयआयटी कानपूर, आयआयटी चेन्नई, इत्यादी ठिकाणच्या तज्ज्ञांसमोर मांडून त्यांचा सल्ला घेतला. त्यांच्या सल्ल्यानुसार आपल्या मॉडेलमध्ये बदल केले. त्याच्या या कल्पनेला भरभरून प्रतिसाद मिळाला. ईशान्य भारतात सुपारीच्या झाडांची लागवड भरपूर असल्यामुळे त्याने ‘विरी’ हाच कच्चा माल म्हणून वापरायचं ठरवलं. अमरदीपच्या बाबतीतली विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे त्याने हा उद्योग पैशांपेक्षा पर्यावरणसंवर्धनाच्या शुद्ध हेतूने सुरू केला आहे. याचा पुरावा म्हणजे त्याच्या उद्योगामध्ये नैसर्गिकरित्या खाली पडलेल्या पानांच्या विर्‍याच घेतल्या जातात. त्या मुद्दामहून झाडावरून काढल्या जात नाहीत. विर्‍या घेऊन त्या धुतल्या जातात, त्यावर मशीनने अत्यंत साधी प्रक्रिया करून त्यापासून खाण्यासाठी वापरण्यायोग्य प्लेट्स बनवल्या जातात. त्यांना वेगवेगळे आकर्षक आकार दिले जातात. शिवाय बाऊल्स आणि चमचेही बनवले जातात. यामध्ये कुठलाही रासायनिक पदार्थ वापरला जात नाही. या उत्पादनाला ‘आयएसओ ९००१-२०१५’ हे मानांकनही मिळालं आहे. या प्लेट्सचा उत्पादन खर्च प्लास्टिक प्लेट्सपेक्षा जास्त असल्याने या उत्पादनाला बाजारपेठ मिळवणं हे अमरदीप यांच्यासमोरचं एक मोठं आव्हान होतं. मात्र, ही एक अभिनव कल्पना असल्याने आणि पर्यावरणपूरक असल्याने किंमत जास्त असली तरीही त्याला ग्राहक मिळत गेले. जसजसं उत्पादन वाढलं तसतसा उत्पादनखर्च कमी झाल्याचं अमरदीप सांगतो. आज भारतातली अनेक नामांकित हॉटेल्स, रिसॉर्ट्स यांच्याकडून या प्लेट्स विकत घेतल्या जातात. केवळ भारतातच नव्हे, तर ऑस्ट्रेलिया, दुबई, इंग्लण्ड, मलेशिया, अमेरिका, कॅनडा, न्यूझीलण्ड, जर्मनी, फ्रान्स या देशांमध्येही ‘प्रकृती’च्या प्लेट्स पोहोचल्या आहेत. या प्लेट्स आता ऑनलाईनही उपलब्ध आहेत.

या प्लेट्सना जगभरातून प्रचंड मागणी आहे. तेवढा पुरवठा करणं अमरदीपला शक्य होत नाही. यावर उपाय म्हणून अमरदीपने ईशान्य भारतातल्या ग्रामीण भागातल्या लोकांचे छोटे छोटे गट करून, त्यांना अशा प्रकारच्या प्लेट्स बनवण्याचं प्रशिक्षण दिलं. असे अनेक गट आता प्लेट्स बनवण्याच्या उद्योगाला लागले आहेत. त्यांच्या मार्केटिंगची संपूर्ण जबाबदारी ‘प्रकृती’ कंपनीकडून घेतली जाते. यामुळे ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीही झाली आहे. अमरदीपच्या अभिनव कल्पनेतून साकारलेल्या या उद्योगाचं जगभरातून कौतुक होत आहे. 2010 साली त्यांच्या या कल्पनेला इंग्लंडच्या प्रिन्स चार्ल्स यांच्याकडून गौरवण्यात आलं. 2011 साली हैद्राबादच्या ‘सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंटल प्लॅनिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी’ या संस्थेतर्फे आयोजित केलेल्या ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन सस्टेनेबल लिव्हिंग’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत अमरदीपला प्रमुख वक्ता म्हणून बोलवण्यात आलं होतं.

“भारतीय उद्योजकतेचं भवितव्य काय?” असं विचारलं असता अमरदीप सांगतो की, “प्रत्येक माणसात एक उद्योजक दडलेला असतो. भारतातले लोक अत्यंत सर्जनशील आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘स्टार्ट अप’ योजना उद्योजकतेच्या वाढीसाठी खूप प्रेरक आहे; भारतीय तरूणांनी चौकटीच्या बाहेर पडून संधींचं सोनं केलं पाहिजे.”

‘आंत्रप्रिनर’ म्हणजे उद्योजक. पर्यावरणपूरक उद्योग करणार्‍या उद्योजकांसाठी ‘इकोप्रीनर’ ही संज्ञा अलीकडे वापरली जाते. अमरदीप हा खर्‍या अर्थाने भारतातला एक यशस्वी ‘इकोप्रिनर’ आहे.

- हर्षद तुळपुळे
@@AUTHORINFO_V1@@