प्लास्टिक मुक्त भारताचा 'बंगळुरु' पॅटर्न

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Apr-2018   
Total Views |

 
 
गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा महाराष्ट्रात प्लास्टिक बंदीचा विषय गाजतोय. छोट्या छोट्या खानावळींमध्ये, खाण्या - पिण्याच्या ठिकाणांवर आता प्लास्टिक पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. मात्र प्लास्टिकला पर्याय काय ? तर प्लास्टिक शिवाय ऊसाच्या चिपाडापासून तयार करण्यात येणाऱ्या "कटलरी"चा वापर आपण नक्कीच करु शकतो. अशा प्रकारच्या "कटलरी"चे उत्पादन बंगळुरु येथील समन्वी भोगराज करत आहेत.
 
 
 
 
ऊसाच्या चिपाडापासून कटलरी आणि इतर टेबल वापराचे सामान बनवणाऱ्या विस्फोरटेक कंपनीच्या सहसंचालिका म्हणजे समन्वी भोगराज. अर्थवेयर नावाने या गोष्टी उपलब्ध करुन देणारी ही कंपनी पर्यावरणावर आधारित आहे. पर्यावरणाला पूरक अशा या कप, ताटल्या, वाट्या दक्षिण भारतातील अनेक लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम समन्वी करत आहेत. स्वत:च़्या कल्पकतेला उद्योगाचं स्वरूप देवून समन्वीनं बायोडिग्रेडेबल प्रॉडक्ट्स बनविण्याचे काम साधारण ६ वर्षांआधी सुरु केलं.
 
"मी स्वत: शाश्वत ऊर्जेसंबंधी काम केल्यामुळे प्लास्टिक पर्यावरणाला किती हानिकारक आहे, हे मी समजू शकते. म्हणून प्लास्टिकला पर्याय म्हणून दूसरे काय वापरता येईल याचा विचार मी करत होते. त्यासाठी बराच अभ्यास केला त्यातूनच ऊसाच्या चिपाडापासून अशा वस्तु करता येवू शकतात असं लक्षात आलं. ऊसाचा रस काढल्यानंतर उरलेल्या पदार्थापैकी थोड्याचाच पुनर्वापर होवू शकतो. बाकीचा कचरा समजून फेकून दिला जातो. या कचऱ्याचाच वापर करुन आम्ही या सर्व गोष्टी तयार करतो." असं समन्वीनं सांगितलं.
 
फूड कंटेनर्स, ताटल्या, वाट्या, जेवणाचे ट्रे किंवा कप अश्या सर्वच गोष्टी ज्या टाकून दिल्यानंतर ३० ते ६० दिवसांतच विघटीत होऊन जातात अश्या गोष्टींचे उत्पादन विस्फोर्टेक मध्ये करण्यात येते.
 
 
 
 
 
या अंतर्गत समन्वी यांची कंपनी आता इतर संस्थांकडून किंवा थेट रसाच्या दुकानदाराकडून उसाची चिपाडं मिळवते, या कच्च्या मालावर प्रक्रिया करण्या येते आणि नंतर तो वाळवून, त्याला आकार देऊन, गरम करुन आणि इतर आवश्यक त्या सर्व प्रक्रिया करून ही उत्पादने तयार करण्यात येतात.
 
 

 
 
 
ही सर्वच प्रक्रिया संपूर्णपणे नैसर्गिक आहे आणि यात कुठल्याच प्रकारचे बाईंडर्स , ऍडीटिव्हज , कोटींग्ज किंवा रसायनं असे कोणतेही अनैसर्गिक पदार्थ वापरले जात नाहीत ज्यामुळे तयार केलेल्या या सर्वच गोष्टी पूर्णत: निरुपद्रवी आणि प्लास्टिकला एक सक्षम पर्याय ठरतात.
 
उसाच्या चीपाडापासून तयार केलेल्या या गोष्टी, खाण्याच्या पदार्थाला कुठल्याही प्रकारचे रंग , वास किंवा चव देत नाहीत. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या तयार केलेल्या सर्वच गोष्टी माईक्रोव्हेव सेफ आहेत आणि साधारणपणे दोन एक वर्षं टिकू शकतात. मात्र, पर्यावरणपूरक असलेल्या या सर्वच गोष्टी एकदा वापरल्यानंतर धुता येत नाहीत आणि एकदा वापर केल्यानंतर या गोष्टी टाकूनच द्याव्या लागतात.
 

"यूज अॅण्ड थ्रो"ला वाढती मागणी :

गेल्या ३-४ वर्षांमध्ये ऑनलाईन शॉपिंग मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अर्थवेयरच्या या उत्पादनांना ऑनलाईन जगात मोठी मागणी आहे, असे समन्वी सांगते. आजच्या काळात सगळ्यात जास्त प्लास्टिक वापरले जाते, ते प्रवासात. त्यासाठी उपाय म्हणून आता ऊसाच्या चिपाडापासून डबे देखील तयार करण्यात येत आहेत. हे फेकडबे पर्यावरपूरक असल्याने ते घेऊन जाण्यास सोपे तर आहेच तसेच त्यांच्यामुळे पर्यावरणाला त्रासही होणार नाही. अशा उत्पादनांची आता खूप मागणी वाढली आहे. अशा प्रकारे तयार केल्या गेलेल्या गोष्टींच्या किमती या आकारांवर बदलतात. यातील सर्वात स्वस्त वस्तू १ रुपयांपेक्षा ही कमी किंमतीला असून सगळ्यात महाग वस्तूची किंमत साधारण २० रुपये आहे, अशी माहिती समन्वी यांनी दिली.

 
 
"मुळात आपल्या इथल्या लोकांमध्ये जागरुकतेची कमीं आहे. प्लास्टिक इतक्या जास्त प्रमाणात हानिकारक आहे, हेच मुळी लोकांना माहीत नसतं. त्यामुळे आम्ही जनजागृतीचं काम करतो. आम्ही तळागाळात जावून याचं महत्व पटवून देण्याचा प्रयत्न करतो, तसंच शाळेतील लहान मुलांसाठी आम्ही जागरुकता कार्यक्रम राबवतो. कारण जो पर्यंत तळागाळात याची जागरुकता निर्माण होणार नाही, तो पर्यंत लोकांची मानसिकता आणि निष्काळजी वृत्ती बदलणार नाही." असंही समन्वी यांनी सांगितलं.
 
 
 
 
समन्वीनं स्वतःचे इन्जिनिअरिन्ग आणि एमबीए पूर्ण झाल्यावर पंचवीसाव्या वर्षीच या उद्योगाला सुरुवात केली आहे. त्यानंतर आता त्या स्वच्छ इंडिया मिशन मध्ये देखील सहभागी झाल्या. त्यांचा उल्लेख स्वच्छ भारत अभियानात देखील करण्यात आला.
 
साधारणपणे त्यांच्या कंपनीतर्फे दर महिन्याला १५ ते २० लाख उत्सापदने तयार करण्यात येतात. समन्वी यांनी दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण दक्षिण भारतात अशा प्रकारची ही एकमेव कंपनी आहे.
 
त्यांच्या कंपनीत तयार झालेली सगळीच उत्पादनं ही बंगळुरु येथील विविध संस्था, हॉटेल्स, आयटी कंपन्या अश्या सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वापरली जातात.
 
बंगळुरुच्या आसपास असलेल्या गावांमध्ये सुद्धा समन्वी या अनेक महिलांसोबत काम करतात आणि त्यामधून ताग , पेपर आणि कपड्यांच्या सहाय्याने तयार केल्या जाणारया पिशव्या आणि कपड्यांचे कव्हर्स वगैरे वस्तूचं उत्पादन तयार करण्यात येतात.
 
त्यांची बंगळुरु स्थित टीम जवळच्या तुमकुर , नेलमंगला, मैसूर जवळच्या गावांमध्ये जाते आणि तिथे घरूनच काम करण्याचे शिक्षण तेथल्या ग्रामीण महिलांना देते आणि या महिलांना अश्या प्रकारे घरबसल्या रोजगार ही मिळतो आणि त्यांनी तयार केलेल्या वस्तू अशा प्रकारे थेट ग्राहकांपर्यंत सुद्धा पोचतात.
 

"महाराष्ट्रात महिला बचत गटांनी प्रेरणा घ्यावी :

महाराष्ट्रात महिला बचत गटाची खूप मोठी चळवळ आहे. त्यांचे अनेक क्षेत्रांमध्ये मोठे काम आहे. त्यामुळे महिला बचत गटाच्या माध्यमांतून महाराष्ट्रातही असे मोठे कार्य करता येऊ शकते. महाराष्ट्र सरकारने अशा कार्यासाठी महिला बचत गटांना चालना दिल्यास, मदत केल्यास महाराष्ट्रातही प्लास्टिकची मोठी समस्या दूर होऊ शकेल.

 
गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात घोंघावणारे हे "प्लास्टिक बंद"चे वादळ कदाचित अशा प्रकारच्या उत्पादनांनी शमू शकेल. तसेच महाराष्ट्रात देखील अशा प्रकारच्या वस्तुंचे उत्पादन करुन प्लास्टिक ऐवजी पर्यावरण पूरक वस्तुंचा वापर करता येईल. समन्वी सारख्या अनेक तरुणांनी जर ठरवले तर पर्यावरणावर आलेले संकट नक्कीच टळू शकेल.
 
 
- निहारिका पोळ  
@@AUTHORINFO_V1@@