नॉनस्टिक

12 Apr 2018 10:03:22



सध्याच्या युगाला 'अश्म युगाच्या' धर्तीवर 'नॉनस्टिक' युग म्हटलं पाहिजे असं मला प्रकर्षानं वाटतं ! स्वयंपाकघरात या नॉनस्टिकने क्रांती घडवली. बिडाच्या किंवा लोखंडी तव्यावर, चिकटू न देता धिरडी घालण्याचं कौशल्य गरजेचं राहिलंच नाही. बिना तेल - तुपाचे खाणाऱ्यांसाठी तर हे वरदानच!

नॉनस्टिकची भांडी घरात नसणारं घर आता शोधूनही सापडणार नाही. पूर्वी खेडेगावांमध्ये चुलीच असायच्या आणि ही भांडी चुलीवर वापरून चालत नाहीत म्हणून तरी गावांमध्ये बिडाची, लोखंडाची भांडी असत. पण आता गावागावांमध्ये सिलेंडर पोचले आणि त्यापाठोपाठ नॉनस्टिक भांडी ही.

कोणत्याही नव्या संशोधनाचे दुष्परिणाम उशीराच लक्षात येतात. आहारातील लोहाचा, लोखंडी भांड्यांमुळे आपसूकच मिळणारा स्त्रोत आपण हद्दपार केला आणि लोहाच्या गोळ्या तयार करणाऱ्या कारखान्यांना भरभराटीचे दिवस आले. भली मोठी फी मोजून मग 'लोखंडी कढई वापरायला सुरुवात करा' हा अमूल्य सल्ला आहारतज्ञाकडून घेतला. अजून त्याची अंमलबजावणी बाकी आहे. पण 'काहीही न चिकटून घेण्याचं' आकर्षण इतकं आहे की, अंमलबजावणी अंमळ जरा कठीणच दिसते आहे.

'चिकटू न देणं' हे फक्त अन्नपदार्थ आणि भांडी एवढंच मर्यादित नाही बर कां ! food processor मुळे हाताला कणिक चिकटून घेण्याची पण सवय राहिलेली नाही. पोळ्या बनवायचं मशीन असेल तर पोळी लाटताना पण कणकेला हात लावायची गरज नाही. पोळ्यांना तेल लावायला ब्रश मिळतो म्हणजे तेलाचा पण स्पर्श नको हातांना! भाजी पण निवडलेली मिळते, चिरलेली मिळते. भाजी विकत घेतांना हाताळावी लागते पण हल्ली घरपोच pack केलेल्या भाज्या मिळतात! जेवतांना मात्र हाताला पोळी भाजीचा स्पर्श होतो. डबा असेल तर त्याला पर्यायच नाही. बाहेर जेवतांना काटे – चमचे अनिवार्यच. भात आणि डाळ फ्राय सुद्धा चमच्याने खाणे सर्वमान्य आहे. हातांना आपण इतकं नॉनस्टिक केलंय की, भजी तळणीत हातांनी सोडता येतात हे विसरलो आहोत. हातांचा tan घालवायला विकतचे लेप लावून स्वस्थ बसणं मान्य आहे पण बेसनात हात घालणं मान्य नाही!

उरलेलं अन्न दुसऱ्या भांड्यात काढून ठेवतांना, बोटांनी नीट निपटून काढायचं असतं, दुधाचे पातेले घासायला टाकतांना कडेच्या सायीसकट टाकले तर ओरडा बसायचा. अन्न किंवा साय अशी वाया घालवणे हा अन्नाचा, दुधाचा अपमान समजला जायचा. आता हातांना असा स्पर्श होणे टाळले का जाते ? बेसिनच्या जाळीवरचे घासभर अन्न रोज कचरापेटीत जाते. चमचा अपरिहार्य का झालाय ? अन्नाचा आस्वाद घेतांना डोळे, नाक, जिव्हा ह्यांच्या सोबतीने बोटांना होणारा अन्नाचा स्पर्शपण सहभागी असतो. चमच्याचा अडसर का आवश्यक झालाय ?

पावलांना पण आता मातीचं वावडं आहे. माती आहेच कुठे शिल्लक शहरात ? पण मातीत पाय घालायची वेळ येते तेंव्हा सवयच नसल्याने पावले आक्रसलीच जातात. मग मातीची ओळख करून घेण्यासाठी 'मामाच्या गावाला' सुट्टीत बुकिंग करून जावं लागतं ! हल्ली तर पावलांना घरातल्या flooring चं पण वावडं आहे. स्लीपर्स असतात ना सतत पायात !

नॉनस्टिक हात, नॉनस्टिक पावलं एकवेळ चालतील; पण मन नॉनस्टिक होऊ देता कामा नये. त्याचीच भीती वाटायला लागली आहे हल्ली ! मनाचा हा निर्लेप - पणा बधीरतेकडे झुकणारा आहे. कोडगेपणाकडे जाणारा आहे. संवेदनशीलतेला बाधा आणणारा आहे. अंगाला काहीही लावून न घेण्याच्या वृत्तीला खतपाणी घालणारा आहे.

शेजारच्या घरात काय चाललंय हे समजत नाही, इथपासून माझ्या एकट्या राहणाऱ्या मावशीचं, आत्याचं, काका काकूंचं, आई वडिलांचं काय चाललंय, कसं चाललंय तेच मला माहिती नाही, इथपर्यंत परिस्थिती गंभीर झाली आहे.

मनाचा नॉनस्टिकपणा खरवडून काढायला हवाय. दुसऱ्याची वेदना, दुसऱ्याचं दुःख मनाला चिकटायला हवं ! असं अस्वस्थ असलेलं मन पाहिलं तर हायसं वाटतं. घरात मृत्यू पावलेल्या कोण्या एकाच्या मृत्यूची कल्पना शेजाऱ्यांना, दुर्गंधीमुळे कळावी ? ही बातमी वाचून जेंव्हा काहींच्या डोळ्यात का होईना अश्रू तरळले असतील आणि एखाद्याने जरी त्यातून शिकवण घेऊन एकाकी ज्येष्ठ नागरिकांसाठी काही कार्य करायचे ठरवले असेल तरी हे आश्वासक आहे. सर्वच मने नॉनस्टिक नाही झालीयेत ! शरीरासाठी लोहाच्या गोळ्या तरी आहेत, मनाला काय देणार ?

- शुभांगी पुरोहित
Powered By Sangraha 9.0