बनवारीलालची बडबड...

    दिनांक  11-Apr-2018   

एकीकडे देशातले वातावरण आधीच जातीय - धार्मिक संघर्षाने होरपळत असताना राजस्थानच्या भाजपच्या एका आमदारसाहेबांनी त्यात आगीत तेल ओतण्याचे कामकेले आहे. अलवरचे आमदार बनवारीलाल सिंघल यांनी मुसलमानांना सरसकट गुन्हेगार ठरवत, ‘‘मी त्यांना दारातही उभं करत नाही, तुम्हीही करू नका,’’ असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. खरंतर या वक्तव्यातील मुस्लीम समाजाबद्दल या बनवारीलालची मतं किती का कडवी असेना, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न. पण, ‘‘तुम्हीही मुस्लिमांना घरात घेऊ नका,’’ असे हिंदूंना आवाहन करणारे त्यांचे विधान निश्चितच वादग्रस्त आणि संकुचित विचारसरणीचे म्हणावे लागेल.
बनवारीलाल सिंघल एका बैठकीला संबोधित करताना त्यांचा शाब्दिक तोल सुटला आणि असे धार्मिक भावना दुखावणारे, भडकविणारे विधान ते करून बसले. वर म्हटल्याप्रमाणे, मुस्लीम किंवा इतर समाजाला दुसर्‍या समाजाबद्दल काय वाटते, तो ज्याचा-त्याचा प्रश्न, पण एक लोकप्रतिनिधी म्हणून अशी तोंडाला येईल तशी विधाने करताना मात्र आमदारसाहेबांनी एकदाही पक्षाचा, पक्षाच्या शिकवणुकीचा विचार केला नाही. अशाच बेदरकार, बेजबाबदार पोपटपंचीमुळे भारतीय जनता पक्षाला ‘मुस्लीमविरोधी’ म्हणून हिणविणार्‍यांच्या हातात आयते कोलीत सापडते. पण म्हणा, जिथे कुंपणच शेत खातंय, तिथे करायचे तरी काय? बनवारीलाल म्हणतात, ‘‘मेव मुस्लीमकधीही भाजपला मतदान करत नाहीत. मी त्यांच्याकडे मत मागायलाही जात नाहीत. त्यांना मत मागण्याचा अर्थ त्यांच्या गुन्ह्यांकडे डोळेझाक करणं. त्यामुळे त्यांच्यापासून चार हात लांब राहतो.’’ बनवारीलालनी चार काय, दहा हात दूर राहायलाही हरकत नाही, पण त्याची अशी जाहीर वाच्यता करून, वर हिंदूंना सल्ले देऊन, हिंदू-मुसलमानांमधील संबंध गढूळ करणारा हा वाचाळपणा मात्र निंदनीयच. आज कित्येक वस्त्यांमध्ये हिंदू-मुस्लीमअगदी गुण्यागोविंदाने राहतात. एकमेकांचे सण-उत्सवही साजरे करतात. त्यामुळे केवळ मूठभर लोकांमुळे संपूर्ण धर्माला गुन्हेगार, दहशतवादी ठरविणे योग्य नाही. म्हणजे, एकीकडे पंतप्रधानांनी मुस्लीममहिलांसाठी तिहेरी तलाक रद्दबातल करणारा कायदा आणायचा. समरसता, एकता, सर्वधर्मसमभाव, बंधुतेच्या मूल्यांचा दाखला द्यायचा आणि दुसरीकडे बनवारीलालसारख्यांनी एका क्षणात सर्व धुळीस मिळवायचे. म्हणजे हे पूल बांधणार्‍या कामगारांनीच त्याचे खांब खिळखिळे करण्याचा प्रकार झाला.


आत्महत्येची गडबड...

जीवनाची वाट वेडी ती कधी ना संपते...
थांबतो थोडा प्रवासी, वाट कुठली थांबते....


’सोबती’ या मराठी सिनेमातले श्रीनिवास खळे यांच्या संगीताचे हे बोल... जीवनाची वेडीवाकडी वाट न संपणारी आहे, प्रवासी जरी थांबला तरी वाट काही त्याच्यासाठी थांबत नाही. पण, आयुष्याच्या या प्रवासात काही प्रवासी मात्र अर्ध्या वाटेवरूनच माघारी फिरतात किंवा पुढे जाण्याच्या नाउमेदीने स्वत:चे जीवन स्वत:च संपविण्याचा अघोरी प्रयत्न करतात. औरंगाबादमध्ये नुकतीच अशी एक घटना उघडकीस आली. कॉपी करताना पकडला गेल्याने सचिन वाघ या एमआयटी कॉलेजमधील बीएससी नर्सिंगच्या विद्यार्थ्याने चक्क तिसर्‍या मजल्यावरून मृत्यूला कवटाळण्यासाठी उडी टाकली. तातडीने त्याला रुग्णालयात हलवले असून अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे केवळ कॉपी करताना पकडला गेल्यामुळे सचिनने भीतीपोटी हे टोकाचे पाऊल उचलले. कॉपी पकडल्यानंतर शिक्षकांनी सचिनला परीक्षा देण्यास मज्जाव केला. त्याच्या वडिलांना फोन करून झाला प्रकार सांगायचेही ठरले, पण फोन लागला नाही. वर्गाबाहेर गॅलरीत उभ्या असल्याने सचिनने मग आपल्या मित्रांना आत्महत्या करणार असल्याचे फोनवर सांगितले. त्यांनी त्याला थांबविण्याचाही प्रयत्न केला. पण, सचिन कुणाचेही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता आणि अपराधी भावनेच्या पोटी सचिनने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले.
 
- विजय कुलकर्णी