चिमणीच्या दाताने वाटून खाल्लेल्या कैर्‍यांची गोष्ट...

    दिनांक  11-Apr-2018   

सहज एक दृश्य सांगतो. आत्ता गावाकडे जाऊन आलो. आमच्या घराच्या समोरच सध्या रिकामं असलेलं एक घर आहे. कुठल्याशा कंपनीशी त्या घरमालकाचा करार झालेला अन्‌ कंपनीकडून त्यांच्या अधिकार्‍यांना ते घर क्वार्टर म्हणून दिले जाते. सध्या तिथे कुणीच नाही अन्‌ त्या घराच्या अंगणात असलेले आंब्याचे झाड मस्त बहरले आहे. अगदी फेब्रुवारीच्या मध्यातच ते छानपैकी मोहरून आले होते. आता त्याला छोट्याशा बाळकैर्‍या लागल्या आहेत. त्यातल्या काही कैर्‍यांनी तर छानपैकी बाळसेही धरले आहे. एखाद्या घरी सोळाव्यात पदार्पण केलेली सुंदर कन्या असावी अन्‌ मग आजूबाजूच्या घरांतील मिसरूड फुटलेल्या पोरांनी त्या घरासमोर मुद्दाम चकरा माराव्यात तसेच आता त्या घराचे झाले आहे. आमच्या त्या घरांच्या ओळीत जाणारा-येणारा त्या घराजवळ हमखास रेंगाळतो. झाडाकडे बघतो. कैर्‍या बघून कुणाच्याही तोंडाला पाणी सुटणारच...
आता उन्हं वाढायला लागली आहेत अन्‌ त्यामुळे दुपारच्या वेळी कर्फ्यू लागल्यागत शुकशुकाटच असतो. त्यामुळे अनेक जण आपल्याकडे कुणी बघतच नाही, याची खात्री करून हलक्या पावलांनी त्या घराच्या फाटकाच्या फटीतून आत जाऊन बाहेरून वर गेलेल्या जिन्याच्या पायर्‍यांवर चढत कैर्‍या तोडण्याचा उपक्रम राबवीत असतात.
‘हे चिंचेचे झाड दिसत असे चिनारवृक्षापरी...’ असे एक जुने गाणे आहे. आता मला त्या आंब्याच्या झाडावरही असेच काहीसे गाणे लिहायचे आहे; सुचत मात्र नाही...
सध्याच पिकलेले आंबे काही बाजारात आलेले नाही; पण कैर्‍या मात्र आल्या आहेत. कोवळ्या आहेत. त्यांनी कोय धरलेली नाही. म्हणजे आंबे नाहीत ते कच्चे; पण कैर्‍या आहेत.
परवा त्या घरात गल्लीतली चार पोरे शिरली अन्‌ त्यांनी बाकायदा सोबत आणलेल्या पिशवीत कैर्‍या तोडून जमा केल्या. बरे, शांत असावे ना अशा वेळी, तर ही पोरे चेकाळल्यागत खी खी हसत कुजबुजत होती. आमच्या बाजूच्या घरातील आजोबा खिडकीतून हे सारे बघत होते. पोरांनी पिशवी भरली अन्‌ मग हे आजोबा कल्ला करत हातात काठी घेऊन बाहेर आले. पोरं कैर्‍यांची पिशवी टाकून धूऽऽम पळाली... मग या आजोबांनी, जुन्या हिंदी चित्रपटात जीवन नावाचा नट जसा खिजर्‍या खिजर्‍या हसत संवाद म्हणायचा तसे हसत त्या कैर्‍यांनी भरलेली पिशवी आणणण्याचा प्रेम चोपडापणा केला.
इतका राग आला ना त्या म्हातार्‍याचा... अरे खाऊ दे ना त्या पोरांना कैर्‍या... आता ती पोरे काही घरी विकत घेऊन कैर्‍या खाऊ शकतील, अशा घरची नव्हती असे नाही; पण बोरं, चिंचा, कैर्‍या या चिजा चोरून खाल्ल्याशिवाय मजाच येत नाही ना.
मला कळत होतं की, त्या पोरांची कैर्‍यांची पार्टी ठरली होती, कारण पळून जाताना त्या पोरांच्या खिशातून मीठ आणि तिखट मिक्स केलेली पुडी सांडली ना रस्त्यावर...
बालपण आणि या कैर्‍या यांचा संबंध किती काव्यमय आहे ना... वयात आल्यावर पहिलं प्रेम होतं अन्‌ मग ती दिसावी यासाठी जीव कासावीस होत राहतो. तिला सांगायचं असतं, माझं तुझ्यावर प्रेम आहे... पण संधी मिळाली की घशाला कोरड पडते, तीही आसुसल्या नजरेनं आतातरी हा हिंमत करेल म्हणून बघत असते अन्‌ हा बेटा घाबरतच राहतो... जाऊ द्या, नेहमी होते तसेच होते. याला नोकरी लागत नाही अन्‌ ती मग एक दिवस याच्या घरी तिच्या लग्नाची पत्रिका आणून देते किंवा मग याची आईच याला सांगते, ‘‘बाळ्या, कळलं का रे... नलूचं ठरलं ना लग्न!’’
तसंच बालपणी कैर्‍यांचं होतं. जुन्या काळात कशाला, अगदी आत्ता तिसेक वर्षांपूर्वी आमराया असायच्या अन्‌ ओळीने असलेल्या आंब्याच्या वृक्षांना कोवळ्या कैर्‍या लटकत असायच्या. पोरींच्या कानात जसे डूल असतात तशा. तिथे हमखास खुंखार चेहर्‍याचा चौकीदार असायचा अन्‌ त्याचे ते जीभ ल्हाय ल्हाय करत काटेरी सुळे दाखवीत भुंकणारे कुत्रेही असायचे... आमराईतला चौकीदार अन्‌ प्रेमात पडलो त्या पोरीचा बाप किंवा दांडगा भाऊ बेटे सारखेच क्रूर...
तरीही चोरून कैर्‍या आणल्या नाही, असे त्या काळातले बालपण नाही. आमराईच्या कुंपणावरून दुपारच्या वेळी उडी मारून आत शिरताना चौकीदार आंब्याच्या गार गार सावलीत टाकलेल्या खाटेवर घोरत पडला आहे अन्‌ त्याचे ते बांडे कुत्रेही कुठेतरी भटकत गेले आहे, याची खात्री करून घेतलेली असायची ना... चौकीदाराला जाग येणार नाही, अशा पद्धतीने दुसर्‍या टोकाला असलेल्या झाडाच्या खाली वाकलेल्या फांदीवर चढून कैर्‍या हस्तगत करणे म्हणजे त्या काळात फारच रोमांचक असे वाटायचे. अशा स्थितीत कैर्‍या घेऊन सुखरूप बाहेर पडलो आमराईच्या की साता समुद्रापलीकडे राक्षसाने पळवून नेलेल्या राजकन्येला सोडवून आणणारे आपण राजकुमारच आहोत, असे वाटायचे! त्या वयात तर मला उन्हाळ्यात अशी गोष्टीची पुस्तके वाचत असताना नेहमीच वाटायचे की, आपल्यालाही त्या राजकुमारासारखा कुणीतरी उडता गालिचा द्यावा अन्‌ आपण त्या गालिचावर बसून आंब्याच्या झाडाच्या उंच टोकावर असलेल्या कैर्‍या सहज तोडाव्यात अन्‌ आपल्या मागे धावणार्‍या त्या राक्षस चौकीदाराच्या डोक्यावरून आपण त्या उडत्या गालिचावर बसून ऐटीत उडत जावे...
तसे कधी झाले नाही, हे तर खरेच आहे; पण कैर्‍या आणल्या आहेत अन्‌ अशा चोरून आणलेल्या कैर्‍या मिठाशी खाताना झालेला आनंद, अवघी आमराईच विकत घेण्याची कुवत आल्यावरही आता होत नाही.
मला एका गोष्टीचे नेहमीच अप्रूप वाटत आले आहे. याच दिवसांत आंबे अन्‌ चिंचा या आंबट चिजा का असतात... उत्तर मला सापडलेले नाही. एवढं मात्र नक्की की उन्हाळा म्हणजे कैर्‍या अन्‌ या चिंचा... हे समीकरण मात्र होतेच.
आता चिंचेचं झाड खूपच उंच आणि भयप्रद असेच. बरे, त्यावर उंचाच्या ठिकाणी या चिंचा लागलेल्या. चिंचेला फुले आलीत की त्यांची चटणी आमची आजी करायची. फुलांना सुगंध असतो, हे माहिती आहे सार्‍यांनाच; पण अशी चवदार फुले असतात हे मला आजीमुळे कळलं होतं.
चिंचेच्या झाडावर भूत हमखास असतेच... म्हणजे प्रत्येकच गावात जशी श्याम टॉकीज असतेच तसेच हेही. त्यामुळे दुपारच्या एकट वेळी आंब्याच्या झाडाशी जशी लगट करावीशी वाटत होती, तसे चिंचेचे होत नव्हते. घरचेच सांगायचे, चिंचेच्या झाडाकडे जाऊ नकोस. बरे, चिंचेच्या झाडाखाली गेला अन्‌ त्याला बाधा झाली, हे आम्ही त्या काळात महिन्या दोन महिन्यातून एकदा ऐकायचोच...
गाभुळली चिंच ही फारच अनोखी चव असलेली गोष्ट असते. आमच्या वाट्याला ती आलेली आहे. चिंचा तोडायच्या अन्‌ त्याची टरफले काढायची, ही कामे त्या काळात बच्चे कंपनीच्या वाट्याला यायची. काळपट चॉकलेटी रंगाचे ते चिंचोके काही फेकवत नव्हते. त्या वेळी आम्ही चिंचेची कुल्फी करायचो. म्हणजे मीठ, मिरची, जिरं, ओवा टाकून चिंच खलबत्त्यात कांडायची. त्यात गूळही घालायचा अन्‌ तो गोळा कमचीच्या एका काडीला लावून मस्तपैकी चोखायचा... वाऽऽ क्या बात हैं...!
कैर्‍यांची आपली एक न्यारी दुनिया होती. आताही कैर्‍या बाजारातच दिसतात. आजच्या पोरांच्या वाट्याला आम्रवृक्ष वगैरे येत नाहीत. परवाच माझ्या मित्राचा एक लहानगा लेक जो मॉल संस्कृतीतच वाढला आहे, तो त्याच्या बापाला विचारत होता, ‘‘डॅड या कैर्‍या कुठल्या फॅक्टरीत तयार करतात?’’
कैर्‍यांचे मग आंबे होतात. पाडाला पिकलेले आंबे अन्‌ पोपटाने चोच मारलेले आंबे खूपच गोऽऽड असतात, हे ऐकले होते अन्‌ ते खरे असल्याचा अनुभवही घेता आला. एकच कैरी असेल अन्‌ चार मित्र असतील तर चिमणीच्या दाताने, म्हणजे कापडात गुंडाळून मग तिचा दाताने लचका तोडून तिचे वाटप करायचे... त्यात झालेली ही दोस्तीची चव अजूनही गोडच आहे...