स्वच्छतेला आंदोलन म्हणून स्वीकारा : नरेंद्र मोदी

10 Apr 2018 15:57:33
 
 
 
 
 
 
 
बिहार : स्वच्छतेला आंदोलन म्हणून स्वीकारा असा मंत्र आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. आज बिहारमधील चंपारण येथे जनतेला संबोधित करतांना ते बोलत होते. यावेळी नरेंद्र मोदी यांनी विविध योजनांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी वकील, अभियंता, वैद्य, शिक्षक, श्रमिक आणि शेतकरी यांना सगळ्यांना एकसमान दर्जा दिला. स्वच्छतेचे दूत म्हणून देखील आपला असाच सहभाग असायला हवा तसेच स्वच्छतेचा संदेश समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचायला हवा असा आपला प्रण असावा असे मोदी यावेळी म्हणाले.
 
 
 
‘स्वच्छ भारत अभियाना’मुळे देशातील अनेक स्त्रियांचे जीवनमान बदलले आहे. एका शौचालयाच्या निर्माणामुळे महिलांचा सन्मान, सुरक्षा आणि आरोग्य सुधारले आहे. बिहारमध्ये तर आता ज्या घरी शौचालय असेल ते घर उच्च विचारांचे घर मानले जाते असे सध्या म्हटले जात आहे.
 
 
 
 
४ एप्रिल या दिवशी ‘सत्याग्रह से स्वच्छाग्रह’ आठवडा साजरा करण्यात आला या आठवड्यात बिहार, उत्तर प्रदेश, ओडीसा आणि जम्मू काश्मीरमध्ये जवळपास २६ लाख शौचालय निर्माण करण्यात आले आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. २०१४ मध्ये ४० टक्के शौचालय तयार करण्यात आले होते मात्र २०१८ पर्यंत आता ८० टक्के शौचालय निर्माण करण्यात आले आहे.
 
 
 
 
 
आज नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनेक योजनांचे उद्घाटन करण्यात आले यात अमृत योजनेचे उद्घाटन करण्यात आले आहे. १०० कोटी रुपये लागलेल्या या योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजना तयार करण्यात येणार आहे. मधेपुरामध्ये इलेक्ट्रॉनिक लोकोमोटीव कारखान्याच्या फेज एकचे आज नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे. एका रेल्वे गाडीचे देखील यावेळी उद्घाटन करण्यात आले आहे. वीज, पाणी, रेल्वे, स्वच्छता, रस्ते या संदर्भात आज अनेक नव्या योजनांचे उद्घाटन करण्यात आले आहे. 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0