निरव मोदी प्रकरणी न्यायालयाची इडीला नोटीस

07 Mar 2018 12:56:58




नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकमधील घोटाळ्याप्रकरणी अडचणीत आलेल्या निरव मोदी प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने सुनावणी करण्यास आजपासून सुरुवात केली आहे. निरव मोदी यांच्या कंपनीच्या याचिकेवर सुनावणी करण्यापूर्वी उच्च न्यायालयाने सक्तीवसुली संचलनालयाला (इडी) एक नोटीस पाठवली असून या प्रकरणी इडीने आपल्याकडे असलेले सर्व कागदपत्रे न्यायालयात सादर करावीत, असे आदेश न्यायालयाने दिले आहे. तसेच या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या १९ तारखेला करणार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

पीएनबी घोटाळ्यासंबंधी निरव मोदी यांच्या फायरस्टार डायमंड या कंपनीने दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. यामध्ये इडीने जप्त केलेल्या संपत्तीविषयी फायरस्टारने प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यावर न्यायालयाने हे प्रकरण थोडी किचकट असल्याचे म्हणत इडी बाजू देखील ऐकून घेणे अत्यंत महत्त्वाची असल्याचे म्हटले व इडीने आपली बाजू स्पष्ट केल्यानंतरच या प्रकरणावर पुढील सुनावणी करण्यात येईल, असे न्यायालयाने म्हटले.

यानंतर न्यायालयाने यासंबंधी इडीला नोटीस पाठवली असून इडीने फायरस्टारच्या जप्त केलेल्या संपत्तीची माहिती आणि या प्रकरणासंबंधी आपली बाजू लेखी स्वरुपात न्यायालयात सादर करावे, असे म्हटले आहे. येत्या १९ तारखेच्या आत इडीने या विषयी असलेली सर्व आवश्यक माहिती न्यायालयात दाखल करावी, असे देखील न्यायालयाने म्हटले आहे.
Powered By Sangraha 9.0