तक्रारी निकाली काढून सामान्यांना न्याय द्यावा - जिल्हाधिकारी

    दिनांक  05-Mar-2018
 
 
 
 
 
 
बुलडाणा : सामान्य नागरिकांच्या तक्रारी निवारणासाठी लोकशाही दिन एक सशक्त माध्यम आहे. त्यामुळे लोकशाही दिन कार्यवाहीला नागरिक विविध विभागांच्या संबंधीत तक्रारी दाखल करीत असतात. या तक्रारींवर विहीत कालावधीत कार्यवाही होवून तक्रारींचा निपटारा करावा. तसेच तक्रारी निकाली काढून सामान्यांना न्याय द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज दिल्या.
 
 
 
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात लोकशाही दिनाच्या कार्यवाहीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी ललीत वराडे, भूमि अभिलेख अधिक्षक श्री. जधवर, तहसीलदार शैलेश काळे आदींसह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
 
 
 
या लोकशाही दिनामध्ये एकूण २५  तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यापैकी २३ तक्रार अर्ज सामान्य तक्रारींमध्ये समाविष्ट करण्यात आली. तसेच लोकशाही दिना कार्यवाहीमध्ये २  तक्रारी स्वीकृत करण्यात आल्या असून मागील तक्रारींसह २ तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. निकाली काढण्यात आलेल्या तक्रारीमध्ये अधिक्षक अभियंता, महावितरण यांच्यासंदर्भातील दोन तक्रारीचा समावेश आहे. लोकशाही दिन कार्यवाहीला संबंधित यंत्रणांचे अधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.