पाकिस्तानमध्ये पहिल्यांदाच हिंदू महिलेची सिनेटपदी नियुक्ती

    दिनांक  04-Mar-2018


सिंध : पाकिस्तानच्या इतिहासामध्ये आज पहिल्यांदाच एका हिंदू महिलेची देशाच्या सिनेट पदी नियुक्ती करण्यात आली आहे. कृष्णा कुमारी असे या महिलेचे नाव असून पाकिस्तानच्या सिंध प्रांतामधून तिची सिनेट म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, विशेष म्हणजे कुमारी या दलित समुदायातून असून पाकिस्तानमधील महिला आणि अल्पसंख्यांक समुदायासाठी त्या गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत.

'गेल्या अनेक वर्षांपासून आपण पाकिस्तान महिला, बाल आणि अल्पसंख्यांकांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी कार्य करत आहोत. त्यामुळे देशाच्या सिनेट पदी नियुक्ती झाल्यामुळे अत्यंत आनंद होत असून यामुळे आपले कार्य आणखीन उत्तम पद्धतीने करता येईल,' अशी प्रतिक्रिया कुमारी यांनी दिली आहे. तसेच सिनेटपदी नियुक्ती केल्यामुळे पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) देखील त्यांनी आभार व्यक्त केले आहेत.

कुमारी यांची सिनेटपदी नियुक्ती झाल्यामुळे भारतातून देखील कुमारी यांचे अभिनंदन करण्यात येत आहे, तसेच एका हिंदू महिलेची पाकिस्तानच्या सिनेटपदी नियुक्ती होणे ही पाकिस्तानमधील महिला आणि अल्पसंख्यांक समुदायासाठी अत्यंत महत्त्वाची बाब ठरणार आहे, अशी प्रतिक्रिया उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी दिली आहे.कुमारी यांचा जन्म १ फेब्रुवारी १९७९ मध्ये पाकिस्तानमधील सिंध प्रांतातमध्ये झाला. लहानपणी अनेक कौटुंबिक संकटांवर मात करत त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. तसेच लग्नानंतर देखील आपले उरलेले शिक्षण पूर्ण करून सिंध प्रांतातील नागरिकांच्या मानवी हक्कासाठी त्यांनी कार्य करण्यास सुरुवात केली. दरम्यान पीपीपीच्या माध्यमातून देखील त्यांनी सिंध प्रांतात आतापर्यंत अनेक महत्त्वाची कामे केली आहेत.