‘हा हन्त हन्त, नलिनीं गज उज्जहार।।’

    दिनांक  31-Mar-2018   केळवे येथील तरूण हॉटेल व्यवसायिक प्रचित हरिचंद्र चौधरी यांचे बुधवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या आठवणींना रमेश पतंगे यांनी दिलेला हा उजाळा...

मृत्यू अटळ आहे, हे सगळ्यांना माहीत असते. जन्मजितका शाश्वत तितकाच मृत्यूदेखील शाश्वत असतो. हे त्रिकालाबाधित सत्य असले तरी, मृत्यू जेव्हा ध्यानी-मनी नसताना अचानक, चोर पावलांनी येतो, तेव्हा त्याचा धक्का जबरदस्त असतो. बातमी ऐकून माणसे कोसळतात, क्षणभर बातमीवर विश्वासच बसत नाही. बातमी सांगणार्‍याने काही गडबड तर केली नाही ना, नावात काही चूक तर केली नाही ना, अशा अनेक शंका मनात निर्माण होत जातात. प्रचितच्या मृत्यूची बातमी जेव्हा मला कुंदन पाटील यांनी मोबाईलवर सांगितली, तेव्हा त्या बातमीवर माझा विश्र्वासच बसेना. पस्तीशी-चाळीशीचे वय, हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू येण्याचे तर नक्कीच नाही. पुन्हा असा तरूण की जो नेहमी आनंदी असे, वेगवेगळ्या कल्पनांमध्ये मग्न असे, केळव्यातील आपले रिसॉर्ट अधिक चांगले कसे करता येईल, याच्या योजनांत गढलेला असे, असा तरूण अचानक कसा गेला? हा प्रश्न राहून राहून माझ्या मनात आला. यमदेव जर समोर असता तर, अधिकार नसतानाही त्याचा कान धरून मी त्याला विचारले असते,‘‘अरे, तुला प्रचितच सापडला का? मृत्यूची वाट बघणारे आणि तुला रोज आमंत्रण देणारे हजारो जीव असताना, ज्याला तुला भेटायची घाई नव्हती, त्याला तू का घेऊन गेलास?’’ यमदेवाने काय उत्तर दिले असते माहीत नाही. परंतु, विधिलिखित कुणाला टाळता येत नाही, असे म्हणून आपले आपणच समाधान करून घ्यायचे असते. मनाला पटो अथवा न पटो, पण ते सत्य स्वीकारूनच पुढे जायचे असते. प्रचितच्या अंत्यदर्शनाला बोरिवलीला जाणे, माझ्या दृष्टीने फारच अवघड होते. बोरिवली तशी मला नवीन नाही. आठ वर्षे तेथे मी राहिलो होतो. शिंपोली आणि शिंपोलीचा परिसर मला माहीत होता. पण, मला कळत नव्हते की, कोणत्या शब्दांत मी प्रचितच्या वडिलांचे आणि त्याच्या आईचे सांत्वन करू. शब्दाचे सामर्थ्य किती तोकडे असते, हे त्यावेळेस मला समजले. कारण या माता-पित्यांचे दुःख कोणत्याही शब्दाने कमी होणारे नव्हते. गडकर्‍यांच्या एका कवितेची ओळ मला आठवली, ‘हे कोण बोलले बोला, राजहंस माझा निजला’ कोणती आई आपल्या तरण्या-ताठ्या मुलाचा मृत्यू पाहू शकेल आणि ते सत्य निर्विकारपणे स्वीकारू शकेल? अशक्य कोटीतील गोष्ट आहे. अनेक भाषणे करणारा मी अशा वेळी वाचाहीन झालेला असतो. हरिश्र्चंद्र चौधरी यांच्या परिवाराशी माझा संबंध गेल्या आठ-दहा वर्षांत अधिक घनिष्ठ होत गेला. केळव्याला त्यांच्या विश्रामगृहात जाणारा मी एक पथिक. म्हटले तर हा संबंध व्यावसायिक, मी त्यांचा ग्राहक आणि ते माझ्या दृष्टीने विश्रामगृहाचे मालक. परंतु, हे नाते हळूहळू संपत गेले आणि मी त्यांच्या कुटुंबातील एक सदस्यच झालो. त्यांच्या सुख-दुःखाचा साथीदार झालो. तसे बघितले तर अशा बाबतीत अलिप्त राहणारा मी, कसा काय त्यांच्याशी एवढा समरस झालो, हे मलादेखील समजले नाही. मुलगा प्रचित, मुलगी प्राची, त्यांचा परिचय होत गेला आणि त्यातही प्रचितचा परिचय अधिक होत गेला. पाच-सहा महिन्यांत मी कधी केळव्याला गेलो नाही, तर प्रचितचा हमखास फोन येई, ‘‘काका, तुम्ही खूप दिवसात आला नाही आहात. कधी येता?’’ असा चार-पाच वेळा फोन झाला की एक-दोन दिवसांसाठी का होईना माझी केळव्याला चक्कर होत असे आणि प्रचितशी गप्पा होत. तो बुद्धिमान असल्यामुळे समाजात काय घडत आहे, याच्या विषयी तो जागरूक असे, अनेक प्रश्न त्याच्या मनात असत, त्याच्यावर आमच्या गप्पागोष्टी होत. नरेंद्र मोदींविषयी तर त्याला खूप आकर्षण होते. संघकार्यकर्ता म्हणून माझी नरेंद्र मोदी यांच्याशी व्यक्तिगत चांगली ओळख आहे, हे जेव्हा त्याला समजले, तेव्हा त्याने भीतभीत मला विचारले की, ‘‘मोदींशी कधी भेट करून द्याल का?’’ मी म्हटले,‘‘जरूर!’’ परंतु, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून त्यांच्या भेटीचा काही योग आला नाही. मुद्दामत्यांना भेटायला जावे, असे काही कारणही झाले नाही. त्यामुळे प्रचितची ही इच्छा अपुरी राहिली. त्याची इच्छा मी पुरी करू शकलो नाही, ही सल माझ्या मनात कायमराहील. अशा गप्पा झाल्यानंतर केळव्यातील पर्यटन व्यवसायाच्या गप्पा सुरू होत. गेल्या आठ-दहा वर्षांत केळवे गावात पर्यटकांची संख्या दिवसागणिक वाढू लागली आहे. पर्यटकांच्या संख्येबरोबर पर्यटकांना लागणार्‍या निवास, न्याहारी, भोजन, यांच्या व्यवस्था करण्याचे व्यवसायदेखील मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहेत. पर्यटनामुळे गावाचे गावपण अजून तरी टिकून राहिलेले आहे. ते टिकून राहावे हा प्रचितचा दृष्टिकोन होता. गेल्या वर्षी त्याने पुढाकार घेऊन पर्यटन महोत्सवाचे आयोजन केले होते. दिवंगत खासदार चिंतामणराव वनगा त्यासाठी आले होते. आयोजक आणि कार्यक्रमाचे नियोजन सर्वच काही उत्तमहोते. वेगवेगळ्या स्टॉल्सना हजारो लोकांनी भेटी दिल्या. आणि केळव्याचे पर्यटनाचे महत्त्व कर्णोपकर्णी झाले. प्रचितने त्याची उत्तमसीडीदेखील तयार केली. तसा प्रचित आयटी या ज्ञानाच्या क्षेत्रातील तज्ज्ञ माणूस होता. काही वेळेला मी त्याला गमतीने म्हणत असे की, ‘‘हे रिसॉर्ट चालवणे, हे काही तुझे कामनव्हे. यासाठी तू चार पगारी माणसे नेमू शकतोस. त्यांच्यावर सुपरव्हिजन करू शकतोस, तू तुझ्या ज्ञानाच्या क्षेत्रात पुढे गेले पाहिजेस. आज देशालादेखील त्याची गरज आहे.’’ प्रचितला ही गोष्ट समजत असे आणि त्यामुळे तो नरेंद्र मोदी यांच्या ‘डिजिटल इंडिया’ या संकल्पनेसंबंधी कधी कधी माझ्याशी बोलत असे. काही कल्पना सांगत असे आणि या क्षेत्रातील मी अज्ञानी माणूस आहे, हे बहुदा त्याला माहीत नसावे. अशा वेळी मी श्रवणभक्तीचे कामकरीत राही. बुद्धिमान माणसे ही अनेक वेळा अस्वस्थ असतात. त्यांच्या पुढे भावी समाजाचे चित्र असते. त्या चित्रातील काही भावबंध असतात आणि वास्तवातील चित्र फार वेगळे असते. बुद्धिगम्य वास्तविकता आणि जमिनीवरची वास्तविकता यांचा अनेकवेळा मेळ बसत नाही. मग अस्वस्थता निर्माण होते. काही तरी बिघाड होतो. काही वेळा नको त्या विषयाने ताण निर्माण होतात. अनेक वेळा असे ताण बुद्धिमान माणसे स्वतःच्या बुद्धीनेच तयार करतात. त्यात अडकतात, त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. माझ्या अल्प शक्तीने जेवढे करणे शक्य होते, तेवढे मी केले. परंतु, ते प्रयास यशस्वी झाले नाही, असे आज म्हणायला हवे; नाही तर ऐन तरूण वयात हृदयविकाराचा जीवघेणा झटका येण्याचे कारणच नव्हते.

प्रचित मोठा होईल आणि समाजात आपले स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करील आणि त्याच्या उत्कर्षाचा एक दूरस्थ साक्षीदार मी असेन, अशा कल्पनेत मी असतानाच, ‘हा हन्त हन्त, नलिनीं गज उज्जहार।।’

अशी माझी अवस्था झाली. सुभाषितकार म्हणतो की, ‘कमळातील पराग खाण्यासाठी भुंगा कमळात शिरतो, पराग खाण्याच्या नादात संध्याकाळ झाल्याचे विसरतो. कमळ मिटते आणि भुंगा आतमध्ये अडकतो. कठीण लाकूड तोडणारा भुंगा कमळाच्या पाकळ्या पोखरत नाही, कारण त्या नाजूक असतात. एक रात्र तर काढायची आहे, हा विचार करून तो शांत बसतो. परंतु, अरे रे... रात्री हत्ती येतात आणि कमळाचे देठ मोडून घेऊन जातात.


- रमेश पतंगे