मुंबईतील ध्येयवेडा पक्षीतज्ज्ञ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Mar-2018   
Total Views |

‘सॅँक्च्युरी एशिया’ मासिकातर्फे दिल्या जाणार्‍या ‘सँक्च्युरी वाईल्ड लाईफ सर्व्हिस ऍवार्ड’ या पुरस्काराचे शशांक दळवी हे २०१७ चे मानकरी. या पुरस्काराने एक वन्यजीव संशोधक आणि पक्षी निरीक्षक म्हणून दळवींनी स्वत: ची ओळख निर्माण केली आहे.

प्राणी-पक्ष्यांबद्दलचं प्रेम, सतीश यांना लहानपणापासूनच निर्माण झालं होतं. ते चार वर्षांचे असताना त्यांच्या आजोबांनी त्यांना प्राण्यांवरचं एक पुस्तक आणून दिलं. शशांक यांना ते एवढं आवडलं की त्यांनी ते पुन्हा पुन्हा वाचून काढलं. सात वर्षांचे असताना त्यांना शाळेत शिक्षकांनी प्राण्यांवर निबंध लिहायला सांगितला होता. बाकी सर्व विद्यार्थ्यांनी कुत्रा, मांजर अशा पाळीव प्राण्यांवर निबंध लिहिले. शशांक यांनी मात्र ‘एशियन एलिफंट’ या प्राण्यावर निबंध लिहिला. एकदा त्यांना त्यांच्या आजोबांनी एक पिंजर्‍यातला पक्षी आणून दिला. पक्ष्यांच्या बाबतीत प्रचंड जिज्ञासू असणार्‍या शशांक यांनी लगेच डॉ. सलीम अली यांच्या पुस्तकातून त्या पक्ष्याचं नाव शोधून काढलं. मात्र, तो पिंजर्‍यात बंदिस्त असल्याचं त्यांना आवडलं नाही. अशाप्रकारे शशांक यांचं बालमन पक्षी प्रेमाने झपाटलं होतं. शाळेत असताना ते दर आठवड्याचा सुट्टीचा दिवस मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आणि मुंबईतील इतर निसर्गरम्य ठिकाणी पक्षी निरीक्षणात घालवत. पक्षी निरीक्षण करता करता शशांक यांचा डॉ. अनीश अंधेरिया, डॉ. प्रवीश पांड्या या दिग्गज पर्यावरण अभ्यासकांबरोबर संपर्क आला. यांच्या सहवासात सतत निसर्गभ्रमंती केल्याने शशांक यांना पर्यावरण, पारिस्थितिकी, संवर्धन, वन्यजीवन यांचं प्रत्यक्ष ज्ञान मिळालं. इथूनच त्यांचा निसर्गशास्त्रज्ञ म्हणून प्रवास सुरू झाला. २०१० साली म्हैसूरच्या ‘वाईल्डलाईफ कॉन्झर्व्हेशन सोसायटी’ मध्ये शशांक यांनी पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला. तिथे त्यांचा पर्यावरण आणि वन्यजीव विषयक शास्त्रीय अभ्यास सुरू झाला. या अभ्यासात अनेक जागतिक पातळीवरच्या शास्त्रज्ञ आणि पर्यावरण तज्ज्ञांशी संपर्क आला. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना सोसायटीमध्येच एका प्रकल्पात ‘सहाय्यक संशोधक’ म्हणून काम मिळालं. या प्रकल्पांतर्गत कर्नाटकमधील पश्चिम घाटातील सुपारी, रबर आणि कॉफी यांच्या शेतीच्या आजूबाजूच्या जैवविविधतेचा अभ्यास त्यांनी केला.


ईशान्य भारत हा शशांक यांचा लहानपणापासूनचा आकर्षणाचा विषय होता. तिथल्या ‘इगलनेस्ट’ वन्यजीव अभयारण्यात काम करायची संधी त्यांनी सोडली नाही. आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, मणिपूर आणि मिझोराम या पाच राज्यांमध्ये वेगवेगळ्या लोकांसोबत आणि संस्थांसोबत तिथल्या विपुल जैवविविधतेचा त्यांना अभ्यास करायला मिळाला. सतीश यांचं पहिलं उल्लेखनीय काम म्हणजे पक्ष्यांची शिकार रोखण्याचं. २०१२ साली नागालँड राज्यामध्ये अमूर ससाण्याची मोठ्या प्रमाणावर शिकार होत असल्याचं त्यांच्या कानावर आलं होतं. सतीश आणि त्यांच्या सहकार्‍यांनी जंगलात फिरून आणि शिकार करणार्‍यांबरोबर संवाद साधून या प्रकाराबद्दल संपूर्ण माहिती मिळवली आणि त्यावर एक फिल्म बनवली. या फिल्मला संपूर्ण जगभर खूप प्रसिद्धी मिळाली. पक्ष्यांची शिकार रोखण्यासाठी जगभरातून मदतीचे हात पुढे आले. नागालँडच्या राज्य सरकारला ही फिल्म दाखवून त्यांचं सहकार्य मिळवलं. शिकारी लोकांमध्येही या फिल्मच्या माध्यमातून जनजागृती करून पक्ष्यांच्या संवर्धनाचं महत्त्व पटवून दिलं. नागालँड सरकार आणि स्थानिक शिकारी लोक यांच्यात समन्वय घडवून अमूर ससाण्यांची शिकार रोखण्यात शशांक यांना यश आलं. ‘‘संरक्षित प्रदेशांच्या बाहेर असणार्‍या प्रत्येक प्राणी आणि पक्ष्याच्या प्रजातीचा स्वतंत्रपणे अभ्यास करून तिच्या रक्षणासाठी प्रयत्न व्हायला हवेत,’’ असं शशांक दळवी सांगतात. हवामान बदलाचा पक्षी जीवनावर कसा परिणाम होतो, हे सतीश यांना २०१४ साली मलेशिया दौर्‍यात आढळून आलं. जमिनीलगत अधिवास असलेले पक्षी उंचीच्या भूप्रदेशावर आढळून आले. तसंच विषुववृत्तीय प्रदेशांवर असलेल्या पक्ष्यांचा अधिवास ध्रुवाकडे सरकल्याचं आढळलं. हवामान बदलाचा सर्वाधिक धोका हा ध्रुवीय प्रदेशातील पक्ष्यांना असल्याचं शशांक सांगतात. ब्रह्मपुत्रा नदीच्या खोर्‍यातल्या पक्षी प्रजातींवरही शशांक यांनी सखोल संशोधन केले आहे. ‘‘ज्या पक्षांची उडण्याची क्षमता कमी असते, त्या पक्ष्यांच्या संरक्षणासाठी विशेष काळजी घ्यावी लागते,’’ असा निष्कर्ष शशांक यांनी या अभ्यासातून काढला. संपूर्ण भारतात भ्रमंती करून सुमारे ११९० प्रकारच्या पक्ष्यांचे डॉक्युमेंटेशन त्यांनी केले आहे. ‘हिमालयन थ्रश’ या नव्याने शोधून काढलेल्या पक्ष्याच्या प्रजातीला त्यांनी विख्यात पक्षीशास्त्रज्ञ डॉ. सलीम अली यांच्या सन्मानार्थ ‘झूथेरा सलीम अली’ असं नाव दिलं. शशांक आणि त्यांच्या टीमने ‘वन्य’ नावाचं पक्ष्यांची पूर्ण माहिती असलेलं ऍप तयार केलं आहे. पक्षीनिरीक्षकांना आणि पर्यावरण क्षेत्रात काम करणार्‍या लोकांना एका व्यासपीठावर आणण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं शशांक सांगतात. भारतात पर्यावरण क्षेत्रात मनापासून झोकून देऊन काम करणार्‍या लोकांची संख्या निश्चितपणे वाढत आहे. शशांक दळवी यांचं कार्य पर्यावरण क्षेत्रात काम करू इच्छिणार्‍यांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.


- हर्षद तुळपुळे
@@AUTHORINFO_V1@@