ममतांचा दक्षिण दौरा

30 Mar 2018 11:43:16

१० एप्रिलपासून दोन दिवसीय चेन्नई दौऱ्यावर
 
एम.करुणानिधी यांची घेणार भेट




कोलकत्ता :
प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी या येत्या १० एप्रिलपासून तामिळनाडूच्या दोन दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत. तामिळनाडूमधील डीएमके पक्षाचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांच्या भेटीसाठी म्हणून ममता यांचा हा दौरा आयोजित करण्यात आल्याचे प. बंगाल मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

प.बंगाल मुख्यमंत्री कार्यालयाकडून आज सकाळीच ममतांच्या या दौऱ्याची घोषणा करण्यात आली आहे. आपल्या या दौऱ्यादरम्यान ममता या करुणानिधींसह डीएमके पक्षाचे सचिव एम.के. स्टालिन आणि पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांची देखील भेट घेणार आहेत. तसेच त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करणार असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले आहे. परंतु या भेटी दरम्यान नेमक्या कोणत्या विषयांवर चर्चा होणार हे मात्र कार्यालयाने स्पष्ट केलेले नाही.

मुख्यमंत्री कार्यालयाकडून जरी या दौऱ्याविषयी अधिक माहिती देण्यात आली नसली तरी देखील देशात नव्याने पुढे येत असलेल्या 'तिसऱ्या आघाडी'च्या विस्तारासाठीच ही हालचाल सुरु असल्याचे स्पष्ट झालेले आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या पुढाकाराने देशामध्ये संपुआ, रालोआनंतर आता आणखीन एक आघडी निर्माण होऊ लागली आहे. ज्यामध्ये ममता यांची देखील आता प्रमुख असल्याचे स्पष्ट दिसत आहे. २०१९ च्या निवडणुकांमध्ये भाजप आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षांना शह देण्यासाठी म्हणूनच तिसरी आघाडी निर्माण केली जात आहे, परंतु ममता आणि त्यांच्या सहकाऱ्यांना यामध्ये कितपत यश येणार, याचे उत्तर वेळच देईल.
Powered By Sangraha 9.0