पाकी अब्रूची लक्तरे...

    दिनांक  29-Mar-2018   
 

 
आपल्या कर्माची फळं याच जन्मात भोगावी लागतात, ते अगदी तंतोतंत खरं. कारण, कुलभूषण जाधवच्या आई आणि पत्नीला मंगळसूत्रांपासून ते कपडे-चपलाही बदलायला लावणार्‍या पाकिस्तानवर मोठी नामुष्कीची ओढवली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खक्कान अब्बासी यांची अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या केनेडी विमानतळावर चक्क झाडाझडती घेण्यात आली. यासंदर्भातला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामुळे पाकिस्तानमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
 
या व्हिडिओची सत्यता तरी अजूनही वादाच्या भोवर्‍यात आहे. पण, पाकिस्तानी माध्यमांनी यावर काहूर माजवले असून पंतप्रधानांनी केवळ त्यांचीच नव्हे, तर २२ कोटी पाकिस्तानी जनतेच्या अब्रूची लक्तरे सातासमुद्रापार टांगल्याच्या लोकक्षोभाच्या प्रतिक्रियांनी पाकमध्ये वातावरण खूपच तापले आहे. म्हणजे एरवी साधा भारताविरोधात क्रिकेट सामना हरल्यानंतर टीव्हीची क्रोधापायी तोडफोड करणारे शीघ्रकोपी पाकी या घटनेनंतर गप्प बसले असते तरच नवल. ठिकठिकाणी अब्बासी यांच्या विरोधात नारेबाजी आणि तीव्र शब्दांत मतप्रदर्शन करून त्यांचा जाहीर निषेध सुरु आहे. कारण, एखाद्या देशाच्या पंतप्रधानाला अशाप्रकारे सिक्युरिटी चेकच्या नावाखाली जॅकेट, बूट, पट्टा काढायला लावून अंगभर तपासणे हे नक्कीच राजनैतिक संबंधांच्या व्याख्येत बसत नाही. पण, या घटनेवरून एकूणच पाकिस्तानची आधीच खालावलेली आंतरराष्ट्रीय पत अधिकच डबघाईला गेली, हे मात्र निश्चित.
 
अब्बासी हे खरं तर गेल्या आठवड्यात आपल्या आजारी बहिणीला भेटण्यासाठी अमेरिकेत दाखल झाले. आपल्या या अमेरिकन भेटीदरम्यान त्यांनी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांचीही भेट घेतली. अर्थात, ट्रम्प यांनी अब्बासींना भेटण्याचे साधे सौजन्यही दाखवले नाही, यातच सर्व काही आले. पेन्स यांनीही अब्बासी यांना कानपिचक्या दिल्या आणि दहशतवादाविरोधात लढा आपल्या कृतीतून अधिक तीव्र करण्याचे आदेशही दिले. बिच्चारे अब्बासी, हे कमी की काय म्हणून विमानतळावरही त्यांच्या अब्रूचे असे धिंडवडे अमेरिकेने कुठलाही मुलाहिजा न बाळगता काढले.
 
खरं तर एखाद्या देशाचा पंतप्रधान, राष्ट्रपती तसेच सरकारी पातळीवरचे असेच उच्चपदस्थ यांची अशी झाडाझडती कुठल्याही देशात घेतली जात नाही. अमेरिकाही त्याला अपवाद नाहीच. पण, या प्रकरणामध्ये समोर आलेला मुद्दा म्हणजे, अब्बासी हे त्यांच्या खाजगी पासपोर्टवर अमेरिकेत प्रवास करत होते आणि त्यांच्याकडे त्यांचा पंतप्रधानपदाचा विशेष पासपोर्ट नव्हता. आता यात कितपत तथ्य आहे देवच जाणो, कारण एका देशाचा पंतप्रधान असा केवळ खासगी पासपोर्टवर अमेरिकेचा फेरफटका मारायला निघतो, ही बाब जरा पचणारीच. दुसरी गोष्ट म्हणजे, अब्बासी यांच्यासोबत सुरक्षारक्षकांचा ताफाही नव्हता. त्यामुळे जरी हा एका भावाचा आपल्या आजारी बहिणीला भेटण्यासाठीचा खासगी दौरा आहे, असे मानले तरी देशाचे पंतप्रधानपद अशा कारणांसाठी त्या व्यक्तीपासून इतक्या सहजपणे विलगही करता येत नाही. झाडाझडतीचा हा प्रकार होताना अब्बासी यांनीही एका शब्दाने अमेरिकेच्या या असभ्य वागणुकीचा विरोध दर्शविला नाही. कदाचित, असा निषेध करून आपली डाळ इथे शिजणार नाही, याची त्यांना कल्पनाच असावी. एकीकडे अब्बासींवर तुटून पडणारे पाकिस्तानी आहेत, तर दुसरीकडे अशी झाडाझडती त्यांनी मोकळेपणाने अमेरिकन सुरक्षाव्यवस्थेला घेऊ दिली, यात त्यांच्या मनाच्या मोठेपणाची थोरवी गाणारेही कमी नाहीत. ब्रिटनमध्येही म्हणे हे अब्बासी असेच एकटे फिरताना आढळले होते. असो... एकूणच काय, अमेरिकेच्या विमानतळावर पाकी पंतप्रधानांवर असा बाका प्रसंग ओढावत असेल तर तिथे सामान्य पाकिस्तानींची अमेरिकेत किंमत ती काय...म्हणा, जैसी करनी वैसी भरनी. पाकिस्तानच्या पंतप्रधानांना अपमानास्पद वागणूक देऊन अमेरिकेने जो संदेश द्यायचा, तो असा कडक कृतीतून दिलाच, पण अब्रूचे असे धिंडवडे निघूनही दहशतवादाला गोंजारणारे पाकिस्तान सुधारण्याची तरीही शक्यता धुसरच!
 
 
 
- विजय कुलकर्णी