एकान्त गमावलेली माणसं...

    दिनांक  28-Mar-2018   
सध्या खासगीपणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आधी, आधारच्या निमित्ताने वैयक्तिक माहिती गुप्त राहात नाही, ती सार्वजनिकच होत नाही तर तिचा गैरवापरदेखील होण्याची शक्यता आहे, अशी अवस्थता पसरली आहे. आमचे एक खासगी आयुष्य असतेच अन् ते तसेच निकोप असावे, असे प्रत्येकालाच वाटते. घटनादत्त कायद्याने तो अधिकारही आम्हाला दिला आहे. खासगी आयुष्याचा अधिकार मागत असताना त्यासोबत येणार्या कर्तव्यांनाही निष्ठांच्या अन् अस्मितांच्या गाभार्यात जागा ठेवायला हवी. तुमच्या खासगी आयुष्याची टोके बाहेर निघू नयेत अन् त्याच्या दंभात बाहेरचे सार्वजनिक जग पोळू नये, त्या सीमारेषांचा विवेक जागाच ठेवायला हवा. पुरुषार्थाची जी चार लक्षणे सांगितली आहेत, ती खासगीपणाशी निगडित आहेत. धर्म... धर्म आणि पूजा, इतर धार्मिक कार्य हे खासगी आहेत.
 
 
जगाच्या कल्याणाची त्यात कामना असली अन् व्यक्तीचा समष्टीकडे प्रवास त्यातूनच प्रारंभ होत असला; नव्हे, तसे होणेच अनुस्यूत असले तरीही जगाचे खासगीपण त्यामुळे ढवळून निघू नये, याची काळजी घेतलीच जायला हवी. आता आमचे सगळेच कसे सार्वजनिकच झाले आहे- अगदी धर्मदेखील. सार्वजनिक जीवनाचे सर्वच प्रवाह हे सत्तेपाशी म्हणजेच मग राजकारणाच्या दारातून जातात. सत्ता कशाही स्वरूपाची अन् विचारांची असली, तरीही तिला सार्वजनिक भल्याच्या शपथा घ्याव्याच लागत असतात. सत्तेची व्यवस्था कुठलीही असली, तरीही अखेर ती एकांगीच असते. राजकीय पक्ष आपल्या विचारधारेनेच चालत असतात अन् त्यांना जनतेचे भले व्हावे, असे जे काय वाटत असते त्यामागे ते आमच्याच विचारांनी आणि कार्यपद्धतीने व्हावे, असा त्यांचा अट्टहास असतोच. त्या अर्थाने कुठल्याही विचार आणि आचारधारेचा राजकीय पक्ष सत्तेत आला की, तो हुकूमशहाच असतो. राजकारणाला सत्ता हवी असते आणि त्यासाठी जनतेची शक्ती हवी असते. त्यामुळे समूहाच्या आस्थांचा, श्रद्धांचा अन् अस्मितांचा वापर ते त्यांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी करूनच घेत असतात. त्यामुळे धार्मिक खासगीपणाने आपली शीव कधीचीच ओलांडली आहे.
 
आम्ही रस्त्यावर पूजा करायला लागलो आहोत. नमाजही पडायला लागलो आहोत. आमच्या श्रद्धांचा, अस्मितांचा वापर आम्ही शक्तिप्रदर्शनासाठी करायला लागलो आहोत. रॅलीज्, शोभायात्रा अन् सण, उत्सव, आमच्या अस्मिता पुरुषांच्या जयंत्या अन् पुण्यतिथ्यांचे बटबटीत जाहीर प्रदर्शन, यामुळे सुप्त अशी लढाई जोरात सुरू झालेली आहे. आम्ही आमच्या पूर्वजांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रमही राजकीय शक्तिप्रदर्शनासाठी वापरतो. त्यातून तुमच्या शोभायात्रांपेक्षा आमच्या शोभायात्रा मोठ्या, तुमच्या मोचार्र्पेक्षा आमचे मोर्चे विशाल... असे सुरू झाले आहे. सार्वजनिक कोंदणात आपले व्यक्तिमत्त्व शोभिवंत खड्यासारखे असते, आता ते त्यात चिणून गेले आहे. एरवी खासगीतच असाव्या अशा बाबींचं नको तितकं सार्वत्रिकीकरण झाल्याने समाजमन दुर्गंधी झालेलं आहे, विद्रूप झालं आहे.
 
खासगीपण म्हणजे केवळ काम नव्हे, मोक्षही आहे. त्यामुळे ध्यान आहे, धारणा आहे, पूजा आहेत, पोथीवाचन आहे, व्रतदेखील आहेत... आता या सार्यांचंच सार्वजनिकीकरण झालं आहे. झालं आहे म्हणण्यापेक्षा ते करण्यात आलं आहे. त्याचा आम्ही बाजारच मांडला आहे. बाजारीकरण आणि उदारीकरणाने आमच्या हळव्या कोपर्यांचीही दुकाने करून टाकली आहेत. खासगीतलं असं काही राहिलेलंच नाही. लोक अंत:पुरात घालण्याचे कपडे सर्रास बाहेरही घालून वावरू लागले आहेत. कामक्रीडा मैदानांवर, बागांमध्ये अगदी एकान्त रस्त्याच्या कडेलाही दिसू लागल्या आहेत. मुलं मोबाईलवर क्रिकेट खेळतात आणि मैदानावर गर्लफ्रेंडला घेऊन बसलेली दिसतात... आमचे खासगीपण असे गहाण पडलेले असताना एकान्ताचा पार विचकाच झाला आहे. खासगीपण आणि एकान्त यात फरक असतो. एकान्त हा केवळ आणि केवळ तुमचा असतो. त्यात समाजाचे, कुटुंबाचे किंवा तुमच्या व्यतिरिक्त दुसर्या कुणाचेही काहीही घेणे-देणे नसते. कुणी त्यात डोकावण्याचा प्रयत्न केला तरीही जीव कळवळत असतो.
 
आता मात्र एकान्त असा कुठे राहिलेलाच नाही. एकान्तात स्वत:शी बोलणे होते. आपल्या रोजच्या जगण्याचा रवंथ करता येतो आणि मग त्यातून पोषक असे जे काय असते ते आत आत पाझरवून घेता येते. तसे आता राहिलेले नाही. मोबाईल आणि त्यावर जगाशी जोडले जाण्याचे जाळे यात आम्ही फसलो आहोत. देशात सत्ताधारी आणि विरोधकांत डेटा चोरीचे आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातला हा जो काय ‘डेटा’ आहे तो काय आहे? कुणाबद्दल आहे? या पक्षांच्या ऍपवरून जो काय डेटा बाहेर देशात पाठविला जातो तो काय आहे? हे राजकीय पक्ष आहेत आणि त्यांचा संबंध मतदारांशी असतो. कुठलाही राजकीय पक्ष जनतेकडे माणूस म्हणून बघत नाही. तो मतदार म्हणूनच बघतो आणि मतदाता म्हणून त्याच्या वर्तनाचा त्यांना अभ्यास करायचा असतो. एकतर आम्ही आमचे खासगी आयुष्य राजकारण आणि व्यापारीकरणाच्या दावणीला बांधले. इतके की आम्ही नमाज अन् आरत्या सार्वजनिक करायला लागलो अन् अंतर्वस्त्रे घातलेले पुतळे दुकानांत उभे करून टाकले! त्यानंतर आम्ही आमचा एकान्त समाजमाध्यमांकडे गहाण टाकला आहे. मोफत काहीच मिळत नसते, त्यातही व्यापारी, कारखानदार मोफत देण्याची भाषा करीत असेल, तर आम्ही सावधच व्हायला हवे असते. मात्र, आम्ही त्याला फसतो. आमचा मौल्यवान असा एकान्त आम्ही त्याच्या बदल्यात देऊन टाकत असतो, आमची अत्यंत खासगी माहिती आम्ही उधळून टाकत असतो, हे आमच्या लक्षातच येत नाही. यामुळे आमची व्यक्ती म्हणून ओळख राहिलीच नाही.
 
 
 
माणूसपण पुसले गेले. आम्ही आता केवळ समूह आहोत. आमचा एकान्त आम्ही गमावल्याने एकान्तात जे काय विकसित होतं ते समाजाला देण्यासारखंच असतं. ते आता आमच्याकडे राहिलेलं नाही. आम्ही आधी १० आकडी मोबाईल नंबर झालो होतो. आता आम्ही डेटा झालो आहोत. राजकीय पक्षांना मतदारांचे नेमके वर्तन काय असेल, अमक्या मतदारसंघात कुठल्या जातीचे, विचारांचे, समजुतीचे, आर्थिक स्थितीतले, धर्माचे मतदार आहेत आणि ते किती आहेत, ही माहिती हवी असते. आता जगात या डेटाच्या भरोशावर निवडणुका लढविल्या जातात. आपली प्रॉडक्ट विकली जात असतात. त्याची योजना तयार करण्यासाठी या डेटाचे विश्लेषण करायचे असते. ते मोठ्या कॉर्पोरेट हाऊसेसलाही हवे असते, गल्लीतल्या व्यापार्यांना हवे असते आणि मोठ्या राजकीय पक्षांनाही हवे असते. कारण प्रॉडक्ट सार्यांनाच विकायचे आहे. परदेशात तुमच्या एफबीवरच्या साध्या पोस्टवरून किंवा तुमच्या लाइक्सवरूनही त्या व्यक्तीची अवघी कुंडलीच मांडली जाते. अगदी तिचा स्वभाव आणि आवडनिवडीपर्यंत सगळा डेटा गोळा होत असतो आणि त्यावर या व्यक्तीला कशाप्रकारे प्रभावित करायचे, याची सोल्युशन्सही दिली जातात.
डेटा चोरीचा किंवा विक्रीचा आरोप राजकीय पक्ष करत आहेत, मात्र हा डेटा सामान्य माणसाचा आहे या देशातल्या. आमचे खासगीपण, एकान्त असा तुम्ही विकू आणि वापरू कसे शकता, हे जनतेनेच राजकारण्यांना अन् व्यापार्यांना विचारायला हवे. त्याचा खूप त्रास होतो आहे आणि त्यातून एक अस्वस्थता निर्माण होते आहे. त्या अस्वस्थतेचा स्फोट होऊन मग विकारी गैरकृत्य घडतात. ही व्यक्ती असे करेल असे वाटतच नव्हते, अशी प्रतिक्रिया उमटते. त्याचे कारण, तिला तिच्या वाट्याचा एकान्तच मिळत नाही. अगदी साधेच उदाहरण द्यायचे तर दहावी- बारावीला ज्यांची मुले आहेत त्यांना ट्युशन्स क्लासेस, प्रवेश परीक्षा मार्गदर्शन, टॅलेंट हंट, करीअर गायडन्स या नव्या शैक्षणिक दुकानदारांचे इतके फोन, एसएमएस येत आहेत की संताप होऊ लागला आहे. मार्केटमध्ये नवे प्रॉडक्ट आले की, लगेच मोबाईलवर त्याचा त्रास सुरू होतो. आता तर सेल्फ प्रमोशनने किळसवाणा स्तर गाठला आहे. त्यामुळे राजकारणी, दुकानदार, कंपन्या अन् ज्याला काही विकायचे आहे, असे सारेच आमच्या मोबाईलचा वापर फ्लॅश डिजिटल मशीनसारखा करून घ्यायला लागले आहेत. त्यांना आमच्या मोबाईल क्रमांकासह इतकी सखोल माहिती पुरविली कुणी? स्पष्टच विचारायचे तर कुणी विकली? एकान्त गमावलेल्या माणसांनी आमचे खासगीपण, एकान्त का विकलास म्हणून विकणार्याच्या अस्तनीला हात लावलाच पाहिजे!