आकाशाशी जडले नाते - रामचंद्र

    दिनांक  28-Mar-2018   


“आबा, आता मी रोज चंद्राचे निरीक्षण करत आहे. तर तो रोज उशिरा उशिरा उगवतो ! माणसाने कसे करायचं निरीक्षण?”, सुमित वैतागून म्हणाला.

“प्रेयसीची अातुरतेने वाट पाहणाऱ्या प्रेमीकाला ही वाट पाहण्याची कला अवगत आहे ! ती रोज वेगवेगळी वेशभूषा करणार, नवीन केशभूषा करणार. कालचे रुप वेगळे आजचे रूप वेगळे. असे नित्य नूतन दिसायला वेळ लागेलच ना ? पावडर बिवडर लावून नट्टापट्टा करून येणार म्हटल्यावर होईलच की उशीर!”, आबा म्हणाले.


आबांच्या बोलण्याने सुमितचा वैताग पार पळून गेला. “आबा, आज काय कवितेचा मूड दिसत आहे.”, सुमित हसत म्हणाला.

“छे रे! कवी कल्पना नाही काही, खरच सांगतोय. चंद्राला रोजच्या रोज वेश बदलून यायचे म्हणजे वेळ लागतो. चांगला तासभर वेळ घेतो. मग कालच्यापेक्षा आज एक तासभर उशिर आणि आजच्यापेक्षा उद्या एक तासभर उशिर होतो.”, आबा म्हणाले.

“शंकरराव, तुमचं आपलं काहीतरीच असत! आम्हाला कळेल असे सांगा!”, दुर्गाबाई म्हणाल्या.

“बर! आता नीट उकल करून सांगतो! त्यासाठी आपण चंद्रोदयाच्या ऐवजी चंद्र डोक्यावर असलेली वेळ घेऊ. तर समजा, आज बरोबर ७ वाजता आपल्या गावाचे तोंड चंद्राकडे आहे. म्हणजेच संध्याकाळी ७ वाजता चंद्र आपल्या डोक्यावर आहे. २४ तासात पृथ्वीची स्वत: भोवती एक गिरकी होते. मग २४ तासांनी, दुसऱ्या दिवशी ७ वाजता चंद्र परत डोक्यावर हवा. नाही का?


“पण होते असे की, या दरम्यान चंद्र त्याच्या पृथ्वीच्या भोवतीच्या कक्षेमध्ये फिरत फिरत पुढे गेला असतो. आता आली का पंचाईत ? आपल्या गावाचे तोंड परत चंद्राकडे येण्यासाठी पृथ्वीला आणखी थोडे फिरावे लागते. आणखी थोडे म्हणजे साधारण आणखी ५० मिनिटे. मग कालच्या पेक्षा तासभर उशिराने चंद्र पुन्हा डोक्यावर दिसतो. हेच चंद्रोदयाच्या बाबतीत होते. आणि तो रोज एक एक तास उशिराने उगवतो.”, आबा म्हणाले.“आता कळलं! पण आबा, तुम्ही तर वेश बदलायला वेळ लागतो म्हणाला होता?”, सुमित म्हणाला.

“Of course! चंद्र त्याच्या कक्षेत पुढे गेला की त्याची कला अर्थात त्याचा वेश बदलला असतो! म्हणून मी त्याला नवीन वेशात यायला वेळ लागतो असे म्हणलो!”, आबांनी खुलासा केला.

“बर आबा, चंद्र जर एका दिवसात पुढे जात असेल तर, उगवल्यापासून मावळेपर्यंत सुद्धा थोडा पुढे जात असेल ना?”, सुमितने विचारले.

“योग्य बोललास सुमित! प्रत्येक तासाला चंद्र साधारण १/२ अंश पुढे सरकतो. उगवता चंद्र एखाद्या ताऱ्याजवळ पहिला, तर मावळतांना त्या ताऱ्यापासून थोडा दूर गेलेला दिसतो!“शंकरराव, असा रोज रोज उशीर केल्याने चंद्रोदयाच्या वेळेच भजं होत असेल?”, दुर्गाबाईंनी विचारले.


“दुर्गाबाई, चंद्रोदयाच्या वेळेचं एक आखीव रेखीव गणित आहे. चंद्राच्या उगवायच्या वेळा तिथी प्रमाणे ठरलेल्या असतात. म्हणजे कसे बघा, अमावस्येचा चंद्र सूर्योदयाला उगवतो. पौर्णिमेचा चंद्र सूर्यास्ताला उगवतो. शुक्ल अष्टमीचा चंद्र माध्यानाला उगवतो. तर कृष्ण अष्टमीचा चंद्र मध्यरात्री उगवतो. आणि इतर तिथीचे चंद्रोदय त्या मधल्या वेळांमध्ये बसतात.


“यामध्ये सुद्धा फार गमती जमती आहेत बरे का! आता तुम्हाला हे माहीतच आहे की, पूर्वेकडे सूर्योदय आधी होतो. तसच पूर्वेच्या गावांमध्ये चंद्रोदय सुद्धा आधी होतो. उदाहरणच द्यायचे झालं, तर नागपुरात संकष्टीचा चंद्र पुण्याच्या आधी अर्धा तास उगवतो!

“आणिक काय होते, उन्हाळ्यात सूर्यास्त उशिरा होतो. त्यामुळे उन्हाळ्यातील पौर्णिमेचा चंद्र उशिरा उगवतो. थंडीत सूर्य लवकर मावळतो. तेंव्हा थंडीतल्या पौर्णिमेचा चंद्र लवकर उगवतो. पुण्यामध्ये जानेवारीतील पौर्णिमेचा चंद्र – संध्याकाळी ६:१५ च्या दरम्यान उगवेल, तर जून मधील पौर्णिमेचा चंद्र संध्याकाळी ७:३० च्या दरम्यान उगवेल.


“हा चंद्रोदयाच्या वेळेतला फरक आपण जितके उत्तरेला जाऊ, तितका जास्त दिसतो. जसे हेलसिंकी या फिनलंडच्या राजधानीत जानेवारीतील पौर्णिमेचा चंद्रोदय – दुपारी ४:०० च्या दरम्यान, तर जून मधील पौर्णिमेचा चंद्रोदय रात्री १०:३० दरम्यान होतो!”

“अबब! म्हणजे रेखांश, अक्षशांश, ऋतू आणि चंद्राची कला या सर्वांवर चंद्रोदयाची वेळ अवलंबून आहे!”, सुमित म्हणाला.


“अगदी बरोबर! तुला सांगतो काय सुमित, आकाशातील चंद्रोदय अतिशय रम्य आहे! मन प्रसन्न करणारा आहे! त्यात रोज बदल आहे. वेळेत बदल आहे. दिसण्यात बदल आहे. पण त्याचे बदल अत्यंत लयबद्ध आहे. कुठल्याशा वृत्तात बसवलेलं जणू ते एक काव्यच आहे! उगीच नाही मानवाला चंद्राने भुरळ घातली! अरे मनुष्याचे काय घेऊन बसलास ? देवाला सुद्धा चंद्रोदय फार फार आवडतो!”, आबा म्हणाले.

“काही पण! माणसाला आवडतो ते ठीक आहे, देवाला सुद्धा चंद्रोदय आवडतो हे कशावरून?”, सुमित म्हणाला.

“अरे, आता हेच पहा ना, संकष्ट चतुर्थीला चंद्रोदय झाल्यावर जेवायचे, असे व्रत भालचंद्र गणपतीसाठी घेतले जाते की नाही?


“काही देवांनी तर चंद्रोदयाची वेळ पाहूनच धरणीवर अवतार घेतला.


“जसे दत्ताचा जन्म आहे मार्गशीर्षातील पौर्णिमेचा. वेळ संध्याकाळी सूर्यास्ताची. ही वेळ आहे पौर्णिमेच्या चंद्रोदयाची!


“किंवा कृष्णाचा जन्म घे! तो आहे श्रावणातल्या कृष्ण अष्टमीचा. वेळ आहे मध्यरात्रीची. ही सुद्धा वेळ आहे चंद्रोदयाची.


“आणि, श्रीरामाचा जन्म चैत्र शुद्ध नवमीचा. भर दुपारी सूर्य माथ्यावर असतांना. ही वेळ आहे नवमीच्या चंद्रोदयाची. आणि हा सूर्यवंशातील राजा, नावात मात्र चंद्र धारण करतो – रामचंद्र!”- दिपाली पाटवदकर