ज्येष्ठ साहित्यिक गंगाधर पानतावणे यांचे निधन

    दिनांक  27-Mar-2018
औरंगाबाद : दलित विचारवंत आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गंगाधर विठोबाजी पानतावणे यांचे आज निधन झाले आहे. ते ८१ वर्षांचे होते. औरंगाबादमधील माणिक रुग्णालयामध्ये आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. पानतावणे यांच्या अचानकपणे जाण्याने साहित्यिक तसेच राजकीय विश्वातून हळहळव्यक्त केली जात आहे.

गेल्या काही महिन्यांपासून पानतावणे आजाराने ग्रस्त होते. त्यामुळे त्यांच्यावर सातत्याने इलाज सुरु होते. दरम्यान गेल्या आठवड्यामध्येच त्यांना भारत सरकारच्या पद्मश्री पुरस्काराने देखील गौरवण्यात आले होते. परंतु त्यानंतर मात्र त्यांची प्रकृती वेगाने ढासळू लागली. त्यामुळे त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले. या दरम्यान प्रकृतीत सुधारणा व्हावी, म्हणून डॉक्टरांकडून सर्व प्रकारचे प्रयत्न देखील करण्यात आले. परंतु औषधांचा कसलाही फरक न पडल्यामुळे आज पहाटे रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

पानतावणे यांच्या जाण्यावर साहित्यिक विश्वाबरोबरच राजकीय क्षेत्रातून देखील दु:ख व्यक्त केले जात आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तसेच विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी देखील पानतावणे यांच्या जाण्यावर दु:ख व्यक्त केले आहे. 'आपल्या साहित्याच्या माध्यमातून दुर्बल वंचितांच्या न्यायासाठी लढणारे पद्मश्री डॉ गंगाधर पानतावणे यांच्या निधनाने आपण एका जेष्ठ विचारवंतास लेखकास मुकलो आहोत', अशी प्रतिक्रिया मुंडे यांनी दिली आहे. तसेच त्यांचे साहित्य नेहमीच मार्गदर्शन देत राहील, असे देखील त्यांनी म्हटले आहे.

पानतावणे यांचा जन्म २८ जून १९३७ साली नागपूर येथे झाला होता. डी.सी. मिशन स्कूल येथे त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. तर नवयुग विद्यालय आणि पटवर्धन हायस्कूल नागपूर येथे माध्यमिक शिक्षण झाले. १९५६ साली मॅट्रिकची परिक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर नागपूर महाविद्यालयातून त्यांनी बी. ए. आणि एम. ए. ची पदवी मिळवली. मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी पी. एच. डी. ची पदवीही मिळवली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक म्हणून ते कार्यरत होते.
त्यानंतर त्यांनी विविध विषयांवर विपूल लेखन केले. दलित साहित्याचा त्यांचा सखोल अभ्यास होता. त्यामुळे त्यांनी केलेले बरेच लेखन हे दलित साहित्याच्या अनुषंगाने असेच आहे. त्यापैकी `धम्मचर्चा` `मूल्यवेध` , मुकनायक, विदोहाचे पाणी पेटले आहे, वादळाचे वंशज, दलित वैचारिक वाड्गमय, किल्ले पन्हाळा ते किल्ले् विशाळगड, साहित्य, प्रकृती आणि प्रवृत्ती, साहित्य शोध आणि संवाद हे सर्व ग्रंथ अत्यंत गाजले. तसेच अस्तितादर्श` या नियतकालिकाच्या संपादकपदाची महत्वपूर्ण जबाबदारीही त्यांनी घेतली होती. दलित आत्मकथा, दलित साहित्य, चर्चा आणि चिंतन, लोकरंग, स्त्री आत्मकथन, महारांचा सांस्कृतिक इतिहास हे त्यांनी संपादन केलेले काही ग्रंथ आहेत. साहित्यातील त्यांच्या या भरीव योगदानासाठीच त्यांना यंदाचा पद्मश्री पुरस्कार देखील देण्यात आला होता.