भिडे गुरुजींच्या समर्थनार्थ उद्या मोर्चा

27 Mar 2018 11:31:23

 जिल्हाभरातून धारकरी होणार सहभागी

 
 
जळगाव :
संभाजीराव भिडे गुरुजी यांच्यावर होणार्‍या खोट्या आरोपांच्या विरोधात, तसेच त्यांना समर्थन देण्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि हिंदुत्ववादी संघटनांतर्फे बुधवार, २८ रोजी सकाळी ११ वाजता शिवतीर्थ चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये जिल्ह्यातून धारकरी सहभागी होणार आहेत.
 
 
कोरेगाव भीमा प्रकरणात विनाकारण भिडे गुरुजींचे नाव गोवणार्‍या नक्षलवाद समर्थक शक्तींच्या विरोधासाठी, याच प्रकरणात गोरक्षक आणि समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांना विनाकारण झालेल्या अटकेच्या निषेधासाठी, मोहसीन खान खून प्रकरणात आजपर्यंत एकही आरोप कोर्टात सिध्द झाला नसताना गेली चार वर्षे धनंजय देसाई यांना विनाकारण तुरुंगात ठेवण्याच्या विरोधात हा मोर्चा असल्याचे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे कळविण्यात आले आहे.
 

मोर्चाला ‘हिंदू जनजागृती’चा पाठिंबा - युवकांना राष्ट्रप्रेम आणि शिवप्रेमाचे धडे देणार्‍या संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर केवळ कुणीतरी तक्रार दिली म्हणून शासनाने गुन्हा दाखल करणे हे हिंदूंसाठी वेदनादायी असल्याचे हिंदू जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट यांनी म्हटले आहे. भिडे गुरुजी यांच्यावर होणार्‍या खोट्या आरोपांच्या विरोधात, तसेच त्यांना समर्थन देण्यासाठी २८ मार्च रोजी निघणार्‍या मोर्चाला पाठिंबा असल्याचे घनवट यांनी कळविले आहे. तसेच ३ जानेवारीला बंदकाळात राज्यातील सार्वजनिक मालमत्तेची जी हानी झाली त्याची नुकसानभरपाई आंदोलकांकडूनच वसूल करावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार प्रकाश आंबेडकर आणि त्यांचे समर्थक यांच्याकडून ही रक्कम वसूल करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Powered By Sangraha 9.0