अर्जुन कोण? श्रीकृष्ण कोण?

    दिनांक  26-Mar-2018   

 
भाजपशी हिंदूपणाच्या मुद्द्यावरून लढणे सोपे काम नाही. महाभारताचीच उपमा घ्यायची, तर पांडवांशी धर्माच्या मुद्द्यावरून लढणे कौरवांना अशक्य होते. कारण, पांडवांच्या पक्षात श्रीकृष्ण होते आणि त्यांनीच म्हटले होते की, जेथे धर्म आहे तेथे विजय आहे. राहुल गांधी काय म्हणतात, यापेक्षा जनता भाजपकडे कोणत्या दृष्टीने पाहते हे महत्त्वाचे. भाजपने ‘हिंदूपणा’चा विषय आपल्या जन्मापासून सोडलेला नाही. त्यासाठी पांडवांपेक्षाही अधिक काळाचा वनवास त्याने सोसला आहे. अनेक प्रकारच्या अवहेलना सहन केल्या आणि शेवटी आपल्या त्याग आणि तपस्येच्या बळावर हस्तिनापूरचे (दिल्लीचे) सिंहासन मिळविले. राहुल गांधींना खर्‍या अर्थाने कृष्ण आणि अर्जुन बनावे लागेल. ते त्यांच्या डीएनएमध्ये आहे का? हाच खरा प्रश्न आहे.
 
चैत्रपालवी फुटली आणि कोकिळेचे कूजन सुरू झाले की, वसंताचे आगमन झाले, असा अर्थ होतो. त्याचप्रमाणे राजकीय क्षेत्रात प्रादेशिक आणि राष्ट्रीय नेते सत्तेवर असलेल्या पक्षाविषयी जेव्हा उच्च स्वरात भाषणे करू लागतात, तेव्हा समजायचे की निवडणुका जवळ आलेल्या आहेत. लोकशाही म्हटले की या सगळ्या गोष्टी अपरिहार्य होतात. अशा वेळी होणारी सर्व भाषणे एका अर्थाने राजकीय करमणुकीची भाषणे असतात. भाषण ऐकणार्‍या एखाद्या श्रोत्याला विचारले की, तो उत्तर देतो, ‘‘भाषणात फार मजा आली.’’ शिवतीर्थावरील राज ठाकरे यांचे भाषण आणि राहुल गांधी यांचे नव्या दिल्लीतील भाषण असेच भरपूर राजकीय करमणूक करणारे होते. हे दोन नेते तरी काय करणार? मोदी सरकारविषयी बोलल्याशिवाय आणि तेही अत्यंत वरच्या पट्टीत, त्यांची नेता म्हणून प्रतिमा उंचावत नाही. राजकीय खेळातील हा नाइलाज आहे. आज सत्तेवर जे बसले आहेत, ते सत्तेत नसताना हेच काम करीत होते. आज त्यांना विरोधी पक्षनेत्यांचे शब्दांचे बॉम्बगोळे झेलावे लागतात. हीच लोकशाहीची गंमत आहे.
 
पुढच्या निवडणुकीत मोदींचा पराभव केला पाहिजे, याबाबतत राज ठाकरे आणि राहुल गांधी यांचे एकमत झाले आहे. विरोधी पक्षात, सत्ताधारी पक्षाविरूद्ध एकमत व्हायला वेळ लागत नाही. सत्ताधारी पक्ष सत्तेवरून गेल्याशिवाय त्याजागी त्यांना जाता येत नाही, त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष ‘सत्ताधारी पक्षाला हाकलले पाहिजे, मोदीमुक्त भारत केला पाहिजे,’ असे म्हणत राहतो. मोदींनी २०१४ च्या निवडणुकीत ‘कॉंग्रेसमुक्त भारत’ची घोषणा केली, त्याची नक्कल करीत आता विरोधी पक्ष म्हणत आहे, ‘मोदीमुक्त भारत’ केला पाहिजे. ‘मोदीमुक्त भारत’ करण्यासाठी सगळ्या पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, तेलुगू देसम, डावे, तृणमूल कॉंग्रेस, बसपा, सपा यापैकी कोणत्याही पक्षात स्वतःच्या ताकदीवर भारताला ‘मोदीमुक्त’ करता येणार नाही. सर्वांची शक्ती एकवटली तर भारत ‘मोदीमुक्त’ होईल की नाही माहीत नाही, पण लढत चांगली होईल, हे नक्की. वरच्या पट्टीत केलेल्या भाषणाने टाळ्या मिळतात आणि श्रोते खुश होतात. याने निवडणुका जिंकता येत नाहीत. निवडणुका जिंकण्यासाठी भाषणे ऐकणारा, मतदार व्हावा लागतो. नुसता मतदार होऊन चालत नाही, मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर जाऊन त्याने मत द्यावे लागते. घरात झोपून किंवा सुट्टी आहे म्हणून बाहेर फिरायला जाऊन चालत नाही. आपल्या पक्षाचा मतदार करणे, हे एवढे सोपे काम नाही आणि त्याहूनही कठीण काम मतदानाच्या दिवशी त्याला मत देण्यासाठी मतदान केंद्रावर आणण्याचे असते. जो पक्ष ही दोन्ही कामे सक्षमपणे करेल, तो निवडणुका जिंकतो. जे केवळ भाषणे करीत राहतात, ते मदार्‍यांसारखाच खेळ करीत बसतात. जनतेला मतदार बनविण्यासाठी अनेक प्रकारचे विषय लागतात. कधी महागाई, कधी भ्रष्टाचार, कधी सुशासन, कधी विकास, तर कधी पाकिस्तान इत्यादी सर्व विषय जनतेला मतदार बनविण्यासाठी कामाला येतात. २०१९ च्या निवडणुकीची ही तयारी चालू आहे, त्यात यापैकी कोणता विषय पुढे येईल? एकदा वापरलेला विषय पुन्हा पुन्हा वापरता येत नाही. दरवेळी नवीन विषय पुढे आणावा लागतो. राज्यकारभारावर टीका करणे आणि सत्ताधारी पक्ष केवळ आश्र्वासने देतो, काही करीत नाही, हे सतत सांगत राहणे त्या मानाने खूप सोपे काम आहे. परंतु, अशा विषयात खरे म्हणजे काही दम नसतो. सत्तेत बसलेला प्रत्येक पक्ष त्याच्या-त्याच्या कुवतीप्रमाणे जनहिताची कामे करतच असतो. सर्व विरोधी पक्षांची भाषणे (गेल्या २० वर्षांत) खरी मानली तर, आपला देश अधोगतीची खाण आहे, असे म्हणावे लागेल. असे तुम्ही किंवा मी दोघेही म्हणू शकत नाही. म्हणून या विषयांचा मतदार बनविण्यासाठी काही उपयोग नसतो. मतदार बनविण्यासाठी जात, उपासना धर्म, भाषा, यांचा खूप उपयोग असतो. भाषेचा प्रयोग दक्षिणेच्या राज्यांत वारंवार होतो. कर्नाटकात तो आता चालू आहे. तामिळनाडू याबाबत फार संवेदनशील आहे. जातीचा प्रयोग महाराष्ट्रात चालू असतो. उत्तर प्रदेश ही त्याची सर्वात मोठी कर्मभूमी आहे. जो जातीय समीकरणे बरोबर बसवितो, तो विजयी होतो. राहुल गांधी यांनी नुकत्याच झालेल्या गुजरातच्या निवडणुकीत तसे करण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना मर्यादित यश मिळाले. फुलपूर आणि गोरखपूर येथील विजय जातीय समीकरणाचे विषय आहेत. अशा वेळी विकास, महागाई, बेरोजगारी इत्यादी विषय दुय्यम ठरतात.
 
यापेक्षा सगळ्यात मोठा विषय हिंदूपणाच्या भावनेला आवाहन करण्याचा आहे. सोनिया गांधी म्हणाल्या की, ‘‘२०१४ च्या निवडणुकीत कॉंग्रेसची प्रतिमा ‘मुसलमानांचा पक्ष’ अशी बनवण्यात आली. लोकांना ती खरी वाटली.’’ आता राहुल गांधी ही प्रतिमा बदलण्याच्या मागे आहेत. गुजरात निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी अनेक मंदिरांना भेटी दिल्या. आता दिल्लीत भाषण करताना त्यांनी एकदम महाभारतालाच हात घातला. सत्ताधारी पक्ष कौरव आहेत आणि आम्ही पांडव आहोत, असे विधान त्यांनी केले. राहुल गांधी यांना एकदम महाभारतात जावेसे का वाटले? त्याचे उत्तर असे की, महाभारताची परिभाषा, सामान्य हिंदू माणसाला समजते आणि त्या भाषेत बोलले की, आपण सामान्य माणसाशी जोडले जातो. इथून पुढे कॉंग्रेस हा ‘हिंदूकरणा’चा विषय पुढे कशा प्रकारे घेऊन जाणार आहे, हे बघावे लागेल. तो नेल्याशिवाय कॉंग्रेसला ‘अच्छे दिन’ येणे कठीण आहे. राहुल गांधींपुढे या संदर्भात अनेक आव्हाने आहेत. त्यांचे डावे मित्रपक्ष ही भाषा स्वीकारतील का? महाराष्ट्रातील पुरोगामी सम्राट ही भाषा स्वीकारतील का? दलितांचे नेतृत्त्व ही भाषा स्वीकारेल का? स्वतःला कट्टर सेक्युलरिस्ट समजणारे ही महाभारताची भाषा मान्य करतील का? या सर्व अडथळ्याच्या शर्यती आहेत. त्या कॉंग्रेसला पार कराव्या लागतील. आज कॉंग्रेसचा शक्तिक्षय प्रमाणाबाहेर झालेला आहे. शक्तिस्थानी असणारी कॉंग्रेस आणि दुर्बळ कॉंग्रेस यामध्ये जे अंतर आहे, तेच अंतर सगळ्या विरोधी पक्षाची मोट बांधण्याचे अंतर आहे. उत्तर प्रदेशच्या पोटनिवडणुकीत भाजप हरला, परंतु कॉंग्रेस जिंकली नाही, हेही तेवढेच महत्त्वाचे. ईशान्येच्या राज्यातही कॉंग्रेसला शक्तिमान करणारा विजय मिळालेला नाही. म्हणून कॉंग्रेसबरोबर जात असताना, प्रादेशिक पक्ष आपल्या प्रदेशात आपण बलवान बनू, याची चिंता करतील, ते कॉंग्रेसला बलवान करणार नाहीत. यासाठी ‘मोदीमुक्त भारता’ची विषयसूची विरोधी पक्षात चैतन्य निर्माण करण्याच्या दृष्टीने उपयोगाची असली तरी, ती प्रत्यक्षात येताना अनंत प्रकारच्या अडचणी आहेत. भाजपशी ‘हिंदूपणा’च्या मुद्द्यावरून लढणे सोपे काम नाही. महाभारताचीच उपमा घ्यायची तर पांडवांशी धर्माच्या मुद्द्यावरून लढणे कौरवांना अशक्य होते. कारण, पांडवांच्या पक्षात श्रीकृष्ण होते आणि त्यांनीच म्हटले होते की, जेथे धर्म आहे, तेथे विजय आहे. राहुल गांधी काय म्हणतात, यापेक्षा जनता भाजपकडे कोणत्या दृष्टीने पाहते हे महत्त्वाचे. भाजपने ‘हिंदूपणा’चा विषय आपल्या जन्मापासून सोडलेला नाही. त्यासाठी त्याने पांडवांपेक्षाही अधिक काळ वनवास सोसला. अनेक प्रकारच्या अवहेलना सहन केल्या आणि शेवटी आपल्या त्याग आणि तपस्येच्या बळावर हस्तिनापूरचे (दिल्लीचे) सिंहासन मिळविले. राहुल गांधींना खर्‍या अर्थाने कृष्ण आणि अर्जुन बनावे लागेल. ते त्यांच्या डीएनएमध्ये आहे का? हाच खरा प्रश्न आहे.
 
 
राहुल गांधींचा डीएनए नेहरू-गांधी घराण्याचा आहे. हे घराणे हिंदूहिताची चिंता करणारे मानले जात नाही. त्यांना देशातील अल्पसंख्याकांची फार चिंता असते. मुसलमान आणि ख्रिश्र्चन यांचे धर्मस्वातंत्र्य, त्यांचे संरक्षण, याचीच चिंता या घराण्याने सातत्याने केली. चिंता करण्यात वाईट काही नाही. परंतु, एकाला झुकते माप आणि दुसर्‍याला लाथ हा अन्याय झाला. हजयात्रेला सबसिडी आणि अमरनाथ यात्रेवर कर, अजमेरच्या दर्ग्याला सर्व संरक्षण आणि शिर्डीच्या साईबाबांवर सरकारी प्रशासक, हे दुटप्पी धोरण झाले. धर्मन्याय सर्वांवर सारखा करावा लागतो. घाटीतील मुसलमानांना अब्जावधी रूपयांची खिरापत आणि ईशान्येतील राज्यांना शिळ्या भाकरीचे तुकडे, हाही अन्याय झाला. राहुल गांधींचे घराणे यासाठी ओळखले जाते. या घराण्याचा वारसा त्यांना नाकारावा लागेल आणि पुढे जाण्याचा नवीन ‘रोड मॅप’ तयार करावा लागेल. लक्षात ठेवावे लागेल की, भारतात ८० टक्के हिंदू आहेत, त्यांच्या नैसर्गिक आकांक्षांना दाबून कोणाला राज्य करता येणार नाही. भाजपशी स्पर्धा करायची असेल, तर ती याच मुद्द्यावर होऊ शकते. भ्रष्टाचार, महागाई, रोजगार, हे सगळे विषय महत्त्वाचे असले तरी निवडणूक फिरविणारे विषय होत नाहीत. जो पक्ष हिंदू समाजाविरोधी भूमिका घईल, त्याचे दिवस भरले आहेत, हे नीट लक्षात ठेवायला पाहिजे. राहुल गांधींनी स्वतःकडे पांडवांची भूमिका घेतली आहे. महाभारत त्यांनी वाचले आहे, असे आपण गृहीत धरूयात. महाभारताचे युद्ध तीन व्यक्तींमुळे जिंकले गेले. पहिली व्यक्ती आहे- द्रौपदी. तिने आपल्या पतींचे तेज सतत जागे ठेवले. दुसरा आहे- अर्जुन, आणि तिसरा आहे श्रीकृष्ण. संभ्रमित अर्जुनाला श्रीकृष्णाने गीता सांगून लढण्यास प्रवृत्त केले. अर्जुनाची भूमिका हिंदू समाजाने घेतली. अंगात सर्व प्रकारचे बळ असूनही तो संभ्रमित झाला, त्याला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देण्याचे काम श्रीकृष्णाच्या रूपाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केले. महाभारताचे युद्ध जिंकण्यासाठी अर्जुन आणि कृष्ण आवश्यक असतात. राहुल गांधी आज तरी अर्जुन बनू शकत नाहीत आणि कृष्ण बनण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणून त्यांनी महाभारताची उपमा जरूरीपेक्षा जास्त न ताणलेली बरी.
 
 
 
- रमेश पतंगे