पाकी राष्ट्रगीताचा काश्मिरी राग

    दिनांक  24-Mar-2018   
 

 
धुमसत्या जम्मू-काश्मीरमध्ये फुटीरतावाद्यांना हातचे बाहुले बनवून भारताला डिवचण्याचा पाकचा खेळ सुरूच आहे. एनआयएकडून झालेल्या चौकशीअंती तरी या फुटीरतावाद्यांचे ‘नापाक’ कनेक्शनही वेळोवेळी उघड झाले. पण, तरीही भारताविरोधी गरळ ओकण्याच्या त्यांच्या पाकधार्जिण्या मनसुब्यांवर तसूभरही फरक पडलेला दिसत नाही. खोर्‍यामध्ये मध्येच दगडफेक सुरू करणे, जवानांची अडवणूक करून त्यांच्या कामात सातत्याने व्यत्यय निर्माण करणे यासाठी फुटीरतावाद्यांनी पैशावर पोसलेली काश्मिरी तरुणांची टोळकी आघाडीवर असतात. कमी शिक्षण, त्यात मुबलक रोजगाराच्या संधी आणि धर्मांधळेपणाचा पगडा यामुळे काश्मिरी तरुण वाट चुकतो अन् फुटीरतावाद्यांच्या नादाला लागून आयुष्याची राखरांगोळी करून घेतो पण, या फुटीरतावाद्यांना त्याच्याशी काही देणे-घेणे नाही. कारण, भारतद्वेषाच्या फुत्कारांसाठीच त्यांची झोळी भरली जाते. त्यांचे पाकप्रेमइतके उफाळून येते की, काश्मीरची भूमी ही जणू पाकिस्तानातच असल्याच्या नादात पाकी राष्ट्रध्वज फडकाविला जातो, पाकी राष्ट्रगीताची उच्चरवाने उपासना केली जाते.... हे सगळे का? तर केवळ आणि केवळ पाकिस्तान हे इस्लामधर्माधिष्ठित राष्ट्र आहे म्हणून....
 
असाच काहीसा प्रकार गुरुवारी श्रीनगरमध्येही घडला. तिथेही चांदवाले हिरवे झेंडे फडकाविले गेले आणि पाकी राष्ट्रगीताचे सामूहिक गान करण्यात आले. यामध्ये फारसे नवीन आणि धक्कादायक काही नसले तरी विशेष बाब म्हणजे फुटीरतावादी महिलांच्या गटाने हा महाप्रताप केला. ’दुखातरन-ए-मिल्लत’ नावाच्या फुटीरतावादी महिलांच्या एका गटाने पाकचा ’राष्ट्रीय दिन’ असा श्रीनगरमध्ये साजरा केला. यासंबंधीचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामधील बुरखाधारी महिला म्हणते की, ‘‘आमच्यासाठी लोकं एक तर मुसलमान तरी असतात, नाही तर काफीर तरी. पाकिस्तान हा मुसलमानांचा देश असून त्याची निर्मिती नागरिकत्वाच्या मुद्द्यावर नव्हे तर इस्लामच्या धर्तीवर झाली आहे. त्यामुळे ही जमीन (काश्मीर) आपलीच आहे, पण भारताने ती बळकावली आहे.’’ अशा या पाकिस्तानप्रेमाच्या हिरव्या पट्टीने डोळे झाकलेल्या, ‘काश्मिरीयत’ची दुहाई देणार्‍या फुटीरतावाद्यांची मुळेच जोपर्यंत पूर्णपणे उखडून फेकली जात नाहीत, तोपर्यंत असेच पाकचे राष्ट्रीय दिन साजरे होत राहतील, त्यांचा ध्वज काश्मिरात झळकेल अन् त्यांच्या राष्ट्रगीताचे सूर खोर्‍यातील भारताभिमानाचा गळा घोटत राहतील.
 
 
0000000000000000000000000000000000000000000000000
  
‘इंडिया’, ‘भारत’ आणि नोटाबंदी
 
२०१६ च्या नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीची ऐतिहासिक घोषणा केली. एका रात्रीत ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून हद्दपार झाल्या. काळा पैसा, बेनामी कंपन्यांवर मोदींनी केलेल्या या ‘सर्जिकल स्ट्राईक’च्या धक्क्याची अगदी जगभर चर्चा झाली. कोणी एका आवाजात या नोटाबंदीचे समर्थन केले तर मोदीद्वेष्ट्या टीकाकारांना मोदींवर तोंडसुख घेण्याची आयती संधीच मिळाली. मग त्यामध्ये नामी अर्थतज्ज्ञांपासून ते अगदी रघुराम राजनसारख्या रिझर्व्ह बँकेच्या माजी गव्हर्नरांपर्यंत झाडून सगळ्यांनी नोटाबंदी कशी फसवी आहे, याचे तपशीलवार आकडे मांडले. माध्यमांनीही आततायीपणा दाखवत नोटाबंदीची खिल्ली उडवली आणि ही जाचक नोटाबंदी कशी भारतीयांच्या मुळावर उठली आहे, याचे ढोल बडवले गेले. आज पुनश्च नोटाबंदीच्या परिस्थितीची उजळणी करण्याचे कारण की, इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी केलेले एक महत्त्वपूर्ण विधान.
 
नारायण मूर्ती नुकत्याच एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, ’’नोटाबंदीचे शहराकडे स्वागत झाले नसले तरी ग्रामीण भागात नोटाबंदीच्या निर्णयाला आनंदाने स्वीकृती मिळाली.’’ याचाच अर्थ ‘इंडिया’ने नोटाबंदीला नाकारले, तर ‘भारता’ने नोटाबंदीची परिस्थिती मोकळेपणाने स्वीकारली. आपल्या भाषणात पुढे बोलताना नारायण मूर्ती यांनी प्रांजळपणे हेही कबूल केले की,‘‘मी काही त्यातला तज्ज्ञ नाही. याबाबत अर्थतज्ज्ञच अधिक बोलू शकतील.’’ पण, नारायण मूर्तींसारखा मुरब्बी उद्योजक आणि जाणकार एवढे मोठे विधान कुठल्याही आधार-तथ्याशिवाय किंवा निरीक्षणाशिवाय करणार नाही, हे नक्की.
 
मूर्ती यांनी पुढे याचे काही ठोस कारण स्पष्ट केले नसले तरी त्यांनी मांडलेले निरीक्षण निश्चितच विचार करायला लावणारे आहे. ग्रामीण भारताने नोटाबंदी आनंदाने स्वीकारल्याची प्रमुख कारणे म्हणजे एकतर तिथे फारसे मोठे व्यापार, उद्योग प्रस्थापित नाहीत. त्यामुळे व्यवहार होत असले तरी ते तितक्या मोठ्या प्रमाणात, चलनाचे नाही. दुसरी गोष्ट म्हणजे, ग्रामीण जनतेचा शहरी जनतेपेक्षा शासकीय यंत्रणेशी अधिक जवळचा संबंध येतो. तेव्हा, नोटाबंदीमुळे भ्रष्टाचाराला चाप बसेल, या आशेखातरही ग्रामीण भारतात नोटाबंदीबाबत सकारात्मकता दिसली. तिसरे कारण म्हणजे, साहजिकच शहरांच्या तुलनेत असलेली कमी लोकसंख्या, त्यामुळे नोटाबंदीचा फारसा फटका ग्रामीण भारताला बसलेला नाही. तेव्हा, नारायण मूर्तींचे ही निरीक्षण निश्चितच दुर्लक्षून चालणार नाही.
 
 
 
 
- विजय कुलकर्णी