जलजागृती हा संस्कार व्हावा : जिल्हाधिकारी

    दिनांक  23-Mar-2018


बुलडाणा : अपुरा आणि अनियमित पाऊस तसेच अनिर्बंध होणारा पाण्याचा उपसा यामुळे सध्या पाणी हा काटकसरीचा विषय बनला आहे. त्यामुळे जलजागृती ही फक्त सांगण्यापुरती नसून ती प्रत्येकाचा संस्कार बनायला हवी, असे वक्तव्य जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित 'जलजागृती' सप्ताहाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

विदर्भामध्ये प्रत्येक वेळी पाऊस हा अनियमित स्वरुपात होत असतो. त्यामुळे या भागात जमिनीवरील जलस्तोत्रांमध्ये पाणीसाठा हा मर्यादित स्वरुपात जमा होतो. तसेच पाण्याचा दरडोई वापरत वाढत चालला असल्यामुळे परिणामी भूजल साठ्यांचा मोठ्या प्रमाणात उपसा केला जातो. त्यामुळे पाण्याचा जेवढा उपयोग आपण करतो, त्यापेक्षा जास्त पाण्याची बचत करायला शिकले पाहिजे, असे जिल्हाधिकारी पुलकुंडवार यांनी सांगितले.

प्रास्ताविकात अधिक्षक अभियंता नितीन सुपेकर म्हणाले, जलसंपदा विभागाचा मुख्य संपर्क हा धरणाच्या लाभक्षेत्रात येणारे लाभधारक, भूधारक यांच्याशी येतो. हा शेतकरी किंवा भूधारक जेव्हा त्यागाची भावना ठेवतो. त्यातूनच जलसंपदा विभागाला काम करण्याची संधी मिळते व मोठे, मध्यम, लघू प्रकल्प आकारास येतात. जलजागृती केवळ सप्ताहापुरती मर्यादीत न राहता नागरिकांनी सतत पाण्याबाबत जागरूक असले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.