अण्णांकडून पुन्हा एकदा 'उपोषणास्त्र'

23 Mar 2018 09:41:53

नवी दिल्लीत आजपासून उपोषणाला सुरुवात




नवी दिल्ली :
लोकपाल बिल आणि शेतकऱ्यांच्या समस्या यावर तातडीने तोडगा काढण्यात यावा, यामागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे आजपासून पुन्हा एकदा आपल्या उपोषणाला सुरुवात करत आहेत. नवी दिल्ली येथील रामलीला मैदानावर अण्णा आजपासून आपल्या उपोषणाला सुरुवात करणार असून सरकार जो पर्यंत आपल्या मागण्या मान्य करणार नाही, तोपर्यंत हे उपोषण असे सुरु राहणार असल्याचा इशारा अण्णांनी दिला आहे.


आज सकाळीच अण्णांनी राजघाट येथे जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीचे दर्शन घेतले. तसेच त्यांना पुष्प अर्पण आपल्या आंदोलनाचा संकल्प केला. यानंतर आज दुपारी उपोषणासाठी अण्णा रामलीला मैदानावर दाखल होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे रामलीला मैदानावर कडक सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच अण्णांच्या समर्थनासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुविधेसाठी देखील याठिकाणी एक भलामोठा मांडव उभारण्यात आला आहे.


दरम्यान नवी दिल्लीकडे येणाऱ्या काही गाड्या आज बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सरकार नागरिकांचा आवाज दाबत असल्याचा आरोप अण्णांनी केला आहे. 'माझ्या समर्थांनासाठी येणाऱ्या नागरिकांना अडवण्यासाठी सरकारने आज मुद्दाम गाड्या बंद ठेवल्या आहेत' असे अण्णांनी म्हटले आहे.


तसेच काही राजकीय नेत्यांकडून अण्णांच्या या उपोषणावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. कॉंग्रेसचे माजी नेते तहसीन पूनावाला यांनी अशा प्रकारची उपरोधक टीका केली आहे.



२०११ ची होणार पुनरावृत्ती ?

या अगोदर २०११ मध्ये देखील अण्णा याच ठिकाणी उपोषणाला बसले होते. केंद्र सरकारने तातडीने लोकपालची नियुक्ती करावी, या मागणीसाठी त्यांनी उपोषण सुरु केले होते. तब्बल ११ दिवस चाललेल्या या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. तसेच अनेक नवे चेहरे देखील भारतीय राजकारणाला मिळाले होते. 

Powered By Sangraha 9.0