मालदीवमधील आणीबाणी मागे

    दिनांक  23-Mar-2018

भारताकडून मालदीवच्या निर्णयाचे स्वागत

 

मालदीव :
गेल्या महिन्यामध्ये मालदीवमध्ये लागू करण्यात आलेली आणीबाणी अखेर मागे घेण्यात आली आहे. मालदीवचे राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन यांनी याविषयी अधिकृत घोषणा केली आहे. यामीन यांच्या या निर्णयानंतर भारताकडून याचे स्वागत करण्यात आले आहे. 
मालदीव सर्वोच्च न्यायालयाने काल यामीन यांना देशातील राष्ट्रपती राजवट हटवण्याचे आदेश दिले होते. तसेच न्यायालयाचे आदेश मान्य न केल्यास यामीन यांच्यावर महाभियोग भरवण्याचा इशारा देखील न्यायालयाने दिला होता. न्यायालयाच्या या भूमिकेनंतर यामीन यांनी काल रात्री उशिरा देशातून राष्ट्रपती राजवट हटवत असल्याची घोषण केली.

यामीन यांनी हा निर्णय घेतल्यानंतर भारताने यामीन यांच्या या निर्णयाचे स्वागत केले. तसेच देशातून राष्ट्रपती राजवट जरी नष्ट झाली असली, तरी मालदीवमधील नेमकी समस्या अजून समोर आलेली नाही. म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावरून या समस्येचा शोध घेतला पाहिजे, अशी प्रतिक्रिया भारताने दिली.

गेल्या महिन्यातील ५ तारखेला यामीन यांनी मालदीवमध्ये आणीबाणी घोषित केली होती. यामध्ये यामीन यांच्या विरोधात कट करत असल्याच्या आरोपावरून देशातील अनेक बड्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या काही न्यायाधीशांविरोधात देखील यामीन यांनी कारवाई केली होती. यामीन यांच्या या निर्णयानंतर जगभरातून त्यांच्यावर टीका होऊ लागली होती, तसेच यामीन यांनी आणीबाणी मागे घ्यावी, असे निर्देश देखील आंतरराष्ट्रीय राजकारणातून दिले जात होते.