पाचोर्‍यात पेन्शनधारक वृद्धास अज्ञात भामट्याने बनवले ‘मामा’!

23 Mar 2018 13:19:41

बँकेतून काढलेले १० हजार ८०० रुपये लांबवले


 
पाचोरा :
मी तुमचा भाचा आहे. आई घरी थांबली आहे. मला गहू घ्यायचा आहे. तुमच्याकडचे पैसे द्या, असे सांगून विश्‍वास संपादन करत एका अज्ञात भामट्याने पेन्शनधारक वृद्धाचे १० हजार ८०० रुपये लांबवले. ही घटना गुरुवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास पाचोरा येथील भडगाव रस्त्यावरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात घडली.
 
 
सुपडू राजाराम पाटील (सेवानिवृत्त नाकेकारकून, पाचोरा न.पा.) असे फसवणूक झालेल्या वृद्धाचे नाव आहे. त्यांनी गुरुवारी बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून पेन्शनचे १० हजार ८०० रुपये काढले. त्यानंतर ते स्टेशन रोडवरील घन:श्याम बेकरीतून खारी-पाव घेत होते. त्याचवेळी एका अज्ञात भामट्याने त्यांचा विश्‍वास संपादन केला. दोघेही एकाच रिक्षात बसून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ आले. तेथे त्या भामट्याने गहू घेण्याचा बहाणा करून त्यांच्याकडून पैसे घेऊन पोबारा केला. आपली फसवणूक झाल्याचे समजताच सुपडू पाटील यांनी एका व्यक्तीच्या भ्रमणध्वनीवरून मुलाला फोन करून घटनेची हकिकत सांगितली. नंतर दोघांना बाजार समितीजवळ सोडणार्‍या रिक्षा चालकाला विचारणा करण्यात आली. परंतु, त्याने आपल्याला लगेच दुसरे प्रवासी मिळाल्याने निघून गेल्याचे सांगितले.
 

असे आहे भामट्याचे वर्णन - हा भामटा अंदाजे ३५ ते ४० वयोगटातील आहे. त्याने अंगात पांढरा शर्ट व तपकिरी क्रीम रंगाची पँट परिधान केली होती. तो जळगाव परिसरातील भाषा बोलत होता. त्याने बँकेपासूनच सुपडू पाटील यांच्यावर पाळत ठेवल्याचा संशय आहे. भरदिवसा अशी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, ज्येष्ठ नागरिकांनी अशा भामट्यांपासून सावध रहावे. बँकेतून पैसे काढणे किंवा ठेवण्यासाठी जातांना घरातील जाणकार व्यक्तीला सोबत न्यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

 
 
Powered By Sangraha 9.0