‘मार्च फॉर अवर लाईव्स’

    दिनांक  22-Mar-2018   
 

 
सातत्याने होणार्‍या गोळीबाराच्या घटनांमुळे अमेरिकन पालकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होणे तसे स्वाभाविकच. कारण, किमान महिन्यातून एकदा तरी अमेरिकेतील शाळांमधील या गोळीबाराच्या मन सुन्न करणार्‍या कहाण्या विचलित करणार्‍या आहेत. गेल्याच महिन्यात फ्लोरिडामधील स्टोनमॅन डगल्स हायस्कूलमध्ये झालेल्या अशाच एका अंदाधुंद गोळीबारात १७ जणांचा मृत्यू झाला.
 
हा गोळीबार एका माथेफिरू माजी विद्यार्थ्याने केल्याचे नंतर उघडही झाले. त्यामुळे सामूहिक गोळीबाराच्या घटना आणि त्याही शाळेसारख्या ठिकाणी वारंवार घडल्यानंतरही अमेरिकन प्रशासनाने मात्र कडक पावले उचललेली नाहीत. कारण, अमेरिकन सरकारला गोळीबाराच्या या भीषण समस्येचे गांभीर्य अजूनही समजलेले नाही, असेच खेदाने म्हणावे लागेल. त्यामुळे सामान्य अमेरिकनांचा आवाज सुस्त सरकारी यंत्रणेपर्यंत पोहोचविण्यासाठी अमेरिकेत २४ मार्च रोजी ‘मार्च फॉर अवर लाईव्स’ या ‘लॉंग मार्च’चे आयोजन करण्यात आले आहे. या मार्चचे अमेरिकेतील विविध शहरांमध्ये भव्य स्तरावर आयोजन करण्यात आले असून विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांचा हा आक्रोश मोर्चा असेल. या मोर्चाची मागणी एकच - अमेरिकेतील खाजगी बंदुकांच्या परवान्यांवर कायदेशीर निर्बंध आणि मर्यादा. कारण, एका आकडेवारीनुसार अमेरिकेतील १०० जणांपैकी जवळपास ८९ नागरिक हे बंदूकधारी आहेत. त्यामुळे बंदुकांच्या या अतिरेकी वापरावर लवकरात लवकर उपाययोजना करण्याची गरज या मोर्चात अधोरेखित केली जाईल. खरंतर अमेरिकेत जेव्हा जेव्हा अशा गोळीबाराच्या क्रूर घटना घडल्या, त्यानंतर प्रत्येकवेळी बंदुकांवर बंदीची मागणी जोर धरते पण, सरकारदरबारी मात्र पुढे काहीच हालचाली होत नाहीत. यामागचे कारण म्हणजे, अमेरिकन सरकारची निष्क्रियता आणि कुठे ना कुठे बंदूकनिर्मात्यांना त्यानिमित्ताने दिले जाणारे व्यावसायिक अभय पण, यामुळे अमेरिकेतील शाळांची, महाविद्यालयांची सुरक्षितताच धोक्यात आली असून पालकांनी आपल्या पाल्यांना घरीच डांबायला सुरुवात केलेली दिसते.
 
विशेष म्हणजे, अमेरिकेत या घटना नवीन नाहीत. यापूर्वीही ओबामांच्या काळात बंदूक परवाने कठोर करण्याची चर्चा झाली खरी, पण त्यावेळीही त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही आणि विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हा विषय तितकासा गंभीरच वाटत नाही. याचे कारण म्हणजे, त्यांच्या लेखी या घटनांच्या मागे ज्यांचे मानसिक आरोग्य स्थिर नाही, तेच गुन्हेगार आहेत पण, एका आकडेवारीनुसार २३५ बंदूकधारींनी केलेल्या हल्ल्यांपैकी केवळ ५२ जण मानसिक अस्वास्थ्याने ग्रासलेले होते. म्हणजेच, बहुतांशी बंदुकधारींचा मानसिक आरोग्याच्या असंतुलनाशी तसा संबंध नाहीच. तेव्हा, केवळ २०० डॉलरमध्ये मिळणार्‍या बंदुका, परवाना वाटपातील भ्रष्टाचार आणि ढिसाळपणा यामुळे गोळीबाराच्या समस्येने अमेरिकेत चिंताजनक रूप धारण केले आणि त्यामुळे जगातील तब्बल ४२ टक्के बंदुका बगलेत घेऊन फिरणार्‍या अमेरिकनांच्या या देशात अशा हल्ल्यांचे प्रमाण सर्वाधिक वाढले. २०१५ ची प्राप्त आकडेवारी यासंदर्भात अधिक बोलकी ठरेल. त्यानुसार, त्या एका वर्षात अशा सामूहिक गोळीबाराच्या एकूण ३७२ घटना अमेरिकेत घडल्या, ज्यामध्ये १,७८० नागरिक जखमी झाले, तर ४७५ जण मृत्युमुखी पडले. त्याच वर्षी ६४ शाळांमध्ये असे गोळीबारीचे निर्दयी प्रकार घडले. या आकड्यांवरूनच बंदूक वापराचे अमेरिकेतील भीषण वास्तव समोर येते. तेव्हा, अमेरिकेत होऊ घातलेल्या या गोळीबारांविरोधी ‘लॉंग मार्च’मधून तरी समाजमनाच्या आक्रोशाची ही गोळी गेंड्याच्या कातडीच्या अमेरिकन सरकारच्या दगडी काळजाला भेदू शकेल का, हेच आता पाहायचे.
 
 
 
- विजय कुलकर्णी