राज्यसभेत पुन्हा गदारोळ, कामकाज पुन्हा ठप्प

21 Mar 2018 11:09:46



नवी दिल्ली : आंध्र प्रदेशा राज्याला विशेष दर्जा देण्यात यावा तसेच केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यास सभागृहाने परवानगी द्यावी यासाठी तेलगु देशम पक्षाने आणि विरोधकांनी घातलेल्या गदारोळामुळे आज देखील राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले आहे. टीडीपीच्या मागणीला विरोधकांनी दिलेला पाठींबा आणि त्यासाठी सभागृहात विरोधी पक्षांनी घातलेल्या गदारोळामुळे सभापतींनी राज्यसभेच्या कामकाजाला उद्यापर्यंत स्थगिती दिली आहे. त्यामुळे सलग १२ व्या दिवशी राज्यसभेचे कामकाज ठप्प पडले आहे.
 
सभागृहाचे कामकाज सुरु झाल्यानंतर  काही मुद्दे चर्चासाठी सभागृहासमोर मांडण्यात आले होते. त्यानंतर टीडीपीच्या नेत्यांनी 'आंध्र प्रदेशला विशेष राज्या'चा दर्जा देण्यात यावा, म्हणून जोरदार घोषणाबाजी सुरु केली. सभापतींनी टीडीपी नेत्यांना खाली बसण्याचे आवाहन केले, तसेच चर्चेच्या तासामध्ये यावर चर्चा करण्याचे आवाहन केले. परंतु याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत. टीडीपी नेत्यांनी जोदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. टीडीपीच्या या मागणीला विरोधकांनी देखील पाठिंबा दिला व राज्यांची मागणी पूर्ण करणे हे केंद्र सरकारचे काम असल्याचे म्हणत, सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यानंतर टीडीपी नेत्यांनी सभापतींच्या समोरच्या मोकळ्या जागेत येऊन घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सभापती व्यंकय्या नायडू यांनी सभागृहाचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब केले.

 
अर्थ संकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राचा आजचा १२ वा दिवस आहे. परंतु विरोधकांच्या गदारोळामुळे एक दिवस देखील सभागृहाचे कामकाज योग्यपणे पार पडलेले नाही. तसेच टीडीपीने एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर विरोधकांचे बळ अजून थोडे वाढले आहे. टीडीपीच्या मागणीला पाठींबा देण्याच्या नावावरून विरोधक या मुद्यावरून देखील सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे सरकारसमोर एक नवे आव्हान उभे राहिले आहे.
 
Powered By Sangraha 9.0