जलजागृतीसाठी ‘वॉटर रन’

    दिनांक  21-Mar-2018

बुलडाणा : उन्हाळ्यामध्ये नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, यासाठी जलजागृती सप्ताहनिमित्त जिल्ह्यात काल 'वॉटर रन' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल २ किमीच्या या शर्यतीमध्ये जिल्ह्यातील स्पर्धकांनी देखील मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.
जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांतु पुलकुंडवार आणि अप्पर जिल्हाधिकारी पी. के दुबे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले होते. जिजामाता प्रेक्षागार येथून सकाळी वॉटर रनला सुरूवात झाली. शहरातील मुख्य मार्गावरून जल जागृती करीत स्पर्धक या रनमध्ये धावले. यानंतर मुलांचा गट, मुलींचा गट आणि खुल्या गटामध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावलेल्या विजेत्यांना अनुक्रमे २ हजार १ , १ हजार ५०१ व १ हजार १ असे नगदी पारितोषिक आणि चषक देऊन गौरवण्यात आले.

नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, हा संदेश देण्यासाठी शासनाच्या जलसंपदा विभागाकडून जिल्ह्यात जलजागृती सप्ताह राबवण्यात येत आहे. या दरम्यान जल संवर्धनाच्या दृष्टीने समाजात जागृती व्हावी म्हणून कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच्या पहिल्याच दिवशी वॉटर रनचे आयोजन करण्यात आले होते. तर आजच्या दुसऱ्या जिल्ह्यात जलजागृतीसाठी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.