संघाची शाखा म्हणजे नित्य संस्काराची पाठशाळा

21 Mar 2018 12:03:23

जामनेर येथील उत्सवात ज्येष्ठ कार्यकर्ते उत्तमराव थोरात यांचे प्रतिपादन


 
 
जामनेर :
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दररोजच्या एक तासाच्या शाखेतून देशभक्तीचे धडे दिले जातात. संघ शाखेत देशासाठी , समाजासाठी समर्पणाची भावना आपोआप जागृत होते, स्वपुरुषार्थ, कर्तृत्वाची भावना जागृत होते, त्याचबरोबर स्वतः चा विकास होतो. दररोजच्या एकत्र येण्याने हे सारे घडते... हा मंत्र दूरद्रष्ट्या डॉ. हेडगेवार यांनी शोधून काढला, असे प्रतिपादन संघाचे आणि सहकार चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते, अभ्यासू आणि फर्डे वक्ते उत्तमराव थोरात (शेंदुर्णी) यांनी केले. जामनेर येथे वीर सावरकर सायं शाखेच्या वर्षप्रतिपदा-गुढीपाडवा उत्सवात ते बोलत होते. व्यासपीठावर तालुका कार्यवाह कर्ण बारी होते.
 
 
दररोजच्या शाखेतून आज देशभर हजारो कार्यकर्ते तयार झाले आहेत. आपणही समाजासाठी एक तासाचा वेळ काढून शाखेत या, स्वत: संघ समजून घ्या... असे आवाहनही उत्तमराव थोरात यांनी केले. समाज संघटीत नव्हता, म्हणून मूठभर इंग्रज देशावर राज्य करीत होते. ही बाब डॉ. हेडगेवारांच्या लक्षात आली.
 
 
समाज एकत्र आला पाहीजे, सुसंघटीत व्हावा, त्याचा आत्मविस्मृत गौरव, स्वाभिमान जागृत होत इंग्रजांबद्दलची भिती दूर झाली पाहिजे... म्हणून १९२५ साली त्यांनी संघाची स्थापना नागपूरच्या मोहिते वाडयात केली , त्या वेळी त्यांचे सोबत अवघे २५ कार्यकर्ते उपस्थित होते. आज देशभर संघाच्या ७०हजार शाखा असून लाखो स्वयंसेवक आहेत. जगामध्ये जिथे- जिथे हिन्दू समाज आहे तिथे संघाचे काम आहे .९० वर्षाच्या कठोर तपश्चर्येनंतर देशभर हजारो कार्यकर्ते समाजाच्या कल्याणाचे, राष्ट्राच्या उभारणीचे निस्मृह, निरलस सेवाकार्य करीत आहेत.
 
 
संघकार्याचे सार्थक झाल्याचेही दिसत आहे, अजूनही समस्या, अडचणी खूप आहेत, सेवाव्रतींची देशाला गरज आहे, असे प्रतिपादन ही उत्तमराव थोरात यांनी ओजस्वी आणि मुद्देसूद बौद्धिकात केले.
 
 
शाखा कार्यवाह पुष्पक चौधरी यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला . चेतन तेली यांनी सांघिक पद्य सादर केले. यावेळी शिवराम महाले, अतुल जहागीरदार यांच्यासह स्वयंसेवक आणि मान्यवर नागरिक उपस्थित होते.
 
Powered By Sangraha 9.0