जिल्हाधिकार्‍यांच्या दालनात गाळाधारक महिलेस रडू कोसळले

21 Mar 2018 11:30:44

 
जळगाव :
शिष्टमंडळ जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा करीत असताना शाहूनगरमधील गाळेधारक वंदना भाटिया यांनी पालिकेकडून केली जाणारी कारवाई आमच्या जिवावर उठली आहे. तुम्ही आमचे भाऊ आहात, अशा शब्दात जिल्हाधिकारी यांना साकडे घातले. यावेळी त्यांना हुंदका आवरता आला नाही.
 
 
माजी आमदार डॉ. गुरुमुख जगवाणी यांनी मोबाईलवर माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्याशी बोलणे केले. खडसे यांनी मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा केल्याचे सांगत विधानसभेत मुख्यमंत्री गाळेधारकांच्या प्रश्नावर निवेदन करणार असल्याची माहिती दिली. शिष्टमंडळातील गाळेधारकांनी जिल्हाधिकारी यांना सर्वमान्य तोडगा काढा. अन्यथा आम्ही सारे उद्ध्वस्त होऊ, असे साकडे घातले.
 
 
शिष्टमंडळात आ. सुरेश भोळे, माजी आमदार डॉ. गुरुमुख जगवाणी, संघटनेचे नेते डॉ. शांताराम सोनवणे, हिरानंद मंधवाणी, पुरुषोत्तम टावरी, वंदना भाटिया, संजय पाटील, रमेश मताणी, अशोक मंधाण, विजय काबरा, युसूफ मकरा यांच्यासह गाळेधारकांचे पदाधिकारी यांचा समावेश होता.
 

बिल्डर लॉबीचा मोठे मार्केट बांधण्याचा घाट -  गाळे लिलावाच्या नावावर बिल्डर लॉबीचा या मार्केटच्या जागेवर मोठी दुकाने बांधण्याचा आणि गाळेधारकांना इतरत्र दुकाने घेण्यास भाग पाडण्याचा हा घाट असल्याचा आरोप गाळेधारक संघटनेचे संजय पाटील यांनी जिल्हाधिकार्‍यांशी बोलताना केला. महापालिकेने यापूर्वी घेतलेल्या निर्णयानुसार १४ मार्केट अव्यावसायिक धरून त्यांना दिलासा द्यावा. सन २००४ च्या निर्णयाप्रमाणे मुदत वाढवून द्यावी अशी मागणी हिरानंद मंधवाणी यांनी केली. विजय काबरा यांनी पाचपट दंड रद्द करण्याची मागणी केली.

 
  
९९ वर्षांसाठी गाळे द्यावेत
निवेदनात गाळेधारक संघटनेने म्हटले आहे की, २००४ मध्ये चार संकुलांना दिलेली मुदतवाढ नियमानुसार होती. सन २००८ मध्ये माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या मध्यस्थीने करण्यात आलेल्या ५० वर्षांच्या मुदतवाढीच्या ठरावावर अंमलबजावणी का झाली नाही? यामुळे आता ठराव क्रमांक १२३१ नुसार ९९ वर्षे दीर्घ मुदतीने कराराने गाळे द्यावेत, अशी मागणी करण्यात आली.
 
 
Powered By Sangraha 9.0