पंछी चुपचाप नही मरा हैं, पत्थर बेदाग नही बचा हैं...

    दिनांक  21-Mar-2018   
आम्ही या देशाचे नागरिक आहोत म्हणजे नेमके काय आहोत, हा सवाल कधीकधी पडतो ते मग अस्वस्थ होतात आणि त्याचे यथार्थ उत्तर शोधण्याची पहिली पायरी असते. ती पायरी गाठली की, लगेच प्रगती होते आपली नागरिक म्हणून असे नाही. ते उत्तर स्वीकारावे लागते. नुसतेच स्वीकारूनही आयुष्य उजळते असेही नाही. ते कृतीत आणावे लागते. आपल्याला प्रश्न निर्माण करायला आवडते. अगदी विलक्षण असा छंदच आहे आपला तो. त्याची उत्तरे शोधण्याचे काम नेहमीच ‘दुसर्‍यांचे’ असते. हेही एक वळणापर्यंत ठीक आहे. किमान प्रश्न तर निर्माण केले जातात. लोक आजकाल प्रश्नही निर्माण करत नाहीत, कारण ‘कां?’ असे विचारण्याची मानवी कुवत नष्ट करण्यात आली आहे. त्यासाठी खर्‍या अर्थाने विवेकाचा पुरुषार्थ असावा लागतो. तोच आम्ही गमावून बसलो आहोत. त्यामुळे प्रश्नही दुसर्‍यांनीच निर्माण करायचे आणि आम्ही मात्र त्याची जबाबदारी इतरांवर टाकून मोकळे होत असतो.
 
बर्‍याचदा प्रश्नाची नेमकी उत्तरे सापडतात किंवा ती प्रश्नासोबतच निर्माणही झालेली असतात. आम्ही त्यांना बगल देत असतो. तसे नाही केले तर ती उत्तरे स्वीकारावी लागतात आणि मग त्या समस्येला जबाबदार आम्हीच आहोत, हेही लक्षात येते. तेच नेमके आम्हाला नको असते. समस्या निर्माण झाली, चूक दिसली की, आम्ही रेडिमेड जबाबदारी टाकून मोकळे होत असतो. नागरिक म्हणून आम्ही केवळ मतदान करतो. तेही पूर्णांशाने करत नाही. पन्नास- साठ टक्के मतदान होते. त्यात इतके विभाजन असते की 27-28 टक्के मते ज्यांना मिळतात ते सत्ताधारी होतात. म्हणजे आमचे बहुमताचे सरकार खर्‍या अर्थाने अल्पमतातलेच असते. मतदान केले की, मग आमची जबाबदारी संपत असते. सारीच कर्तव्यं मग आम्ही निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी पार पाडायची असतात. आम्ही त्यांना, ती का पार पाडत नाही, हेही विचारत नाही.
‘‘हे करत असलात तरच आम्ही मतदान करू,’’ असेही आम्ही सांगत नाही. तरीही आमची लोकशाही आहे, अशा भ्रमात आम्ही असतो. त्या पलीकडचा आनंद हा की, आम्ही ती लोकशाही सशक्त वगैरे आहे, अशाही गमजा मारत असतो. राजकीय इच्छाशक्तीपाशी आमची अनेक कामे थांबलेली असतात. नागरिकही जागरूक असायला नकोत का? शिकलेले नाहीत त्यांचे ठीक आहे; पण शिक्षित, उच्च शिक्षित आणि सुखवस्तूंचे काय? नागपुरातल्या धरमपेठ भागातील नागरिकांनी मात्र त्यांना जाग आली असल्याचे गेल्या वर्षभरात दाखवून दिले आहे. शहरांतली माणसं कट्‌ट्यांवर जमतात आणि इतरांच्या नावाने बोटे मोडतात. व्यावसायिक चित्रकार म्हणून नाव असलेले विवेक रानडे, विनोद आठवले आणि अशाच काही मित्रांनी वैदर्भीय भाषेत ज्याला किलच्या पाडणे, असे म्हणतात तसे काहीही न करता समस्यांच्या चर्चा वारंवार होऊ लागल्यावर त्यावर आपणच काय उपाय करू शकतो, असा विचार केला अन्‌ ‘सीएबी’ म्हणजे ‘सिव्हिक अॅक्शन गिल्ड’ नावाची स्वयंसेवी संस्थाच रजिस्टर्ड केली. आता गिल्ड का? ग्रुप का नाही? तर गिल्ड म्हणजे एका विशिष्ट कार्यासाठी एकत्रित आलेल्या लोकांचा समूह म्हणजे गिल्ड... समस्या काय होत्या? धरमपेठ ही सुखवस्तूंची, उच्चभ्रूंची वसती आहे. अत्यंत जुनी आहे. आपल्याकडे जे जे काय महत्त्वाचे असते त्याचे व्यापारीकरण होते किंवा राजकीयीकरण होते. धरमपेठ भाग हा भोसलेकालीन नागपूरच्या परिघाबाहेर विकसित झालेला, पण जुना भाग आहे. हा भाग व्यापार्‍यांनी गजबजलेला आहे.
धरमपेठ ही वसती न राहता आता त्याची बाजारपेठ झालेली आहे. व्यापाराला विवेक नसला की त्याची उपउत्पादने ही घातकच असतात. अतिक्रमणे, गलिच्छपणा, बेपर्वाई या भागाच्या समस्या आहेत. तशा त्या प्रत्येकच शहराच्या भागांच्या समस्या आहेत. फेरीवाल्यांच्या गाड्या ही मोठी समस्या आहेच. त्यावर कुणीच काही बोलत नाही. कारण ते बिचारे गरीब आहेत अन्‌ हातगाडीवर व्यवसाय करून पोट भरतात, असे मानले जाते. व्यवसाय गरज म्हणूनच केला जात असतो; पण तो गरजेच्या पलीकडे केला जातो तेव्हा समस्या निर्माण होत असतात. फेरीवाल्यांचे सोडा, मोठ्या दुकानदारांचे काय? त्यांच्या हक्काच्या जागेच्या बाहेर फुटपाथच नव्हे, तर मुख्य रस्त्यावरही त्यांची अतिक्रमणे असतात... त्या विरोधात या लोकांनी एक वेगळे आंदोलनच सुरू केले आहे. वीस-बावीस जणांपासून सुरुवात झाली. आता त्यांच्या या गिल्डमध्ये 300 लोक आहेत. या सदस्यांचे कुटुंबीयदेखील आता सक्रिय आहेत. नागरी समस्या ज्या काय असतात त्यावर ही मंडळी काम करतात. आठवड्यातून दोन बैठका होतात. पहिल्या बैठकीत समस्यांवर चर्चा होते आणि दुसर्‍या बैठकीत त्यावर अॅक्शन काय घेतली, हे सांगितले जाते. स्वच्छता, अतिक्रमण हटाव आणि मग प्रबोधन यावर काम होते. त्या भागात ‘बाईक बाजीराव’ आणि ‘स्कूटी सुंदरीं’च्या वाहतूक नियमांना चाकाखाली चेंदण्याच्या समस्या खूपच आहेत. त्यांना थांबवून हे लोक समजावतात. हे समजावणे बर्‍याचदा उबजूनही येत असते. तो त्रास सहन करून हे काम सुरू असते. आता यांचा दबावगट वाढत चालला आहे. विविध व्यवसाय आणि नोकर्‍या करणार्‍या या गिल्डच्या सदस्यांच्या प्रभावाचाही उपयोग होत असतोच.
या लोकांनी त्या भागातली अतिक्रमणे बर्‍यापैकी दूर केली आहेत. संवादातून समस्या सुटत असतात, हे लक्षात आले आणि त्यातून आत्मविश्वासही दुणावला. ‘‘तुम्ही आम्हाला फुटपाथ मोकळे करून द्या, आम्ही तुम्हाला मत देतो,’’ असे आवाहनच ही मंडळी करणार आहेत. फुटपाथ हे तुमच्या व्यवस्थेचे प्रतीक आहेत. ते मोकळे असले की व्यवस्था सुरळीत आहेत, हे दिसते. विवेक रानडे सांगतो की, व्यवस्था असतेच; पण ती सुरळीत संचालित व्हावी यासाठी आपण प्रयत्न करायचे असतात. आपल्या घरापर्यंत वीज आलेली असते. तारांमधून ती प्रवाहितही असते. सायंकाळी आपण वाट बघत बसलो, तर आपले घर उजळणार नाही. त्यासाठी आपल्याला घरांतले विजेचे बटन दाबावे लागेल. तसे नाही केले तर अंधार... नेमका या जबाबदारीच्या जाणिवेचा अंधार दाटला आहे. त्यात बटणे खराब असतात. ज्यांच्यावर जनतेने मतदानातून विश्वास टाकला असतो, ते काहीच करत नाही. प्रशासनाच्याही बटना खराबच असतात. बटन बदलविणे तसे सोपे नसते, मग डायरेक्ट कनेक्शन करायचे. म्हणजे आपणच पुढाकार घ्यायचा आणि प्रशासनाकडून कामे करून घ्यायची. जी कामे समस्या आहेत त्यांच्याशी संवाद साधून होतात, तिथे आपणच संवाद साधायचा. त्यासाठी त्यांनी काही फेरीवाल्यांशी चर्चा केली. फेरीवाले बर्‍यापैकी समजले. मोठ्या दुकानदारांनी मात्र आपली अतिक्रमणे काढली नाहीत. समस्यांच्या मागे आणि पुढेही राजकारण आणि त्या अनुषंगाने राजकारणी असतात. सार्वजनिक जीवनाचेच आम्ही राजकारण करून टाकले आहे. राजकारणी मंडळी कुठेही असतात. त्यांना ते हवेच असते. तोरणा-मरणाला यांचा सेल्फी असतोच. अतिक्रमणे नकोत, असेही तेच म्हणतात आणि अतिक्रमण करणार्‍यांची भलावणही तेच करतात. हे असे होते, कारण राजकारण्यांना सत्ताच हवी असते आणि त्यामुळे ते प्रत्येकाकडे ‘मतदार’ म्हणून बघतात. माणूस म्हणून बघण्यासाठी थोडे समाजकारणी मनही हवेच असते. त्याची घोर कमतरता आहे... आता या मंडळींना ‘राजकारण’ नावाच्या समस्येशी झुंजावे लागते आहे.असो. पण ती मंडळी करत आहेत काही. तसे पाश्चात्त्य देशात अशी जागरूक नागरिकांची सक्रिय मंडळे आहेत. भारतात बेंगरुळुत अशी मंडळे आहेत. नागपुरात आता ते सुरू झाले आहे. ते करतात ना, म्हणून त्यांचा गौरव करण्यात धन्यता मानण्यात काही अर्थच नाही. आम्ही सत्कार पटकन करतो, सत्कार्य नाही करत. या लोकांना आता त्यांचे काम धमरपेठेच्या बाहेरही विस्तारायचे आहे. इतर भागांतही त्याच समस्या आहेत. त्या त्या भागातील अशीच काही मंडळी समोर आली अन्‌ ‘गिल्डकरांशी’ जुळलीत, तर काम मोठे होईल. जागरूक नागरिकांचा दबावगट वाढेल अन्‌ नागपूर स्मार्ट सिटी होईल... इतरही शहरे तशी होऊ शकतात. पिंजर्‍यातल्या पाखराने, साखळ्या तुटूच शकत नाहीत, असा विचार करत बसून राहिले तर काहीच होणार नाही. त्याने तडफड केली तर तो कदाचित मरेलही, पण नंतरच्या पिढीला हे दिसेल... पंछी चुपचाप नही मरा हैं, पत्थर बेदाग नही बचा हैं...