शेतकऱ्यांची पहिली औद्योगिक वसाहत जालन्यात

    दिनांक  20-Mar-2018
 
 
 
 
 
शेतकरी उद्योजक होण्याच्या वाटा होणार प्रशस्त
 
प्रस्ताव सादर करण्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आदेश
 


जालना : शेतकऱ्यांची पहिली औद्योगिक वसाहत जालन्यात परतूर तालुक्यातील आष्टी या गावात होत असून यामाध्यमातून शेतकरी उद्योजक होण्याचा मार्ग ना केवळ प्रशस्‍त होईल परंतू शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास देखील मदत होणार असल्याने यासंदर्भातील प्रस्ताव लवकरात लवकर मंजूरीसाठी सादर करण्यात यावा, अशा सूचना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.
 
 
अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात रुर्बन व मानव विकास कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
 
 
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा शासनाचा संकल्प असून त्यादिशेने शासनाची वाटचाल सुरु आहे. यासाठी विविध विभागांच्या समन्वयातून या कामाला गती देण्यात येत असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. ते म्हणाले की गाव पातळीवर सूक्ष्म नियोजनातून यासाठी हाती घ्यावयाच्या प्रकल्पांची निश्चिती केली जात आहे. जालना जिल्ह्याने पुढाकार घेऊन रुर्बन तसेच मानव विकास कार्यक्रमांतर्गत तयार केलेला कार्यक्रम त्यादिशेने टाकलेले एक चांगले पाऊल आहे.