विसावं शतक जिवंत करणारे विक्रम पेंडसे

    दिनांक  19-Mar-2018   
 
 
 
हौसेला मोल नसतं, हे वाक्य चारचौघात बोलायला सोपं असतं. पण, त्या हौसेसाठी खरोखरच मोल चुकवण्याची तयारी असलेले लोक अगदी मोजकेच. विक्रम पेंडसे यांनाही असाच छंद जडला, जुन्या वस्तू जमवण्याचा. त्यातही विशेषतः जुन्या सायकली, त्यांचे स्पेअर पार्ट्‌स, त्यांच्या दुरुस्तीसाठी लागणार्‍या वस्तू जमविण्याचा. पेंडसे वस्तू जमवत गेले आणि सहज छंद म्हणून त्यांनी त्या इतक्या जमवल्या की त्याचं चांगलं तीन मजली संग्रहालय उभं राहिलं!
 
 
रॉयल एन्फिल्ड कंपनीने १९२४ मध्ये बनवलेली लेडीज सायकल, सनबिम कंपनीची १९१५ मध्ये इंग्लंडमध्ये बनवलेली सायकल, रेमिंग्टन कंपनीचा १९२० मध्ये अमेरिकेत बनवलेला टाईपरायटर, १९०० मध्ये अमेरिकेतच बनवलेला एडिसन ग्रामोफोन, १९३० पासून १९७०-८० पर्यंतच्या काळात वापरल्या गेलेल्या केरोसीन, कोळसा, एलपीजी, विजेवर चालणार्‍या इस्त्र्या, १९०५ मधील जर्मन बनावटीचा केरोसिनवर चालणारा पंखा, दुसर्‍या महायुद्धाच्या काळात सैनिकांनी वापरलेली बीएसए कंपनीची फोल्डिंग पॅराटूपर सायकल, जेम्स कंपनीची १९२५ मध्ये इंग्लंडमध्ये ऍडल्ट ट्रायसिकल वगैरे वगैरे. या सर्व वस्तूंचे उल्लेख आपण कदाचित केवळ आपल्या आजी-आजोबांच्या तोंडून ऐकले असतील. पण, एक माणूस असाही आहे की, ज्याने या अशा केवळ आठवणींपुरत्या उरलेल्या हजारो वस्तू प्रत्यक्ष जमवून त्यांचं चक्क म्युझियम उभारलं आहे. विसावं शतक जिवंत करणार्‍या या अवलिया व्यक्तीचं नाव आहे, विक्रम पेंडसे.
 
 
हौसेला मोल नसतं, हे वाक्य चार-चौघात बोलायला सोपं असतं. पण, त्या हौसेसाठी खरोखरच मोल चुकविण्याची तयारी असलेले लोक अगदी थोडेच असतात. विक्रम पेंडसे यांनाही असाच छंद जडला, जुन्या वस्तू जमविण्याचा. त्यातही विशेषतः जुन्या सायकली, त्यांचे स्पेअर पार्ट्‌स, त्यांच्या दुरुस्तीसाठी लागणार्‍या वस्तू जमविण्याचा. पेंडसे वस्तू जमवत गेले आणि सहज छंद म्हणून त्यांनी त्या इतक्या जमवल्या की त्याचं चांगलं तीनमजली संग्रहालय उभं राहिलं ! ‘विक्रम पेंडसे सायकल्स आठवणींची सफर’. पुण्यातील कर्वेनगर भागात विक्रम पेंडसे यांनी आपल्या राहत्या घराचाच विस्तार करून साधारण दोन वर्षांपूर्वी हे संग्रहालय उभं केलं आहे. या अनोख्या प्रयोगामागचा प्रवासही रंजक आहे. विक्रम पेंडसे यांचा जन्म १९६६ मध्ये पुण्यात झाला. त्यांच्या वडिलांच्या नोकरीच्या निमित्ताने पुढे हे कुटुंब कल्याणला स्थायिक झाले. विक्रम पेंडसेंचं शालेय व महाविद्यालयीन शिक्षण (बी. कॉम) डोंबिवलीमध्ये झालं. त्यानंतर विक्रम पेंडसे पुन्हा पुण्यात आले, विधी महाविद्यालयात प्रवेश घेतला. परंतु, अधिक रस हा अभियांत्रिकी विषयात होता. त्यामुळे ते एका मोटार गॅरेजमध्ये कामाला जाऊ लागले. पाच-सहा वर्षं दोन वेगवेगळ्या ठिकाणी कामं केल्यानंतर १९९५ मध्ये त्यांनी स्वतःचंच गॅरेज सुरू केलं. कर्वेनगर भागातच ‘डायमंड गॅरेज’ नावाने त्यांचं गॅरेज आहे. लहानपणापासून पेंडसेंना जुन्या मोटारसायकलींची आवड होती. गॅरेजमध्ये काम करत असताना जुन्या गाड्या, त्यांचे स्पेअर पार्ट्‌स यांच्या आवडीमुळे त्यांना जुन्या बाजारात जायची सवय लागली. आर्थिक परिस्थिती नसल्याने ते वस्तू विकत घेत नसत, पण नुसते पाहायला जात.
 
 
विक्रम पेंडसे यांना जुन्या वस्तूंची आवड आहे, हे समजताच त्यांच्या वडिलांच्या एका मित्राने त्याच्याकडे असलेली बीएसए कंपनीची १९४५ मधील फोल्डिंग पॅराटूपर सायकल पेंडसेंना भेट म्हणून दिली. ही गोष्ट १९९५ मधली. ती सायकल आणि तिचं वेगळेपण पाहून पेंडसेंना सायकलींबद्दल कुतूहल निर्माण झाले. त्या दिवसांमध्ये विंटेज बाइक्स, विंटेज कार, विंटेज फर्निचर जमविणारे अनेक होते, पण ‘विंटेज सायकली’ ही कल्पना नवीन होती. मग पुढे पेंडसेंनी कोल्हापूरहून अशीच जुनी अमेरिकन बनावटीची सायकल आणली. पेंडसे सायकल जमवत आहेत, हे समजताच त्यांच्या एका मित्राच्या संपर्कातून पांडुरंग गायकवाड नामक एक सायकलपटू पेंडसेंना येऊन भेटले. हे गायकवाड स्वतः सायकल स्पर्धांमध्ये दक्षिण आशियाई स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू असून त्यांनी सलग १५ वर्षं मुंबई-पुणे स्पर्धेतही भाग घेतला आहे. पेंडसे यांच्या संग्रहात येत असलेल्या जुन्या मोडक्या वस्तूंना पुन्हा त्यांच्या मूळ स्वरूपात आणण्याचं शिवधनुष्य गायकवाड यांनी पेललं. इथे जेवढ्या १५० सायकली, इतर जुन्या वस्तू आहेत, त्यापैकी मी फार तर १० सायकली रिस्टोर करू शकलो असतो. बाकी हे सर्व काम पांडुरंग गायकवाड यांचं आहे, असं पेंडसे सांगतात.
 
 
विक्रम पेंडसे मग पुढे अशाच सायकली आणि जुन्या वस्तू जमवत गेले. मग कल्पना आली की, या वस्तूंचं एक प्रदर्शन भरवावं. मग कर्वेनगरमध्येच एका सभागृहात दिवसाचं ३० हजार रुपये भाडं भरून या वस्तूंचं चार दिवसांचं प्रदर्शन भरवलं गेलं. पुन्हा अनिल गुजर नामक पेंडसेंचे एक मित्र मदतीला धावून आले. संग्रहालय शास्त्रातील हे तज्ज्ञ. त्यांनी या प्रदर्शनाची सर्व रचना व व्यवस्था लावून दिली. सुरुवातीला या प्रदर्शनाला कितपत प्रतिसाद मिळेल याबाबत सर्वांना शंका होती. पण, ते इतकं यशस्वी झालं की पेंडसेंनी दिलेल्या माहितीनुसार तिथे चार दिवसांत तब्बल १० हजार लोक येऊन गेले. ‘‘लोकांनी रांगा लावून जुन्या वस्तू कुतूहलाने, आश्चर्याने पाहिल्या. यानंतर जुन्या सायकलींमध्येही काही बघण्यासारखं असतं आणि ते सुंदररित्या मांडलं, तर लोक आवडीने पाहायला येतात, हे माझ्या लक्षात आलं,’’ असं पेंडसे सांगतात. मग पेंडसेंच्या मुलीने तिच्या बारावीच्या परीक्षेनंतरच्या सुट्टीत सलगपणे कितीतरी दिवस बसून संग्रहातील या वस्तूंची मोजदाद केली, नोंद केली. त्यानंतर एकूण आवाका लक्षात आला आणि याचं एक म्युझियमच उभं राहू शकतं, हेही लक्षात आलं. पण, ते उभारायचं कसं हा प्रश्न होता. पेंडसे यांच्या वडिलांनी स्वतःहून तेव्हा कर्वेनगरमधील त्या घरावर मजले बांधून देतो, असं सांगत तो प्रश्न सोडवला. त्यावेळेस पुन्हा अनिल गुजर मदतीला आले. त्यांनी या वस्तूसंग्रहालयाची रचना लावून देण्याचं ठरवलं.
 
 
अनिल गुजर यांनी केलेल्या नियोजनाप्रमाणे हे संग्रहालय दीड वर्षांत उभं राहिलं आणि पुढे त्या वस्तू जागेवर लावायलाच तब्बल २१ महिने लागले! यावरून विक्रम पेंडसे यांच्याकडे केवढा साठा जमला होता, हे लक्षात येतं. याच्या उभारणीसाठी वडिलांनी पैसे दिले, हेही ते नमूद करतात. तसेच मुलीने या कामात बरीच मदत केली, पत्नीनेही काटकसर करत एखादा दागिना घ्यायचा की सायकल घ्यायची अशी वेळ येताच सायकलीला प्राधान्य दिलं. त्यामुळे हे एका व्यक्तीचं काम नसून यात अनेक व्यक्तींचं महत्त्वाचं योगदान आहे, त्याशिवाय हे होऊच शकलं नसतं, असं पेंडसे आवर्जून सांगतात. अशा सर्वांच्या अथक प्रयत्नांतून विक्रम पेंडसे यांच्या हौसेला आणि छंदाला एक मूर्त रूप मिळालं आणि ‘विक्रम पेंडसे सायकल्स हे म्युझियम’ उभं राहिलं. तीन मजल्यांचं भलंमोठं संग्रहालय उभारूनही पेंडसेंच्या संग्रहातील सगळ्या वस्तू अजून लावून झालेल्या नाहीत, कारण तेवढी जागाच शिल्लक नाही !
 
 
आज या संग्रहालयात साधारण २००च्या आसपास जुन्या सायकली आहेत. याखेरीज सायकलची घंटी, इलेक्ट्रिकल सेलवरची बेल, सायकलचे पंप, लुब्रीकेशनचे ऑईल कॅन, दिव्यांचे असंख्य प्रकार, डायनामोवर चालणारे दिवे, सायकलचे फूटपंप, टेल लॅम्प, रिफ्लेक्टर, इतकंच काय तर त्या काळात महानगरपालिकेने दिलेले सायकल करबिल्ले (टॅक्स बॅचेस), अशा सायकलीबाबतच्या असंख्य वस्तू आहेत. यासह इतर वस्तूंमध्ये जुनी कुलुपं, स्वयंपाकघरात वापरल्या जाणार्‍या वस्तू, ओव्हन, स्टोव्ह, शिलाई मशीन्स, रॉकेलवरची इस्त्री, कोळशावरची इस्त्री, एलपीजीवरची इस्त्री, दिव्यांचे विविध प्रकार, मेणबत्तीचे स्प्रिंगलोडेड स्टॅण्ड, पेट्रोमॅक्सच्या बत्त्या, कंदील, रेल्वे सिग्नल्सचे कंदील, खायच्या पानाचे डबे, सिगारेट ऍश ट्रे, लायटर्स, या पानाचे डबे, इ. मध्येही पुन्हा चौकोनी, जाळीदार, नक्षीचे, काही परीच्या आकाराचे, बदकाच्या आकाराचे, मोटारकारच्या आकाराचे, मग जुने फोन, टाईपरायटर्स, ग्रामोफोन्स, वजनकाटे, ताणकाटे, वेगवेगळ्या आकारांच्या मद्याच्या, अत्तराच्या, दुधाच्या बाटल्या, शाईच्या दौती, लहान मुलांच्या खेळण्यातल्या चारचाकी गाड्या, पॅडल कार, अशा असंख्य वस्तूंची यादीच या संग्रहालयात आहे. पुन्हा संग्रहालयात जागा नसल्याने इथे दाखल न झालेल्या वस्तूंची यादी पुन्हा निराळीच. वस्तूंची संख्या हजारोंमध्ये असली तरी नेमकी किती याची मोजदाद अजूनही सुरू आहे.
 
 
या संग्रहालयातील सर्वच्या सर्व वस्तू साधारण १९०० ते १९७०-८० या काळातील आहेत. जुन्या फोटोंमध्ये, चित्रपटांमध्ये आणि वयस्कर लोकांच्या बोलण्यातील उल्लेखांमधून पाहायला/ऐकायला मिळणार्‍या या वस्तू पेंडसे यांच्या या अनोख्या प्रयोगामुळे आज आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळू शकतात. त्यामुळे विसाव्या शतकातील आठवणींमध्ये रममाण होण्यासाठी आणि एका अवलिया माणसाचा थक्क करणारा प्रवास पाहण्यासाठी, पुण्यातील विक्रम पेंडसे यांच्या या सायकल म्युझियमला एकदा तरी भेट द्याच!
 
 
 
 
- निमेश वहाळकर