बेडकाची गर्जना.....

19 Mar 2018 18:15:40




केवळ दूषणं देऊन, परभाषीय पाट्या काढून, किंवा नक्कल करून राजकीय पक्षाची विश्वासार्हता तयार होत नसते. सभेला जमलेली माणसे तात्पुरत्या टाळ्या वाजवत देखील असतील, मात्र त्याचे रुपांतर मनोरंजनात होते मतदानात नाही, हे राज ठाकरे आणि त्यांच्या सल्लागारांनी लक्षात घ्यायला हवे. बेडकाप्रमाणे केवळ फुगून, ओरडून, गर्जना करण्याचा प्रयत्न हा स्वत: सहित पक्षाच्या अस्तित्वासाठी घातक ठरू शकतो, यावर नक्कीच विचार करण्याची आवश्यकता आहे. राज ठाकरे यांच्या वल्गना खूप गांभीर्याने घेण्याची तशी परिस्थिती नाही. परंतू केवळ अनुल्लेखानेच मारले, असे भांडवल त्यांनी, अथवा त्यांच्या समर्थकांनी करू नये, म्हणून हा लेख प्रपंच.



आपल्यापैकी अनेकांनी सिंहगर्जना हा शब्द ऐकला असेल, परंतु बेडकाची गर्जना प्रथमच कानावर पडत असावी. पंचतंत्रात प्रसिद्ध असलेल्या अनेक गोष्टी आहेत. गुढीपाडव्यानिमित्त राज ठाकरे यांनी काल शिवाजी पार्कच्या मैदानावर जाहीर सभा घेऊन मोदीमुक्त भारताची घोषणा केली आणि मला पंचतंत्रातील एक गोष्ट आठवली, एक बैल कुरणात चरत असता तेथे काही लहान बेडूक खेळत होते. त्यातील एक बेडूक बैलाच्या पायाखाली चेंगरून मरण पावला. ती हकीगत इतर बेडकांनी घरी जाऊन आपल्या आईस सांगितली. ते म्हणाले, 'आई, इतका मोठा प्राणी आम्ही कधी पाहिला नव्हता.' ते ऐकून बेडकीने आपले पोट फुगविले आणि म्हटले, 'काय, तो इतका मोठा होता का?' त्यावर तिची मुले म्हणाली, 'नाही आई, याहून मोठा.' पुन्हा आणखी पोट फुगवून बेडकीने विचारले, 'काय रे, तो इतका मोठा होता का?' त्यावर पिले म्हणाली, 'आई, तू जरी आपलं पोट फुटेपर्यंत फुगवलंस तरी तुझं मोठेपण त्या प्राण्याच्या पासंगालाही पुरणार नाही.' हे ऐकून बेडकी मोठ्या गर्वाने आणखी फुगू लागली व त्याच वेळी तिचे पोट फुटले व ती तेथेच मरण पावली. बेडकीने आपल्या क्षमतेपेक्षा शंभर पटीने मोठ्या असलेल्या बैलाशी तुलना करण्याचा व्यर्थ प्रयत्न करून स्वत:ला संपवून टाकले, त्यामुळे बेडकीची गर्जना केवळ फुसकी नव्हे तिच्या स्वत:साठीच विनाशकारक ठरली.

राज ठाकरे यांचा पक्ष सुरु झाला त्यावेळी महाराष्ट्राच्या भल्यासाठी, नवनिर्माणासाठी काम करण्याचे आश्वासन त्यांनी मराठी जनतेला दिले. पक्षाच्या वाढीसाठी त्यांनी आपल्या मराठीच्या मुद्द्याला बळ मिळण्यासाठी इतर भाषिकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. प्रथमदर्शी तो प्रयत्न यशस्वी देखील ठरला. उत्तर भारतीयांचे मुंबईत वाढणारे लोंढे, त्यामुळे तेथील स्थानिकांना होणारा त्रास, या प्रकाराला राज ठाकरे यांनी वाचा फोडली, आणि त्यांना मराठी जनतेकडून भरभरून प्रतिसाद मिळायला सुरुवात झाली. त्यांच्या पक्षाला विधानसभा निवडणुकीत १३ आमदार मिळाले, नाशिक महानगरपालिका येथे जनतेने त्यांच्यावर विश्वास टाकला. मात्र त्या विश्वासास राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष पात्र ठरू शकला नाही. नाशिकच्या जनतेला टाकलेला विश्वास आणि त्यानंतर राज यांचा मिळालेला थंड आणि संथ प्रतिसाद पाहून तेथील नागरिकांनी मतपेटीतून खांदेपालट केला. राज ठाकरे यांच्यासारख्या नेत्याकडून महाराष्ट्राला खूप अपेक्षा होत्या, त्यामुळेच त्यांच्यामागे तरुणांचा मोठा रेटा त्यावेळी साहजिक जात असे. मात्र आपल्या मगरूरी, आणि अहंकारी कार्यशैलीमुळे राज यांना कार्यकर्ते टिकवता आले नाहीत. एका छोट्या प्रादेशिक पक्षाचे अध्यक्ष असून देखील कामाचा थाट मात्र सत्ताधाऱ्यांप्रमाणे ठेवल्यामुळे राज ठाकरेंपासून अनेक कार्यकर्ते दुरावले आहेत. त्याचबरोबर प्रत्यक्ष कामापेक्षा केवळ शब्दांवर आणि बोलण्याच्या शैलीवर हातखंडा असल्यामुळे सामान्य जनता देखील त्यांच्यापासून दुरावली. जसे नरेंद्र मोदी यांनी गुजरात मॉडेल विकसित करून देशासमोर एक उदाहरण उभे करून दिले, (हे स्वत: राज यांनी मान्य केले आहे.) त्याचप्रमाणे राज यांना नाशिक मॉडेल उभे करता आले असते, मात्र तसे न जमल्यामुळे आज एक आमदार घेऊन पक्ष पुढे रेटावा लागत आहे.

राज ठाकरे यांचा सामान्य मतदार हा शहरी आहे. त्यांच्या भाषणाला गर्दी प्रचंड जमत असली तरी देखील त्या गर्दीचे मतांमध्ये परिवर्तन होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. मोदी आणि फडणवीस यांच्या कृतीशील आचरणामुळे शहरी त्याचबरोबर ग्रामीण तरुण साहजिकच त्याकडे ओढला जाऊ लागला. आणि म्हणून भाजपला महाराष्ट्रातील जिल्हापरिषद, ग्रामपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका यांत भरभरून यश मिळाले. हि संधी भाजपच्या आधी राज ठाकरे यांच्याकडे होती. परंतु पक्ष बांधणीकडे योग्य लक्ष न दिल्यामुळे, त्याचबरोबर जमीनीवर उतरून काम न केल्यामुळे त्यांना मोठा फटका सहन करावा लागला आहे. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह आज देखील निवडणुकीत बूथ कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची तयारी दाखवत असतात, आणि म्हणूनच २१ राज्यांमध्ये त्या पक्षाची सत्ता अस्तित्वात येते. मोदी आणि शाह यांना दूषणे देण्यापेक्षा राज यांनी शाह यांच्याएवढी लवचिकता दाखवावी आणि आपला पक्ष वाढवावा. परंतु ज्यांची बांधणी मुळातच एका विशिष्ट स्तरावर झालेली असते, अशी माणसे वाकायला नक्कीच धजावतात. बाळासाहेब ठाकरे संपूर्ण महाराष्ट्राला आपलेसे वाटतात, प्रत्येक शिवसैनिक त्यांच्यासाठी प्राणार्पण करायला देखील प्रसंगी तयार असायचा. एवढे स्नेह कोठून बरे आले असेल? कारण बाळासाहेबांनी स्वतः जमिनीवर अथक परिश्रम करून आपला पक्ष वाढवला आहे, त्यामुळे त्यांच्यावर अनेकांची श्रद्धा आहे. केवळ बाळासाहेब यांच्याप्रमाणे भाषण देण्याची कला आत्मसात करणे पुरेसे नाही. 

बदलत्या राजकीय परिस्थिती नुसार पक्षाची धोरणे बदलणे प्रासंगिक फायद्याचे ठरते, मात्र यामुळे पारंपारिक मतदार वर्ग तयार होत नसतो, हे राज ठाकरे आणि त्यांच्या सल्लागारांना ठाऊक असावयास हवे. सुरुवातीला शिवसेनेची मतं खाण्याचे धोरण ते मोदीमुक्त भारताची घोषणा देणे म्हणजे, राज यांना नेमके करायचे काय आहे? हा प्रश्न अवघ्या महाराष्ट्राला पडला आहे. खरं तर राज यांचे प्रतिस्पर्धी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असायला पाहिजे होते, परंतु मोदी, शाह या राष्ट्रीय नेत्यांना दूषणे देण्यावाचून त्यांना काहीही सुचत नाही. फक्त महाराष्ट्राचे नवनिर्माण करायचे आहे, तर पंतप्रधानांशी स्पर्धा का? याने कुणाचे फावणार आहे? मुलाखत घेणाऱ्यांचे की देणाऱ्यांचे? याची स्पष्टता राज यांच्या पक्षाच्या वाटचालीत कुठेतरी हरवली असल्याचे जाणवते.

अर्थात याचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष श्रेय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना दिले पाहिजे. अनेकांसाहित त्यांनी राज यांना देखील आपले अपूर्ण राहिलेले पंतप्रधान पदाचे स्वप्न पूर्ण करण्याच्या कामाला लावले आहे. परंतु केवळ दूषणं देऊन, परभाषीय पाट्या काढून, किंवा नक्कल करून राजकीय पक्षाची विश्वासार्हता तयार होत नसते. सभेला जमलेली माणसे तात्पुरत्या टाळ्या वाजवत देखील असतील, मात्र त्याचे रुपांतर मनोरंजनात होते मतदानात नाही, हे राज ठाकरे आणि त्यांच्या सल्लागारांनी लक्षात घ्यायला हवे. बेडकाप्रमाणे केवळ फुगून, ओरडून, गर्जना करण्याचा प्रयत्न हा स्वत: सहित पक्षाच्या अस्तित्वासाठी घातक ठरू शकतो, यावर नक्कीच विचार करण्याची आवश्यकता आहे.
खरंतर राज ठाकरे यांचा व्यासंग आणि वाचन चांगले आहे. ते रसिक आहेत. कला, साहित्य संस्कृती यांची त्यांना चांगली जाण आहे. एक वक्ता म्हणून त्यांचा लौकिक चांगला आहे. महाराष्ट्रातील आताच्या काळात फार थोडे असे नेते आहेत की ज्यांच्याकडे एवढी गुणसंपदा आहे. असे असताना मतदारांची मात्र त्यांच्याकडे सातत्याने पाठ का असते याचे आत्ममंथन त्यांनी करण्याची गरज आहे. बाळासाहेबांची शिवसेना सोडताना राज ठाकरेंनी आपण विठ्ठलावर नव्हे तर बडव्यांवर नाराज आहोत असे कारण दिले होते. राज ठाकरेंच्या सध्याच्या अपयशामागे त्यांच्या बडव्यांनी वेळोवेळी त्यांना दिलेले सल्ले तर कारणीभूत नाहीत?
- हर्षल कंसारा
Powered By Sangraha 9.0