आरटीई प्रवेश प्रक्रियेत गोलमाल!

17 Mar 2018 11:18:52

पाल्यासाठी काही पालकांनी दिले खोटे रहिवास पत्ते
शिक्षण विभागाकडून कागदपत्रांची शहानिशाच नाही
 

मुक्ताईनगर :
जळगाव जिल्ह्यातील आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रियेची पहिली सोडत १४ मार्च रोजी जाहीर झाली. या यादीत मुक्ताईनगर तालुक्यातील बर्‍याच विद्यार्थ्यांच्या पालकांनी खोटा रहिवास पत्ता दाखवला आहे. तसेच निवासाचे अंतर हे कागदोपत्री कमी दर्शवले आहे. शिक्षण विभागातील अधिकार्‍यांनी अर्जासोबतच्या कागदपत्रांची शहानिशा न केल्याने खरे लाभार्थी विद्यार्थी आरटीई प्रवेशापासून वंचित राहिले आहेत.
 
 
तालुक्यातील सर्व शाळांनी विद्यार्थ्यांच्या अर्जासोबत असलेल्या कागदपत्रांची शहानिशा करूनच प्रवेश प्रक्रिया राबवावी. तसेच खोटी माहिती व बनावट कागदपत्रे सादर करून पाल्याच्या प्रवेशासाठी खटपट करणार्‍या पालकांची नावे समोर आणावीत, अशा मागणीचे निवेदन नुकतेच गटशिक्षणाधिकार्‍यांना पालकांच्या वतीने देण्यात आले आहे. गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला नाही तर तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असाही इशारा देण्यात आला आहे.
 
 
मुक्ताईनगर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी आरटीई प्रवेश प्रक्रियेंतर्गत २५ टक्के आरक्षणासाठीची पहिली सोडत १४ मार्च रोजी काढण्यात आली. या यादीत ३८ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे. मात्र, निवड करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची माहिती ऑनलाईन खोटी भरण्यात आली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे निवासस्थान शालेय अंतरापासून दीड किलोमीटर पेक्षा जास्त आहे. परंतु, पालकांनी हे अंतर अर्धा किलोमीटर पेक्षा कमी दर्शवलेले आहे. त्यामुळे शालेय अंतर कमी असताना अनेक विद्यार्थी यापासून वंचित राहिले आहेत. दूर अंतरावर राहणारे विद्यार्थी लाभार्थी ठरल्याचे दिसत आहे. या लाभार्थी विद्यार्थ्यांच्या पालकांनी दिलेला पत्ता व गुगल मॅपवर दर्शविलेले अंतर याची पडताळणी करून खोटी माहिती देवून शालेय अंतर कमी दर्शविणार्‍या लाभार्थ्यांना अपात्र ठरविण्यात यावे. त्यांची निवड रद्द करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
 

चुकीची माहिती असल्यास प्रवेश नाकारावा - पात्र विद्यार्थ्याची शाळेत प्रवेश देताना ऑनलाईन भरलेली माहिती तसेच विद्यार्थी राहत असलेल्या घराचे शाळेपासूनचे अंतर याची पडताळणी करण्यात येईल. त्यात ऑनलाईनमध्ये चुकीची माहिती भरलेली आढळून आल्यास त्या विद्यार्थ्याचा प्रवेश नाकारावा, असे पत्र तालुक्यातील शाळांना देणार असल्याचे मुक्ताईनगर शिक्षण विभागाचे जे.डी. पाटील यांनी सांगितले.

Powered By Sangraha 9.0