अखेर तेलगु देसम् पक्ष 'रालोआ'मधून बाहेर

16 Mar 2018 10:08:25

पक्षाध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांचा निर्णय



नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (रालोआ) घटक पक्ष असलेल्या तेलगु देसम् पक्षाने रालोआमधून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले आहे. पक्षाचे अध्यक्ष तसेच आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज हा निर्णय घेतला असून आपण आता केंद्र सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडणार असल्याचे देखील त्यांनी जाहीर केले आहे. 
 
 
 
आज सकाळीच नायडू यांनी आपल्या सर्व आमदार आणि खासदारांशी टेलिफोन कॉन्फरन्सिंगच्या सहाय्याने संपर्क साधला होता. यामध्ये झालेल्या चर्चेनंतर तेलगु देसम् पक्ष सरकारमधून बाहेर पडता असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. तसेच भाजप सरकारने आंध्रच्या जनतेची फसवणूक केली आहे, त्यामुळे सरकार विरोधात अविश्वास ठराव मांडणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
 
 
टीडीपीच्या या निर्णयानंतर भाजपकडून मात्र अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. टीडीपीकडून मात्र सरकारवर जोरदार टीका होत असून भाजपने आंध्रच्या जनतेला फसवले आहे, अशी प्रतिक्रिया टीडीपीचे खासदार आणि आमदारांकडून देण्यात येत आहे. केंद्र सरकार स्थिर राहावे, म्हणून टीडीपीने सर्व प्रकारचे प्रयत्न केले. परंतु भाजपने आंध्रप्रदेशच्या जनतेकडे दुर्लक्ष करून आमचा विश्वास गमावला आहे, अशी प्रतिक्रिया टीडीपीचे नेते वाय.एस चौधरी यांनी दिली आहे.
Powered By Sangraha 9.0