डॉ. हेडगेवारांचे चिरंजीवित्व

16 Mar 2018 19:30:02



रा. स्व. संघ, संघाची स्थापना, डॉ. हेडगेवार, हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व याची कोणतीही माहिती नसणारे संघावर आधारहीन, तथ्यहीन टीका करतात. त्यांना मुळात संघाबद्दल काही माहिती तर नसतेच पण अभ्यास करून माहिती घेण्याचे कष्टही त्यांना नकोसे असतात, पण कोणी कितीही टीका केली तरी डॉ. हेडगेवार हे चिरंजीव व्यक्तिमत्त्व आहे. डॉक्टरांचे हेच चिरंजीवित्व म्हणजे काय, कसे हे या लेखातून जाणून घेऊया.



डॉ. हेडगेवारांनी १९२५ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली, तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आणि त्यांचाही भारतीय राजकारणावरील प्रभाव अत्यंत सीमित होता. आज २०१८ साली देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान, अठरा राज्याचे मुख्यमंत्री, २९ राज्यांचे राज्यपाल संघ स्वयंसेवक आहेत. यातले आश्चर्य असे की, भावी काळात संघाचे स्वयंसेवक, पंतप्रधान, मुख्यमंत्री झाले पाहिजे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झालेली नाही. डॉ. हेडगेवारांचा हा दृष्टिकोन नव्हता. उलट राजकारणाच्या माध्यमातून समाजसंघटन होणार नाही. समाजपरिवर्तन होणार नाही आणि देश बलवान होणार नाही, याबद्दल त्यांच्या धारणा स्पष्ट होत्या. त्यांनी काही काळ राजकारण केले, परंतु नंतर त्यांनी ते सोडून दिले. आज त्यांच्याशी वैचारिक नाळ जोडणारे राष्ट्रपती आहेत, पंतप्रधान आहेत आणि राज्यांचे मुख्यमंत्री आहेत. हे काय गौडबंगाल आहे?


संघावर भरमसाट लिहिले जाते आणि जीभ सैल सोडून बोलले जाते. त्याला उत्तरे देण्याचेही काही कारण नाही आणि त्याची चिंता करण्याचे तर अजिबात कारण नाही. एकदा घोडा आणि गाढव यांच्यात पैज लागली की आपल्या दोघांत मोठा कोण? पळण्यात घोडा सरस ठरला. शक्तीत घोडा सरस ठरला. कौशल्यातही घोडा सरस ठरला. गाढवाला ते सहन झाले नाही. तो एका उकिरड्यावर गेला आणि उलटा पडून लोळू लागला. गाढव घोड्याला म्हणाले, ’’तू हे करू शकतोस का?’’ घोडा त्याच्याकडे पाहून म्हणाला, ’’मी हरलो, तू श्रेष्ठ आहेस.’’ संघावर वाट्टेल ती टीका करणार्‍यांसंबंधी निदान माझी तरी अशी समजूत असते.


तसेही मी संघविरोधकांचे वाङ्‌मय सतत वाचत असतो. नुकतेच शशी थरूर यांनी ’व्हाय आय ऍमए हिंदू? (मी हिंदू का आहे?)’ या शीर्षकाचे पुस्तक लिहिले. त्याच्या दुसर्‍या भागाचे शीर्षक आहे, ’पॉलिटिकल हिंदुत्व (राजकीय हिंदुत्व)’ यात शशी थरूर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर, श्रीगुरुजी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय या तिघांना हिंदुत्वाचे तत्त्वज्ञानी ठरवून त्यांच्या विचारामध्ये कसा संकुचितपणा ठासून भरला आहे, हे अवतरणामागून अवतरणे देऊन सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. डॉ. हेडगेवारांचे नाव त्यांना घेता आले नाही. कारण स्पष्ट आहे-थरूरांचा अभ्यास शून्य. डॉ. हेडगेवारांचा अभ्यास संघाबाहेरील एकही विद्वान करीत नाही. त्याला अभ्यासासाठी ग्रंथ, पुस्तके, लेख हवे असतात. डॉक्टर हेडगेवारांच्या नावावर यातले काहीही नाही. त्यामुळे कुणी अभ्यास करत नाही. या विद्वानांच्या लक्षात एक गोष्ट येत नाही की डॉक्टरांसारखा महापुरुष या मानवजातीत दुसरा झालेला नाही. असा महापुुरुष की ज्याचे जीवन म्हणजे ग्रंथ. ज्याचा चोवीस तासातील व्यवहार म्हणजेे ग्रंथ. असा महापुुरुष की ज्याने आपले जीवन ज्यातून व्यक्त होईल, अशी एक लोकविलक्षण कार्यपद्धती दिली.


डॉक्टर म्हणजे संघशाखा आणि संघशाखा म्हणजे डॉक्टर. शाखेत गेल्याशिवाय आणि तेही वर्ष दोन वर्ष गेल्याशिवाय डॉक्टरांना समजणे अशक्य आहे. त्यांच्या चरित्रातून त्यांचे लौकिक जीवनचरित्र समजतील, घटनाप्रसंग समजतील, परंतु तो या महापुरुषांच्या जीवनाचा हिमनगासारखा भाग आहे. न दिसणारा भाग समजून घ्यावा लागतो. ज्यांना हे समजत नाही त्यांच्या वैचारिक बोटी या हिमनगावर आपटून बुडतात, रसातळाला जातात. संघावर टीकेची धाड घालणारे काळाच्या उदरात असेच गडप झालेले आहेत. ते कोण होते आणि ते काय बोलले यांचे आज कोणी स्मरणही करत नाही.


डॉ. हेडगेवारांनी या देशात राष्ट्र उभे करण्याची कधीही न संपणारी ऊर्जा निर्माण केली. ही ऊर्जा केवळ संघाच्या विचारात नाही. विचार तसे अमूर्त असतात आणि म्हटले तर निर्जीव असतात. परंतु ते जेव्हा कुणाच्या तरी जीवनात उतरतात आणि ती व्यक्ती जेव्हा त्या विचारांना घेऊन चालू लागते तेव्हा विचार जिवंत होतात आणि ते दिसू लागतात. त्यांची अनुभूती येऊ लागते. कोणत्याही राज्यघटनेविषयी म्हटले जाते, राज्यघटनेतील शब्द निर्जीव असतात, परंतु जेव्हा तिची अंमलबाजवणी सुरू होते तेव्हा ते सजीव होतात आणि ते जाणवू लागतात. डॉ. हेडगेवारांचे जीवन असेच आहे.


त्यांनी आपल्यापुरते ठरविले की, मी माझे जीवन आपल्या हिंदू समाजासाठी अर्पण करीन. त्यांनी असे का ठरवले? त्यांनी असे ठरविले, कारण हिंदू समाज त्यांच्या सर्व गुणदोषांसहित माझा समाज आहे, अशी त्यांची अनुभूती होती. ही अनुभूती त्यांनी प्रत्यक्ष जीवनात उतरवली. ते तसे जगू लागले. जेव्हा त्यांच्या लक्षात आले की, संघटन करायचे असेल तर कुणी दिलेला चहा नाकारून चालणार नाही म्हणून ते चहा पिऊ लागले. संघटन करायचे असेल तर रागावून चालणार नाही, म्हणून त्यांनी क्रोधाचा त्याग केला. संघटन करायचे असेल तर मीपणा ठेऊन चालणार नाही, म्हणून त्यांनी मीपणा सोडला. हिंदूंना बरोबर घेऊन जायचे असेल तर हिंदूंच्या दोषांवर टीका करून चालणार नाही. म्हणून त्यांनी टीकात्मक भाषणे करण्याचे सोडले. समाजासाठी सातत्याने कामकेले पाहिजे, हे लोकांना शिकवायचे असेल तर पैसा कमावण्याच्या मागे लागता कामा नये, म्हणून त्यांनी डॉक्टरकी केलीच नाही. सर्व मोहापासून, विषयवासनेपासून दूर झाल्याशिवाय कार्यावर लक्ष केंद्रित करता येत नाही. शक्तीचे जागरण करता येत नाही, म्हणून त्यांनी विवाह केला नाही.


ज्याला आध्यात्मिक साधना करायची असते, त्याला विकारांपासून दूर राहावे लागते. डॉक्टर त्या सर्व विकारांपासून दूर होते. तसेच ज्याला साधना करायची असते त्याला ध्यानधारणा आणि समाधीची साधना करावी लागते. डॉक्टरांना व्यक्तिगत मोक्ष नको होता तर सर्व हिंदू समाजाला धार्मिक, आर्थिक, सामाजिक बंधनातून त्यांना मुक्त करायचे होतेे आणि त्यासाठी साधना आवश्यक होती. या साधनेला त्यांनी नाव दिले नाही. पण ती आहे राष्ट्रसाधना. मुक्तीच्या साधनेपेक्षा संपूर्णपणे वेगळी. जी एकट्याने करायची नाही तर समुदायाने करायची असते. त्यासाठी कुणालाही गुरू करायचीही गरज नाही. गुरू एकच भगवा ध्वज. साधनेमध्ये कोणत्याही व्यक्तीला आदर्श ठेवायचे नाही. त्याच्या पावलावर पाऊल टाकून चालायचे नाही. आपला मार्ग आपणच शोधायचा. आपणच आपले गुरू, मार्गदर्शक, मित्र सारे काही आपणच. डॉ. हेडगेवारांनी भारताचा सनातन अध्यात्मिक विचार कोणतीही बुवाबाजी न करता, मठ स्थापना न करता राष्ट्रसाधनेत परावर्तित केला, हा एक अदुत चमत्कार आहे.


या चमत्काराचा परिणामआज राजनीतिमध्ये दिसतो. डॉक्टरांनी पक्ष कसा उभा करावा, पक्षाचे तत्त्वज्ञान काय असावे? यामध्ये धोरण कोणते असावे? राष्ट्रनीती कोणती असावी वगैरे काही सांगितलेले नाही. त्याउलट त्यांच्या जीवनचरित्रातून स्पष्ट होते की, आपला गुरू भगवा ध्वज आणि आपला मार्ग आपणच शोधायचा आहे. स्वयंप्रेरणेला त्यांनी खूप महत्त्व दिले. डॉक्टरांपासून प्रेरणा घेतलेली कोणतीही संस्था उधार उसनवारीच्या विचारांवर कामकरत नाही. ती स्वयंभू असते. स्वयंशासित असते आणि स्वदेशी विचारांवर मार्गक्रमण करत असते. उधारीवर जगणार्‍यांना हे सहन करता येत नाही. मग ते उधारीने घेतलेल्या विचारांच्या आधारे संघाची चिकित्सा करू लागतात. तिच्यात तांदळातून काढलेल्या भुशाइतकाही दम नसतो.


लौकिक अर्थाने डॉक्टरांचा जन्मवर्षप्रतिपदेचा आहे, परंतु असं म्हटले तर वावगे ठरू नये की, या देशात रोजच डॉक्टरांचा जन्महोत असतो. जो स्वयंसेवक झाला, जो कार्यकर्ता झाला तो अंशरूपाने डॉक्टरांचे रूपच असतो. चिरंजीव असण्याची संकल्पना आपल्याकडे फार प्राचीन आहे. चिरंजीव म्हणजे ज्याला कधीही मरण नाही. डॉक्टरांना कधीही मरण नाही. त्यांना फक्त नित्य जन्मआहे. डॉक्टरांच्या विचारांना कुणीही रोखू शकत नाही. तेवढी शक्ती कुणाच्यातही नाही. संघ रूपाने डॉक्टरच व्यापक बनत चालले आहेत. त्या व्यापकतेला सीमा नाही. अवकाशाला कुठे सीमा असतात का?


संघाच्या व्यापकतेचे अनेकांना अकारण भय वाटते. संघ देश एकाकार करणार का? एकच विचारांचा देश होणार का? सर्वांना गणवेश घालणार का? सर्वांना प्रार्थना म्हणायला लावणार का? सर्वांना ’भारतमाता की जय’च म्हणायला लावणार का? सर्वांना नशापान सोडायची सक्ती करणार का? अशा एक ना हजारो शंका लोकांच्या मनात असतात. डॉक्टरांचे जीवन सांगते की, यापैकी काहीही होणार नाही. डॉक्टरांनी चेनस्मोकर असलेल्यांनाही संघकामात जुंपले. कोणी नशापान करतो म्हणून त्याला दूर लोटलेले नाही. प्रारंभीच्या काळात आर्य समाजी स्वयंसेवक ध्वजाला प्रणामकरत नसत. कारण ती त्यांच्यामते मूर्तिपूजा होती. त्यांनाही डॉक्टरांनी संघात बसविले. कारण डॉक्टरांना हे माहिती होते की, हिंदू समाज म्हणजे पूर्ण विचारस्वातंत्र्य, पूर्ण आचार स्वातंत्र्य. पूर्ण अभिव्यक्ती स्वातंत्र्य. त्यांना बंधने घालता येत नाही. डॉक्टरांनी फक्त इतकेच सांगितले की, तुम्ही कुणीही असा, कसेही असा, परंतु आपल्या जीवनात देशाला पहिले स्थान द्या. हिंदू समाजाला पहिले स्थान द्या. त्याचे सुख-दुःख समजून घ्या. मला असे वाटते की, संघ त्यासाठीच आहे.


डॉक्टरांचे जीवन सर्वसमावेशक होते. कुणाचाही विरोध न करता आपल्याला संघकामकरायचे आहे. आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन जायचे आहे, हे त्यांनी शिकविले. त्यांनी संघात कोणतेही धार्मिक कर्मकांड आणले नाही, कोणत्याही एका देवतेची पूजा करायला शिकवले नाही. शाखेच्या रुपात त्यांनी सामान्य संयुक्त कार्यक्रमदेशापुढे ठेवला.


राजकीय परिभाषेत त्याला common minimum programme म्हणतात. हिंदू समाजाला बंदिस्त विचारधारा बांधून ठेऊ शकत नाही, डॉक्टरांना हे उत्तमसमजत होते. सामान्य सर्वसमावेशक कार्यक्रमदिल्याशिवाय हिंदू सशक्त होणार नाही, हे त्यांना दिसल्यानंतर त्यांनी संघ सुरु केला. या युगप्रवर्तक कार्यासाठीच त्यांचा जन्मयुगादी म्हणजे गुढीपाढव्याला झाला. या महापुरुषास शत शत वंदन.


- रमेश पतंगे
Powered By Sangraha 9.0