वाईटातील चांगले...

    दिनांक  16-Mar-2018   

मायावती आणि मुलायमसिंह जातवादी नेते आहेत, कॉंग्रेस पक्ष कम्युनिस्टांनी बळकावलेला पक्ष आहे. त्याची प्रतिमा आजही मुस्लीम हिताचे राजकारण करणारा पक्ष अशीच आहे. हे पर्याय आपल्यापुढे संकटच संकटे उभे करणारे आहेत. म्हणून कार्यकर्त्यांनी जागे राहून मतदारांना जागे करण्याची गरज आहे. शंभरातील ५८ टक्के लोक झोपतात, याची चिंता करण्याची संधी मतदारांनी भाजपला दिली आहे, हे पण चांगलेच झाले.


‘जे काही होते, ते भल्यासाठी’ अशी आपल्याकडे एक म्हण आहे. या म्हणीवर आधारित अनेक लोककथा आहेत. त्यातील ही एक चिनी कथा. एक शेतकरी होता आणि त्याला एक मुलगा होता. त्याच्याकडे एकच घोडा होता. त्याचा उपयोग शेत नांगरण्यासाठी आणि गाडीला जुंपण्यासाठी केला जाई. एके दिवशी तो घोडा गोठ्यातून पळून गेला. घोडा त्याची संपत्ती होती. आजूबाजूच्या शेतकर्‍यांना हे समजल्यानंतर ते त्याचे सांत्वन करायला आले. तेव्हा तो शेतकरी म्हणाला,‘‘वाईट वाटून घेण्याचे कारण नाही, जे होते ते चांगल्यासाठी होते.’’ काही दिवसानंतर त्याचा घोडा परत आला. पण, तो एकटा आला नाही. त्याच्या बरोबर एक घोडी होती. शेजारचे शेतकरी त्याला म्हणाले,‘‘चला बरे झाले, एका ऐवजी दोन घोडे झाले.’’ शेतकरी म्हणाला,‘‘बरे झाले की वाईट झाले, याची चिंता आपण करू नये.’’


एके दिवशी मुलगा घोडीवर बसला, पण ती नाठाळ होती. तिने त्याला खाली पाडले. त्यात त्याचा पाय मोडला. पुन्हा शेजारचे शेतकरी आले आणि म्हणाले,‘‘वाईट झाले.’’ शेतकरी म्हणाला,‘‘कसले वाईट आणि कसले चांगले, जे होते ते बर्‍यासाठी होते.’’ काही दिवसानंतर जपानचे चीनवर आक्रमण होते. सैन्यभरती सुरू होते. गावात राजाचे अधिकारी येतात आणि सर्व धडधाकट तरूणांना सैन्यात घेऊन जातात. शेतकर्‍याच्या मुलाचा पाय मोडलेला असल्यामुळे त्याला नेत नाहीत. आघाडीवर गेलेला एकही सैनिक परत येत नाही. जे होते ते भल्यासाठी, याची प्रचिती ही चिनी कथा देते.


गोरखपूर आणि फुलपूर येथील लोकसभा निवडणुकांत भाजप उमेदवार पराभूत झाले, ही बातमी वाचल्यानंतर मला सर्वप्रथमया कथेची आठवण झाली. या पोटनिवडणुकींच्या निकालावर नेहमीच्या सवयीप्रमाणे माध्यमांनी भाष्यांचा पाऊस पाडलेला आहे. ‘‘भाजपचे ‘अच्छे दिन’ गेले, आता ‘बुरे दिन’ सुरू झाले. लोकसभा निवडणुकीत मायावती आणि अखिलेश एकत्र आल्यास भाजपचा पराभव ठरलेला आहे. मोदींच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली आहे. अमित शाह यांची रणनीती फसली आहे. योगी आदित्यनाथ दिवसेंदिवस लोकरोषाला बळी ठरत चालले आहेत. हा सेक्युुलॅरिझमचा विजय आहे. धर्मवादी भाजपचा पराभव आहे.’’ अशी आणि या प्रकारची सर्व वाक्ये आतापर्यंत वाचकांनी अनेकवेळा ऐकली आणि वाचलीदेखील असतील, मीदेखील वाचली आहेत आणि तरीही मला असे वाटते की, भाजपचा पराभव झाला, हे भाजपच्या हिताच्या दृष्टीने चांगलेच झाले. सत्तेवर गेल्यानंतर, कितीही प्रयत्न केला तरी सत्तेची धुंदी अंगात शिरल्याशिवाय राहत नाही. काही वरिष्ठ नेते सोडले, तर दुसर्‍या-तिसर्‍या फळीतील भाजपचे नेते विजयाने फुगून जातात. मग कोण कुठे काय बोलेल, याला काही घरबंद नसतो. आपल्या बोलण्याचे परिणामकाय होणार आहेत, याचा विचार करण्याची त्याला गरज वाटत नाही. आम्हाला कोण अडविणार, असे त्याला वाटू लागते. अशा सर्वांना जमिनीवर आणण्यासाठी पराभवाचा कटू घास भरविणे फार आवश्यक असते. मतदारांनी तो भरविला आहे. एका अर्थाने त्यांनी भाजपची सेवाच केली आहे. राजकारणात मतदारांना गृहित धरता येत नाही. जो गृहित धरतो, त्याचे पानिपत ठरलेले आहे. लोकशाही राज्यव्यवस्थेत लोकांना राजी राखणे, फार अवघड कामअसते. जे राज्यकर्ते मग्रूर होतात, नम्रता सोडतात, राजलक्ष्मीच्या वैभवात राहतात, ते राज्यकर्ते लोकांना आवडत नाहीत. प्रजासत्ताकात जनता सार्वभौमअसते. त्यामुळे या सार्वभौमप्रजेला सार्वभौमत्त्वाचा सन्मान द्यावा लागतो. राज्य त्यांच्यासाठी करायला लागते. त्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे लागते आणि त्यांची पूर्ती करावी लागते. कारण, लोकांनी त्यांच्या कल्याणासाठी राज्यकर्त्यांना निवडून दिलेले असते. जेव्हा राज्यकर्ते हे प्राथमिक कर्तव्य करण्यात कमी पडतात, चुका करतात, तेव्हा जनता त्यांना शासन करते. जे गोरखपूर आणि फुलपूर येथे घडले आहे. गोरखपूरची जागा परंपरेने योगी आदित्यनाथ यांची आहे. १९९१ पासून ते सातत्याने ते या जागेवरून निवडून येतात. त्यामानाने फुलपूरची जागा अशी सदैव विजय देणारी नव्हती. गोरखपूरचा पराभव म्हणून अतिशय बोचरा ठरतो. पोटनिवडणुकांतील यश आणि अपयश महत्त्वाचे असले तरी त्यावरून सुतावरून स्वर्गात जाता येत नाही. आदित्यनाथ यांनी म्हटल्याप्रमाणे निवडणूक प्रचाराच्या काळात सपा आणि बसपा यांची युती होईल, यांची त्यांना कल्पना आली नाही आणि युती झाल्यानंतर मतांचे ध्रुवीकरण होईल, यांचाही त्यांना अंदाज आला नाही. दुसर्‍या भाषेत त्यांनी आपला विजय गृहित धरलेला होता. ते निवडणूक लढत नव्हते. त्यांच्या जागी उपेंद्र दत्त शुक्ल भाजपचे उमेदवार होते. नाव काहीही जरी असले तरी गोरखपूर आणि आदित्यनाथ यांचे समीकरण झालेले असल्यामुळे उपेंद्र दत्त शुक्ल यांचा पराभव आदित्यनाथांचाच पराभव मानला जाईल. एक जबरदस्त धक्का बसल्याशिवाय २०१९ची मोठी लढाई जिंकण्यासाठी काय करावे लागेल, हे शोधण्याची जाग येणार नाही. मतदारांनी हे कामकेले, हे चांगलेच कामकेले, असेच मानले पाहिजे. एकमेकांशी शत्रुत्व करणारे कधी कधी आपल्या समान हितसंबंधासाठी युती करतात. सपा आणि बसपा हे राजकारणातील एकमेकांचे हाडवैरी आहेत - साप आणि मुंगूसासारखे. परंतु, त्यांचीही दोस्ती होते. पंचतंत्रात एक कथा आहे. एका जाळ्यात एक रानमांजर अडकून पडते. उंदराला त्याचा आनंद होतो. म्हणून तो बिळातून येऊन नाचत असतो. सहज त्याचे वर लक्ष जाते, त्याला उचलण्यासाठी एक घुबड अनुकूल संधीची वाट बघत असते आणि त्याला खाण्यासाठी समोरच एक मुंगुस बसलेला असतो. प्राण वाचविण्यासाठी उंदीर मांजराला म्हणतो,‘‘तूू मला तुझ्या कुशीत जागा दे. मी जाळ कुरतडून टाकेल आणि तुझी सुटका करेन.’’ मांजर त्याला आपल्या कुशीत घेते. घुबड आणि मुंगूसाला स्वतःच्या डोळ्यांवर विश्र्वास बसत नाही. मांजरीच्या पोटात जाणारा उंदीर कुशीत कसा आला? याला म्हणतात, समान हितसंबंधाचे राजकारण. असे राजकारण हिटलरने केले. दुसरे महायुद्ध सुरू करण्यापूर्वी त्याने रशियाशी मैत्रीचा करार केला. हा करार म्हणजे मांजराने उंदराला कुशीत घेणारा करार समजला जातो. या करारामुळे पूर्व आघाडी निर्धोक झाली आणि हिटलरचे सैन्य पश्र्चिमआघाडीवर आगेकूच करत गेले. हिटलरला कसा रोखायचा असा प्रश्न इंग्लडपुढे निर्माण झाला. हिटलर आणि स्टॅलिन एकमेकांचे दोस्त बनतील, असे चर्चिलला वाटले नाही, पण तसे झाले, याला म्हणतात, सत्तेचे राजकारण.


गोरखपूरमध्ये ४७.५ टक्के आणि फुलपूरमध्ये ३७.४ टक्के मतदान झाले. याचा अर्थ असा की, गोरखपूर मतदारसंघात शंभरातील ५३ लोक घरी बसले आणि फुलपूर मतदारसंघात ५८ टक्के लोक घरी बसले. यातील बहुसंख्य भाजपचे मतदार असतील. त्यांना घरातून बुथवर आणण्यासाठी जे काही करावे लागते, ते करण्यात भाजप पक्षयंत्रणेला यश मिळालेले नाही. ही उणीव या दोन्ही मतदारसंघाने समोर आणून दिली, ते पण चांगले झाले. यातून खूप काही शहाणपण शिकावे लागेल. कारण, २०१९च्या निवडणुका केवळ भाजपसाठी नाहीत, तर देशासाठी जिंकणे फार आवश्यक आहे. नाही तर जे पर्याय आहेत, ते देशाचे भले करणारे नाहीत. मायावती आणि मुलायमसिंह जातवादी नेते आहेत, कॉंग्रेस पक्ष कम्युनिस्टांनी बळकावलेला पक्ष आहे. त्याची प्रतिमा आजही मुस्लीमहिताचे राजकारण करणारा पक्ष अशीच आहे. हे पर्याय आपल्यापुढे संकटच संकटे उभे करणारे आहेत. म्हणून कार्यकर्त्यांनी जागे राहून मतदारांना जागे करण्याची गरज आहे. शंभरातील ५८ टक्के लोक झोपतात, याची चिंता करण्याची संधी मतदारांनी भाजपला दिली आहे, हे पण चांगलेच झाले.


पुढच्या वर्षी होणार्‍या लोकसभेच्या निवडणुका सगळे भाजपविरोधी एकत्र येऊन लढतील, निदान तसा ते प्रयत्न तरी करतील. वर दिलेल्या उंदीर आणि मांजराच्या दिलेल्या गोष्टीप्रमाणे सर्व घडणार आहे, हे समजूनच रणनीती आखायला पाहिजे. मायावतींचा मतदार बांधील मतदार आहे. अखिलेश यांची जाट आणि मुस्लीमअशी व्होटबँक आहे. मायावतीच्या राजकारणाचा पाया प्रामुख्याने पैसा आहे. अखिलेशच्या राजकारणाचाही तोच पाया आहे. लहानपाणी आपण ज्या गोष्टी ऐकतो, त्यामध्ये कुठल्या तरी असुराचा प्राण साता समुद्रापलीकडील पोपटात असतो, अशा कथा ऐकलेल्या आहेत. त्याप्रमाणे आपल्या विरोधकांची प्राणशक्ती कुठे आहे ही नीट जाणून घ्यायला पाहिजे आणि तिच्यावर आघात करणारे परिणामकारक शस्त्र शोधून काढले पाहिजे. हे भाजपने केले पाहिजे, असेच मतदारांनी सुचविले आहे. वाईटातील चांगले हे आहे.
 
 
- रमेश पतंगे