सोशल मीडियाचा उपयोग समाज निर्मितीसाठी करावा - अरुण डोंगरे

    दिनांक  15-Mar-2018
 
 
 
 
 
 
 
नांदेड : आजची तरुणाई प्रामुख्याने सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात करतांना दिसत आहे. मात्र या सोशल मीडियाचा उपयोग त्यांनी प्राधान्याने चांगल्या समाज निर्मितीसाठी करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय जिल्हा माहिती कार्यालय नांदेडच्यावतीने नांदेड येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयात सोशल मीडिया महामित्र उपक्रमांतर्गत संवादसत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी डोंगरे बोलत होते.
 
 
सोशल मीडियाचे आजच्या काळातील महत्व विशद करतांना जिल्हाधिकारी डोंगरे पुढे म्हणाले की, या माध्यमामुळे संदेशाची देवाण-घेवाण मोठ्या प्रमाणात होत असल्याने या सामाजिक माध्यमांचा प्रभावही तितकाच जास्त वाढत आहे. अनेकांशी जोडण्याच्या या नवीन माध्यमाचा वापर चांगल्या समाजोपयोगी योजना त्या लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी केला गेला तर खऱ्या अर्थाने चांगली समाज निर्मिती होऊ शकते.
 
 
महामित्र हा शासनाचा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून यामुळे सोशल मीडियातील प्रभावी युवक-युवती शासनाशी जोडले जात आहेत. या व्यक्तींनी भविष्यात चांगले संदेश, चांगल्या योजना तळागाळापर्यंत पोहचविण्याचा समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबवावा, अशी सुचना करुन जिल्हाधिकारी डोंगरे यांनी नांदेड जिल्ह्यातील वैशिष्ट्यपुर्ण योजनांची माहिती दिली. नांदेड जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील कार्य राज्यच नव्हे तर देशपातळीवर सुद्धा गौरविले गेले आहे, असे सांगून त्यांनी नांदेड जिल्ह्याची परिपूर्ण माहिती देणाऱ्या ॲप्लीकेशनची निर्मिती केल्याचे सांगून त्याचा वापर करण्याचे आवाहन केले.
 
 
 
जलयुक्त शिवार अभियान, तलावातील गाळ काढण्याच्या उपक्रमातून जलसंवर्धनाची चळवळ जिल्ह्यात सुरु असल्याचे सांगून जिल्हाधिकारी डोंगरे यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने राबविलेल्या महामित्र उपक्रमाचे विशेष कौतूक केले. केवळ प्राप्त झालेले संदेश कोणताही विचार न करता फारवर्ड करण्याची चुकीची पद्धत बदलून कोणताही संदेश विचार करुन फारवर्ड केल्यास आपण अधिक कार्यक्षमपणे समाजाला दिशा देवून शकतो हा विचार प्रत्येकाने बाळगावा असेही ते म्हणाले.