आम्ही कुठल्या भाषेचे?

    दिनांक  14-Mar-2018   
प्रश्न थोडा वेगळा आहे. अनेक बाबतीत प्रश्न पडतच असतो, आमची यत्ता कोंची? भाषेच्या संदर्भातही तो पडतोच. आमची भाषा नेमकी कुठली? लिपी वेगळ्या आणि भाषा वेगळी. प्रशासकीय आणि शैक्षणिक अवकाशातही अनेक रकाने भरावे लागतात. त्यात मग ‘मी कोण?’ या प्रश्नाची ठेवणीतली परंपरागत उत्तरे लिहावी लागतात. त्यात धर्म, जात, पंथ नमूद करावा लागतो. वय, लिंग, शरीराच्या खुणा... म्हणजे डोळे कसे, चामखीळ आहे का, वगैरे. त्यात भाषाही असते. भाषेच्या रकान्यात आपण मातृभाषाच लिहितो. त्याव्यतिरिक्त ज्ञात असलेल्या भाषांचाही उल्लेख करतो. जितक्या जास्त भाषा अवगत आहेत, तितके अधिक ज्ञान (की माहिती?) आहे, असे मानले जाते. कारण, भाषेसोबत त्यातील ज्ञानाचा प्रवाहदेखील वाहत येत असतो. मग आमची भाषा समृद्ध आहे का? त्यात ज्ञानशाखांचा विकास किती झाला आहे. ज्ञानाला शब्द देण्याची आमच्या भाषेची औकात किती, हादेखील सवाल आहेच.
 
अनेक बोली आहेत. बोली ही भाषा आहे का? मराठीचाच विचार केला तर विदर्भात वर्‍हाडी, झाडीबोली आहेत. उत्तर महाराष्ट्रात अहिराणी आहे, मालवणी-कोकणी आहे. मराठवाडी बोली आहे. त्या मग भाषा का नाहीत? बोलीच का म्हणायचे त्यांना? या बोलीतून अनेक शब्द, संज्ञा आणि क्रियापदे प्रमाणभाषेला मिळत असतात. बोलींचा मातीशी जवळचा संबंध असतो आणि मातीचा संस्कृतीशी स्नेह असतो. जागतिकीकरणाचा परिणाम हादेखील झाला की स्थानिक भाषांची मुस्कटदाबी झाली. तुमची जीवनशैली जी आणि जशी असेल तशीच तुमची भाषा होत असते. जागतिकीकारणानंतर जग अधिक जवळ आले. संवाद वाढला. त्यातून आजवर आपल्याला ज्ञात नसलेल्या अनेक भाषांतील शब्द आमच्या रोजच्या व्यवहारांत आले. ते त्याच भाषेचे आहेत, हेदेखील आम्हाला माहिती नाही. तसे होणे काही गैर नाही. भाषेचा विकास आहे तो. लड्‌डू, करी, सारी हे शब्द इंग्रजीने स्वीकारलेच. तसे इंग्रजीच्या काही शब्दांचे आम्ही मराठीकरण करून घेतले. ‘विकनेसपणा आला’ असे आपण सहज म्हणतो. इथवर ठीक असतं. मात्र, विकनेसला आमच्या मातृभाषेत नेमका शब्द काय, हेही आम्हाला सुचत नाही, आठवत नाही अन्‌ वेळी माहितीच नसते, तेव्हा आमच्या भाषेला आम्ही नख लावले असते.
भाषेचा माती आणि संस्कृतीशी जवळचा संबंध असतो. भाषेचा विकास माणसांच्या जगण्यातून होत असतो. त्यांच्या क्रियांना शब्द हवे असतात, संबोधन हवे असते. त्यासाठी मग आपल्या भाषेत त्याचा विचार केला जातो. जागतिकीकरणानंतर आमचे ग्रामजीवन उद्ध्वस्त झाले. ते केवळ आर्थिक पातळीवरच झाले असे नाही, तर भाषिक पातळीवरही झाले. कारण, आमची शैली बदलली आणि संस्कृतीही बदलली. खर्‍या अर्थाने जगात दोनच भाषा आहेत. एक, अध्यात्म आणि दुसरी, विज्ञान. आम्ही कुठल्या भाषेचे? खरे सांगायचे झाले, तर आम्ही आध्यात्मिक मार्गाचेच. तसाच विचार करतो. अध्यात्म हीच आमची प्रेरणा आहे. आमच्या प्रेरणांतून आम्ही आमचे जगणे मांडत गेलो, साकारत गेलो. अध्यात्म म्हणजे धर्म नाही. त्यामुळे खेड्यात राहणार्‍या अनेक जाती अन्‌ धर्माच्या लोकांची एकच भाषा होती आणि ती होती अध्यात्म. ग्रामीणजीवन समृद्ध होते तोवर आमची भाषाही समृद्ध होती. ते विसकळीत झाले अन्‌ भाषा क्षीण झाली. बोलीतून होणारा संवाद हे आमच्या ग्रामजीवनाचे वैशिष्ट्य होते. तिथल्या माणसांच्या नैसर्गिक स्वभावाचे पडसाद बोलीत प्रकट होत असतात. विदर्भात कुणाला काही विचारले तर तो वर्‍हाडीत, ‘‘काजीन का बॉ!’’ असे म्हणतो. विदर्भातल्या दोन प्रमुख बोलींसोबत इतरही छोट्या बोलींचे प्रवाह येऊन मिसळत असतात. वंजारा आहे, अनेक आदिवासी बोलींचे प्रवाह आहेत. आंध्रला लागून असलेल्या भागात तेलगु भाषाही बोलली जाते आणि मग त्याचे मराठीकरण करताना म्हणण्यापेक्षा स्थानिकीकरण करताना, एक वेगळीच बोली विकसित झाली आहे. आपल्या मुलांना किंवा एखाद्या व्यक्तीला ‘पिल्ला’ हा शब्द तिथून आला आणि मग आता अगदी पांढरपेशा नागरी भागातही आपल्या लेकरांना ‘पिलू’ म्हणण्याचा प्रघात आला. ‘अलवार’ हा शब्द मुळात मराठी नाहीच! तो तसा कर्नाटकी आहे.
मराठीत हळुवार हा शब्द आहे. मात्र, कर्नाटकातील अनेक साहित्यिकांच्या साहित्यकृतींचे भाषांतर मराठीत करण्यात आले. कर्नाटकात राहूनही मराठीत लिहिणार्‍या काही लेखकांनी तिकडे बोलीनुसार रुळलेले काही शब्द अगदी मराठीच असल्यागत त्यांच्या लेखनात वापरले आणि मग त्यातून ‘अलवार’ हा शब्द मराठीत रुजलाच नाही, तर त्याने अगदी खास असे स्थान पटकावले! सरोजिनी बाबर यांनी कर्नाटकी आणि मराठीच्या सरमिसळीवर पुस्तकच लिहिले आहे. मागे ई-टीव्ही मराठीला ‘टिकल ते पोलिटिकल’ ही मालिका यायची. चंद्रकांत कुळकर्णी मला म्हणाला, आता तू प्रमाणभाषेतच लिही. कारण? तर वर्‍हाडी भाषा तिकडच्या लोकांना कळत नाही. मालवणी, कोकणी आम्ही स्वीकारलीच ना या माध्यमाची भाषा म्हणून? मी वर्‍हाडीतच लिहीत राहिलो आणि मग अनेक शब्द रुजले तिकडेही. ‘आन्त का घरावर गोटे?’ किंवा ‘जांगळबुत्ता’ हा शब्द तर मुंबई-पुण्यात वैशिष्ट्यपूर्णच ठरला आहे. आता अनेक मालिकांत नागपूर असतं आणि वर्‍हाडी आवर्जून असते. मुळात मराठी चित्रपटांत आतावर जी ग्रामीण म्हणून भाषा होती तशी भाषा अस्तित्वातच नाही! पश्चिम महाराष्ट्राची बोलीही वेगळी आहे; पण ‘मिक्स मिठाई’सारखी ही बोली प्रस्थापित झाली होती.
भाषा क्रियापदांनी समृद्ध होत असते. बोलीत ती अधिक असतात. नव्याने निर्माण होत जातात. क्रिया असल्या की क्रियापदे निर्माण होतात. सडा टाकणे, सारवणे, जात्यावर दळणे... अशा अनेक क्रिया आहेत. शेती व्यवस्थेत तर नांगरणी, वखरणी, पेरणी, कापणी... अशा अनेक क्रिया आहेत अन्‌ त्यावरून क्रियापदे तयार होतात. शेती तांत्रिक झाली. आमचे जगणेच तांत्रिक झाले. त्यामुळे ‘बटन दाबणे’ इतकीच काय ती क्रिया असते. आपल्या व्यवसायातले शब्द श्लेषार्थाने वापरले जातात. ‘‘लगीन झालं अन्‌ तिची जिंदगी डवरून आली.’’ असे म्हणतो तेव्हा ‘डवरून’ हा शब्द शेतीतून आलेला असतो. कुणी कुणाला सहजच, ‘‘अस्सा रंधा मारीन का नाही, का गप्पच होशीन...’’ असे म्हणतो. तो सुतारकाम करीत असल्याने त्याचा आशय तो त्याच्या व्यवहाराने जोडतो. ‘‘खूपच तेल काढलं ना त्यानं...’’ म्हणजे खूपच काम करून घेतलं, या अर्थाने वापरले जाते. ‘प्रयत्ने रगडिता वाळूतूनही तेल गळे...’ ही म्हण नक्कीच तेलकाम करणार्‍यानेच निर्माण केली असावी, असे वाटते. कारण मग तेलच का? दूध का नाही? पाणी का नाही? खरेतर वाळूचा संबंध पाण्याशी जास्त आहे. आपल्या जगण्यातून भाषेला संज्ञा आणि शब्द आपण नकळत देत असतो. काही दिवसांपूर्वी ग्रामीण भागातील एका कॉलेजला गेलो होतो. तिथे एक मुलगा दुसर्‍याला म्हणाला, ‘‘जास्त टेंडर देऊ नको...’’ टेंडर हे क्रियापद झाले आणि वेगळ्या अर्थाने बोलीत आले. आमच्या बोली समृद्ध असण्यासाठी आमचे ग्रामजीवनही विकसित असायला हवे. त्यासाठी माणसे खेड्यात राहायला हवी. आता खेड्यात ‘नॉन रेसिडेन्शियल’ शहरी माणसे राहतात. कुणालाच खेड्यात राहायचे नाही. तिथे नव्या जगण्याच्या शैलीतल्या सोयी नाहीत. मात्र, तिथे संस्कृती आहे. तिथे ज्या सोयी आहेत त्या नैसर्गिक आहेत. आवाजही मोकळा आहे. बोलींचा विकास व्हायचा असेल, तर त्यातून जगण्याच्या सार्‍या कळा प्रकट व्हायला हव्या. जाते गेले तर जात्यावरच्या ओव्या गेल्या. ग्रामीणजीवनातील मौज गेली. बलुतेदारी संपली अन्‌ मग शेतीला पूरक असे व्यवसाय संपले. सारेच व्यापारी अन्‌ शहरी उद्योगांच्या हाती गेले. आता आमची भाषा आध्यात्मिकही नाही अन्‌ विज्ञानाचीही नाही. खूप खोलवर विषय आहे. पुन्हा कधीतरी बोलू यावर...