५ हजार तिबेटीयन नागरिकांचे स्वित्झर्लंडमध्ये आंदोलन

12 Mar 2018 11:27:19



जिनेव्हा : तिबेटमध्ये चीनकडून सुरु असलेल्या मानवाधिकारांच्या गळचेपीविरोधात जवळपास ५ हजार तिबेटीयन नागरिक आज स्वित्झर्लंडच्या रस्त्यावर उतरले आहेत. जिनेव्हा येथे असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार संघटनेच्या कार्यालयासमोर हजारोंच्या संख्याने तिबेटीयन नागरिकांनी आज मोर्चाकाढून तिबेटच्या स्वातंत्र्याची मागणी केली आहे. तसेच चीनच्या दडपशाहीवर संयुक्त राष्ट्रांनी ठोस कारवाई करावी, अशी देखील मागणी केली आहे.

संपूर्ण युरोप खंडामधून जवळपास ५ हजाराहून अधिक तिबेटीयन नागरिक आज जिनेव्हामध्ये आले आहेत. सर्वांनी हातामध्ये तिबेटच्या स्वातंत्र्याची मागणी करणारे फलक तसेच तिबेटचा ध्वज घेऊन जिनेव्हाच्या रस्त्यावर उतरले. चीनच्या दडपशाहीविरोधात घोषणाबाजी करत संयुक्त राष्ट्रांनी चीनच्या या कृत्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली. याच बरोबर चीनने तिबेटचा प्रदेश अनाधिकृतपणे बळकावला असून तिबेटला त्याचे स्वातंत्र्य मिळालेच पाहिजे, अशी मागणी देखील मोर्चेकरांनी यावेळी केली.
Powered By Sangraha 9.0