त्या दहा दिवसांत अनुभवलेला कट्टर कार्यकर्ता..

10 Mar 2018 21:25:16


 

 
  
 
त्रिपुरा निवडणुकीच्या वर्षभरापूर्वी मुंबई तरुण भारतचे प्रतिनिधी निमेश वहाळकर यांनी त्रिपुराचा सविस्तर दौरा केला. सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी असलेले सुनील देवधर त्यांना कसे भासले हे निमेश वहाळकर यांच्याच शब्दात...
 
 

२०१७ च्या जानेवारी महिन्यातील तो एक दिवस. वेळ साधारण दुपारी १२.३०-१ ची. मुंबई-पुण्यापासून दूरवर तिकडे ईशान्य भारतात त्रिपुरा राज्यातील अंबासा नामक ठिकाण होतं. गावात मुख्य रस्त्यावर असलेल्या एका सर्वसाधारण मिठाईच्या दुकानात बसून आम्ही तेथील बंगाली पद्धतीच्या मिठाईचा आस्वाद घेत होतो. आधीही बराच प्रवास झाला होता आणि पुढेही बराच पल्ला गाठायचा होता. मला त्रिपुरात येऊन जेमतेम दोन दिवस झाले होते. त्यामुळे ते राज्य मला पूर्णतः नवीन होतं. माझ्यासमोर बसले होते सुनील देवधर. गप्पा आणि सोबत मिठाई आणि सामोसे वगैरे खाणं सुरू होतं. सकाळी ६-७ पासून सुरू झालेला दौरा रात्री उशिरापर्यंत चालणार होता. अंबासामधील ही विश्रांती जेमतेम पंधरा-वीस मिनिटांची होती. त्यामुळे हेच जेवण असणार, हेही हळूहळू लक्षात येऊ लागलं होतं. खाणं झाल्यावर सुनीलजींनी पटकन शेजारील पेल्यातील पाणी घेतलं आणि त्या खाल्लेल्या ताटातच हात धुतले. अर्थात, ज्या देशात दर पाच-दहा किलोमीटरवर खाण्या-पिण्याच्या, आचार-विचारांच्या पद्धती बदलतात तिथे ताटात हात धुणं हा प्रकार काही नवीन नव्हे. मात्र, पुण्यात जन्मलेल्या आणि नंतर मुंबईकर झालेल्या देवधरांनी ताटात हात धुण्याचं मला त्यावेळी फार अप्रूप वाटलं. मी कुतूहलाने पाहतोय, हे लक्षात आल्यावर तेच स्वतः उत्तरले, मी नेहमी ताटातच हात धुतो. तुला कदाचित हे वेगळं वाटेल. पण यामुळे देशाचं पाणी वाचतं. नळावर हात धुतात तेव्हा कितीतरी पाण्याचा उगाचच अपव्यय होतो.’’ हे स्पष्टीकरण माझ्या तितकंसं पचनी पडलेलं नाही, हेही त्यांच्या लक्षात आलं. मी नंतर काहीशा नाखुषीनेच हात धुवायला उठलो आणि नळापाशी गेलो. देवधरांनी हलकंच स्मित केलं, आणि आमचा पुढील प्रवास सुरू झाला. 

 

प्रसंग तसा छोटासाच. परंतु, आपल्या संघटनेचे कट्टर आणि हाडाचे वगैरे कार्यकर्ते म्हणून गणना होणारी माणसं किती कट्टर आणि हाडाची असतात, याचं एक उदाहरण म्हणून हा प्रसंग माझ्या आजही जसाच्या तसा लक्षात आहे. सध्या देशभरात चर्चेत असलेले सुनील देवधर हेही अशाच कट्टर कार्यकर्त्यांपैकी एक नाव. नुकत्याच झालेल्या त्रिपुरा निवडणुकीच्या दरम्यान त्रिपुरात जाऊन वार्तांकन करण्याची माझी संधी हुकली खरी पण, याच्या बरोबर १ वर्ष आधी २०१७ च्या जानेवारी महिन्यात दहा-बारा दिवस त्रिपुरामध्ये जाऊन फिरण्याची, वार्तांकन करण्याची संधी मला मिळाली होती. गेल्या काही वर्षांत पत्रकारितेचा एक विद्यार्थी म्हणून जो काही थोडाथोडका अनुभव माझ्या दप्तरात जमा झाला आहे, त्यात या त्रिपुरा दौर्‍याचं स्थान फार वरचं आहे. आज प्रत्यक्षात साकार झालेली भाजपची चलो पलटाईची मोहीम तेव्हा नुकतीच कुठे आकार घेऊ लागली होती. सुनील देवधर नामक (माणिक सरकार आणि अन्य कम्युनिस्टांच्याच शब्दांत) नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातून आणलेला सुभेदार या मोहिमेसाठी रसद गोळा करत होता. एकेक माणूस जोडत होता, राज्याचा कानाकोपरा फिरून रणमैदानाची चाचपणी करत होता. ही सर्व प्रक्रिया, किमान दहा-बारा दिवसांपुरती का होईना, मला जवळून पाहता आली, अनुभवता आली. 

 

सुनील देवधरांचं नाव आधीपासून ऐकून होतो पण पूर्वी कधी प्रत्यक्ष भेट झाली नव्हती. डिसेंबर, २०१६ मध्ये ते मुंबईत आले असता भेटायला गेलो आणि थेट त्रिपुरा दौर्‍याच्या तारखा ठरवूनच निघालो. त्यानंतर भेट झाली थेट त्रिपुरामध्ये. त्याआधी आसाम, अरुणाचल किंवा महाराष्ट्रात पालघर आदी दुर्गम भागांत फिरणं झालेलं असल्याने आणि तेथील संघाचं काम पाहता आलं असल्याने संघाची प्रचारक सिस्टिम कशी असते, हे माहीत होतं. पण प्रचारक म्हणून काम थांबवून राजकीय क्षेत्रात काम सुरू केल्यानंतर, केंद्रात सत्ता असलेल्या पक्षाचा उच्चस्तरीय नेता बनल्यानंतर आणि एका राज्याचा प्रभारी बनल्यानंतरही मूळ पिंड जाता जात नाही, हे देवधरांच्या त्रिपुरातील निवासस्थानी गेल्यानंतर लगेचच लक्षात आलं. त्रिपुराची राजधानी आगरतळामध्ये अगदी राज्य विधानसभेची इमारत समोरून दिसेल अशा ठिकाणी असलेल्या श्यामालिमा अपार्टमेंटमध्ये एका फ्लॅटमध्ये सुनील देवधर राहतात. तिथेच टीम सुनील देवधर अर्थात, त्यांचा पीए विवेक, शिवाय सुनील देवधरांसोबत त्रिपुरा बदलण्याचं ध्येय पदराशी बाळगून देशाच्या कानाकोपर्‍यातून आलेले कार्यकर्ते, असे सगळेच राहतात. एका कुटुंबासारखेच. मीही तिथेच राहिलो, या सर्वांसोबतच जेवलो, हिंडलो-फिरलो हे विशेष. एखाद्या हॉटेलवर उतरलो असतो तर कदाचित एवढं लिहू शकलो नसतो. साधारणतः पक्षाचा एखाद्या ठिकाणचा प्रभारी हा शक्यतो निवडणुकांमध्ये उमेदवारी निश्चित करणं, पदाधिकार्‍यांच्या नेमणुकांवर लक्ष ठेवणं, घडणार्‍या घटनांची केंद्रीय नेतृत्वापर्यंत माहिती पोहोचवणं आणि पक्षात कनिष्ठ-वरिष्ठ स्तरावर समन्वय ठेवणं, इतपतच काम करतो. इथे मात्र सुनील देवधरांकडे अगदी त्रिपुरा भाजपचं पालकत्वच दिलंय की काय, असं वाटण्याइतपत परिस्थिती होती. 


 

रोज सकाळपासून सुरू होणार्‍या भेटीगाठी, बैठका, सभा आणि संपर्क अभियानं असा भरगच्च कार्यक्रम. हे नसल्यास राज्यात अन्य ठिकाणी दौरा आणि तिथे पुन्हा सभा आणि संपर्क. हे नसल्यास दिल्ली दौरा आणि तिथेही पक्षाच्या पदाधिकार्‍यांसोबतच्या बैठका, महत्त्वाचे निर्णय. या सगळ्यातून वेळ काढून माय होम इंडियाव अन्य सामाजिक काम. स्थानिक भाषा शिकणं, त्यातून स्थानिकांशी संवाद साधण्यासाठी प्रयत्न करणं. या सगळ्यातून चुकून वेळ उरलाच तर लॅपटॉपसोबत थोडा वेळ घालवणं, जुनी हिंदी गाणी ऐकणं, वाचन वगैरे. यातील लॅपटॉप म्हणजे उत्कृष्ट असा जर्मन शेफर्ड कुत्रा आहे, हे वाचकांनी ध्यानात घ्यावं ! जेवणाखाण्याच्या वेळा, पथ्यं, संध्याकाळी ट्रॅकसूट घालून फिरायला जाणं, (सोबत पीए विवेक आणि एखादा कार्यकर्ता आणि लॅपटॉप इतकेच !), लवकर झोपणं, उठणं, हे सगळं देवधर करत खरं. पण, आठवड्यातील तीन-चार दिवस तर दौरे आणि प्रवासातच जातात. त्यात बाहेर जिथे आणि जे मिळेल ते खाणं होतं, वेळांचा तर पत्ताच नाही, तर मग पुन्हा उरलेल्या दोन दिवसांत हे डाएट वगैरेचा यांना उपयोग तरी काय? असा मला प्रश्न पडे. देवधरांची ती बिचारी स्कॉर्पिओ गाडी तर त्रिपुरात इतकी फिरली की, आता ती गाडीही त्रिपुरावर एक लेख लिहू शकेल. 

 

 

 
एरवी प्रचंड ऊर्जेने झपाटून अथकपणे काम करणारा, प्रसंगी कठोर होणारा तर कधी मिश्कील टीका टिप्पण्या करून हास्याच्या कारंज्यांमध्ये बुडून जाणारा हा माणूस अनेकदा आतल्या आत दुःखी झालेलाही मी पाहिला. शेवटी समोर कम्युनिस्ट होते. मार्क्स, लेनिन, स्टॅलिन, माओ आणि फिडेलचा वारसा सांगणारे. त्यामुळे राज्यात भाजपचं राज्यात हळूहळू, नेटाने विणलं जात असलेलं घरटं उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न अनेकदा झाला. गंडाचारासारख्या अतिदुर्गम भागात स्थानिक जनजातींमध्ये भाजपचा झेंडा घेऊन उभा राहिलेला युवक, चांदमोहन त्रिपुराची जेव्हा कम्युनिस्ट गुंडांनी दगडांनी ठेचून हत्या केली, तेव्हा त्या गंडाचाराला तातडीने पोहोचण्याची देवधरांची लगबग मी पाहिली. चांदमोहनचा दहा-बारा वर्षांचा मुलगा जेव्हा हंबरडा फोडत त्यांच्या पुढ्यात उभा राहिला, तेव्हा त्या मुलाचं दुःख मी देवधरांच्या डोळ्यात पाहिलं. मात्र, चांदमोहनच्या कुटुंबाला भेटून परत निघताना, त्या डोंगरांतील पायवाटा तुडवताना, याच देवधरांच्या अबोल चेहर्‍यावर दिसणारा एक वेगळाच निश्चय, ध्येयासक्ती आणि आशावादही मी पाहिला. ही ध्येयासक्ती आणि आशावादच कदाचित, त्रिपुरा भाजपला दरवेळी राखेतून नव्याने जन्म घेऊन नेटाने विजयसोपानापर्यंत घेऊन जाण्यास कारणीभूत ठरला असावा..
 

आपण नेमकं काय करतो आहोत, कशासाठी आणि कोणासाठी करतो आहोत, ते योग्य आहे का आणि जे काही करतो आहोत, ते खरंच यशस्वी होईल का?, याचं नेमकं भान आणि दृष्टी सुनील देवधरांकडे असते. ती त्यांच्या मातृसंस्थेने आणि आदर्शांनी दिलेला विचार, केलेला संस्कार आणि त्याचं देवधरांनी स्वतःच्या अनुभवावर, चिंतनावर केलेलं आकलन, यातून ती दृष्टी घडत गेली असावी. म्हणूनच, त्रिपुराचे निकाल जाहीर झाल्याच्या दिवशी जेव्हा त्यांना फोन केला, अपेक्षेप्रमाणे त्यांनी तो उचलला नाहीच पण नंतर लगेचच त्यांचा फोन आला आणि निमेश, कसा आहेस? अशा नेहमीच्या शैलीत त्यांनी बोलायला सुरुवात केली. त्रिपुराचे निकाल, त्यानंतर त्यांच्यावर होत असलेला अभिनंदनाचा वर्षाव, सुनील देवधर या नावाची देशभरात घेतली गेलेली नोंद, हे सगळं जणू त्यांच्या गावीही नव्हतं. कदाचित, त्यांनी पुढे आपल्याला आपली संघटना कोणती जबाबदारी देणार, ती मिळाल्यावर आपण काय करायचं आहे, याची तयारीही त्यांनी सुरू केली असेल. येत्या काळात कदाचित देवधरांकडे पक्षाच्या आणखी मोठ्या जबाबदार्‍या येतील, कदाचित ते केंद्रीय स्तरावर जातील, खासदार-केंद्रीय मंत्रीही बनतील पण, त्यानंतरही जर कधी त्यांची भेट झालीच, तर तेव्हाही ते जमेल त्या मार्गांनी देशाचं पाणी वाचवतानाच दिसतील, यात शंका नाही. कारण, शेवटी त्यांचा मूळ पिंड तसा आहे. कट्टर कार्यकर्त्याचा. माझं त्या दहा दिवसांतील वाचन तरी तसंच सांगतं.

Powered By Sangraha 9.0