पुराणातील तत्वज्ञान हे सनातन : वासुदेव कामत

    दिनांक  08-Feb-2018   
 मुंबई : ‘‘आपल्याकडे सांगितलेलं तत्वज्ञान हे पौराणिक नाही. हे तत्वज्ञान केवळ पुराणापुरतं आणि उपनिषदांपुरतं मर्यादितही नाही, तर ते ‘सनातन’ आहे आणि ‘सनातन’ हा शब्द जरी आपल्याकडे ‘पुरातन’ सारखा वापरला जात असला तरी तत्वज्ञान हे ‘सनातन’ अर्थात नित्यनूतन, कायम राहणारं आहे आणि यामध्ये बदल होऊ शकत नाही. कारण, ते त्रिकालबाधित सत्य आहे,’’ असे मौलिक विचार सुप्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी खास बातचीत करताना व्यक्त केले. वासुदेव कामत यांचे गुरु-शिष्य संवादावर आधारित ‘उपनिषत्सु’ हे कलाप्रदर्शन जहांगिर कलादालनात ६ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. तेव्हा, या कलाप्रदर्शनामागील प्रेरणा आणि संकल्पना यासंबंधी त्यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी मनमोकळ्या गप्पा मारल्या.
 
‘उपनिषत्सु’ या चित्रकला मालिकेच्या संकल्पनेविषयी बोलताना कामत म्हणाले की, ‘’रामायणावर ज्यावेळी चित्रकला प्रदर्शन करायचे मी ठरवले होते, त्यावेळी वाटले की, रामायणावर यापूर्वीच कित्येकांनी कलाकृती सादर केल्या आहेत. त्यामुळे एकही अशी ललित कला नाही, जी रामायणावर सादर केलेली नाही. तेव्हा, अधिकृत रामायणं संख्येने १४-१५ जरी असली तरी दोनशेच्या वर रामायणं झाली आहेत. मग त्यावेळी ‘मी वेगळे काय करणार’ हा प्रश्न मला पडला आणि तेव्हाच मला रामायणातील खारीच्या गोष्टीने प्रेरणा मिळाली. कारण, रामसेतू बांधताना खारीच्या वाट्याला रामाची शाबासकी मिळते. मग तोच धागा गुंफून मी त्या चित्रांमध्ये खार सगळीकडे दाखविली. हे करत असताना मला प्रकर्षाने जाणवलं की, उपनिषदांमध्ये तत्वज्ञान खूप आहे. परंतु, एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते की, गुरु आणि शिष्याचा संवाद आहे.’’
 
 

 
 
गुरु-शिष्याच्या संवादाविषयी पुढे बोलताना ब्रह्मज्ञान आणि शिक्षणाची जिज्ञासा यावरही कामत यांनी प्रकाश टाकला. ते म्हणाले की, ‘‘ब्रह्मज्ञानाकडे जाण्यासाठी अनुभव असलेला माणूस अनुभव नसलेल्या माणसाला शिकवितो. त्याव्यतिरुक्त बाकी उपनिषदांत वेगळं काहीचं नाही. परंतु, एक गोष्ट लक्षात आली की, गुरु आणि शिष्याचं नातं हे रक्ताच्या नात्यासारखं नसतं. जाणकार त्याचा अनुभव शब्दांत सांगत असताना जाणून घेणार्‍याची जिज्ञासाही तेवढीच महत्त्वाची आहे. त्यामुळे हे सगळं वाचताना एक गोष्ट लक्षात आली की, मागितल्याशिवाय द्यायचं नाही आणि आंधळेपणाने काहीही स्वीकारायचं नाही. प्रश्नाला अचूक उत्तरं मिळतातही, पण त्या उत्तरांतून समाधान होईलचं असं नाही. समाधानासाठी अनुभूतीची आवश्यकता असते. त्यामुळे तुम्ही अनुभव घ्या आणि मग बोला. कारण, जो मला ‘ब्रह्मज्ञान प्राप्त झाले आहे,’ असे म्हणतो, त्याला ते झालेले नसते आणि जो ‘ब्रह्म नाही कळले’ असे सांगतो, त्याला खूपसं कळलेलंही असतं.’’
 
वासुदेव कामत यांच्या कलाप्रदर्शनातील काही चित्रे ही विशिष्ट उपनिषदांवर आधारित आहेत, तर काही अभ्यास करताना जाणवलेल्या विचारांवर चित्रीत आहेत. सगळीच चित्रे दृष्टी आणि मन खिळवून ठेवणारी आहेत. विशेष म्हणजे, प्रत्येक चित्रात रुढार्थाने एक वैचारिक संदेश देण्याचा कामत यांनी केलेला प्रयत्न स्तुत्य असून कलारसिकांचाही त्यांच्या चित्रांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
 

 
 
ज्याप्रमाणे कामत यांच्या ‘मर्यादा पुरुषोत्तम’ या चित्रमालिकेत, सर्व प्रसंगाची साक्षीदार एक खार होती, त्याचप्रमाणे ‘उपनिषत्सु’ या चित्रांच्या मालिकेत इवलेसे कासव सर्व चित्रांमध्ये लक्ष वेधून घेते. प्रत्येक चित्रात कासवाला स्थान का, याचे अगदी स्पष्ट आणि समर्पक उत्तर कामत देतात. ते म्हणतात, ‘‘कासवाला आघात सहन करण्याची क्षमता असलेली पाठ आहे. मत्स्यावतार वगैरेशी याचा काही संबंध नाही. परंतु, धोका जाणवल्यावर कासवाची इंद्रियं तो आवळून घेतो. याप्रमाणे इंद्रियांना काबूत ठेवायचे असेल, तर ती आपल्याला बुद्धीने खेचता आली पाहिजेत. त्यामुळे अंतर्मुख होण्यासाठी इंद्रियांना बहिर्मुख करावे लागते. आणि विशेष म्हणजे, कासव धीम्या गतीने जरी चालतं असले तरी आपलं लक्ष्य गाठेपर्यंत ते चालतचं राहाते आणि ते दीर्घायु होते. या एवढ्या गोष्टीमुळे कासव अर्थात ‘मी’ हे मी सगळं साक्षी असल्यासारखं दाखवलं आहे. म्हणून कासवाला या सर्व चित्रांमध्ये स्थान आहे.’’
 
वासुदेव कामत यांच्या या चित्रप्रदर्शनाची खासियत म्हणजे, गुरु-शिष्याच्या या अदुत नात्यातील संबंधांचा पदर त्यांनी कल्पकतेने, वैविध्यपूर्णतेने उलगडला आहे. त्यातच या सर्व चित्रांमध्ये केवळ एक गुरु आणि एकच शिष्य का, अशी विचारणा केली असता कामत यांनी दिलेले उत्तर खरंच विचारप्रवृत्त करते. चित्रांमधील एक गुरु आणि एक शिष्य याविषयी बोलताना ते म्हणतात की, ‘‘तुम्ही जरी दहा विद्यार्थ्यांना शिकवत असाल, तरी गुरु आणि शिकणारा विद्यार्थी हे दोघचं असतात. मी शाळेत संस्कृत शिकत असताना बाईंना संस्कृतमध्ये द्विवचन का, असा प्रश्न विचारला असता, त्यांना त्याचे काही व्यवस्थित उत्तर देता आले नाही. अशाचप्रकारे जर्मन, यहुदी भाषांमध्येही द्विवचन आहे. पण, गुरु आणि शिष्य ही युगलभक्ती ही फक्त आपल्याकडे आहे. ते एवढ्याचं साठी की, ‘मी आणि तू’ हे शिकणं हा प्रकार इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की, द्विवचनाची गरज भासली असावी. मी शिकत असताना ‘मी विद्यार्थी’ आणि ‘तो माझा शिक्षक.’ त्यामुळे ‘आम्ही दोघं विद्यार्थी आणि एक शिक्षक’ असं कधीचं नसतं. त्यामुळे सगळीकडे द्विवचनाचा वापर केलेला दिसून येईल.’’ आपल्या भारत देशाला पुरातनकाळापासून गुरु-शिष्यांची एक संपन्न परंपरा लाभली आहे. त्यापैकीच एक आदर्श शिष्याचे उदाहरण म्हणजे एकलव्य आणि द्रोणाचार्य. पण, वासुदेव कामत यांच्या चित्रांमध्ये त्याव्यतिरिक्त इतर अनेक गुरु-शिष्य परंपरेचे पाईक असलेल्या पात्रांचे सुंदर चित्रण आढळते.
 
 
 
त्यापैकीच एक नाते म्हणजे अगस्त्य ऋषी आणि लोपामुद्रा. या गुरु-शिष्याच्या नात्यात लोपामुद्रा अगस्त्य ऋषींना जाब विचारते आणि शिकवते. लोपामुद्रा ही राजकन्या, तर अगस्त्य हे वैरागी. पण काही दिवस अगस्त्य ऋषी सहन करतात आणि पुरुषार्थ करायचा असेल तर काही तरी करायला पाहिजे, असा विचार करतात. त्यामुळे वेदांमध्ये लोपामुद्राच्या चार ऋचा आहेत, ज्या केवळ पुरुषाला पुरुषार्थ करायला लावणार्‍या आहेत. दुसरे गुरु-शिष्य परंपरेच्या नात्याचे उदाहरण म्हणजे गार्गी आणि याज्ञवल्क्य. याविषयी कामत सांगतात की, ‘‘ज्यावेळी जनकराजा ब्रह्मसभा भरवतो आणि जिंकलेल्याला हजार गायी आणि १० ग्रॅमचं सोनं दान करतो, तेव्हा याज्ञवल्क्य शिष्याला ते घेऊन येण्यास सांगतात. पण, गार्गी याज्ञवल्क्यांना अडवते. ती याज्ञवल्क्यांना सभा पूर्ण करण्याचं आवाहन करते.’’ या गुरु-शिष्य परंपरेविषयी बोलताना कामत म्हणतात की, ‘‘गुरु-शिष्यांचं नातं हे रक्ताच्या नात्यापेक्षा वेगळं असतं.’’ पण, त्याचबरोबर गुरु-शिष्यामधील एका रक्ताच्या नात्याचाही ते आवर्जून दाखला देतात. ते गुरु-शिष्य म्हणजे कपिल आणि देवावती. कपिल मुलगा आणि देवावती ही त्याची आई. पण, ज्यावेळी मुलगा ब्रह्मज्ञानी आणि आई मात्र तशीच राहते, त्यावेळी कपिलमुनी आईला ज्ञान प्रदान करतात. ते वर बसतात आणि त्यांची आई (इथे शिष्या) खाली बसते. मग या ठिकाणी रक्ताचं नातं महत्त्वाचं नाही, तर गुरु आणि शिष्याचं नातं अधिक महत्त्वाचं आहे. पण, शेवटी कितीही झालं तरी तो मुलगा आहे. म्हणून त्याच्या हातावरती आईने हात ठेवलाच आहे.
 
त्यामुळे गुरु-शिष्याचं नातं हे असं असतं. काही ठिकाणी आई आणि मुलगा, तर कुठे नवरा आणि बायको. सारीपुत्र आपल्या आईला शेवटच्या क्षणी दीक्षा देतो, असाही एक उल्लेख असल्याचे कामत सांगतात. ‘नचिकेतासि हाच वर द्यावा...’
 
वासुदेव कामत यांनी एका चित्रात यम-नचिकेत संवादाचे विलक्षण चित्र रेखाटले आहे. याविषयी सांगताना ते म्हणतात की, ‘‘यम-नचिकेताच्या संवादामध्ये शिष्याला जेव्हा एखादी गोष्ट प्राप्त होते, तेव्हा त्याच्यामध्ये ती देण्याची वृत्ती येते की नाही, याचा विचार दिसतो. ज्या ठिकाणी भाकड गाई दान देतोय म्हटल्यावर नचिकेत बापाशी वाद घालतो आणि यम ज्यावेळी नचिकेताला ‘वर माग’ म्हटल्यावर ‘‘माझ्या पित्याला क्षमा करं,’’ हे औदार्य दाखवतो. म्हणजेच, ‘जे खळांची व्यंकटी सांडो’ हे पसायदानातील ज्ञानेश्वरांचे वचन. अर्थात, ‘‘देवा, हे काय करताहेत, त्यांना कळत नाही, तू त्यांना क्षमा करं....’’
 

 
 
‘इंद्रिय सुखाचे अश्व धावती...’
या चित्राविषयी बोलताना कामत सांगतात की, ‘‘कठोपनिषदामध्ये जवळ जवळ सहा श्र्लोक यम-नचिकेताच्या संवादामध्ये शरीररथावरती आहेत. म्हणजे यमनचिकेताला सांगतो की, ‘‘मानवी शरीर हे रथासारखं असतं आणि इंद्रिय ही अश्वशक्तीसारखी आहेत आणि त्या पाच इंद्रियांना जोडलेला लगाम म्हणजे आपलं मन. पण, ही इंद्रिय त्यांच्या विषयांमागे धावत असतात आणि मन आणि रथ त्याला जोडलेले असल्यामुळे तेही त्याच्यामागे धावत असते. बुद्धी हा सारथी आहे, हे नचिकेता तू लक्षात ठेव.’’ पण, आज स्वत:ला ‘पुरोगामी’ म्हणवणारे किंवा वामपंथी बुद्धिप्रामाण्याला थारा नाही म्हणतात. पण, इथे तर पाच हजार वर्षांपूर्वी यमनचिकेताला बुद्धी ही महत्त्वाची आहे, असे स्पष्ट सांगतो. म्हणूनचं सांगितलं जातं की, आंधळेपणाने काहीही स्वीकारायचं नाही. आपली इंद्रिय ही अशीच आंधळी आहेत, हा संदेश देणारे हे चित्र...’’
 

 
 
जन्म-मृत्यूच्या फेर्‍यात...
 
जन्म-मृत्यूचे फेरे कुणाला चुकलेले नाहीत. त्याविषयी एका बोलक्या चित्रात सागरात तरंगणार्‍या कासवाच्या गळ्यात अडकलेले कडे दिसते. या चित्रामागील संकल्पना स्पष्ट करताना कामत सांगतात की, ‘‘चिकालसुक्त हे मला अत्यंत आवडलेलं सुक्त आहे. आता त्यामध्ये गुरु-शिष्य नसले तरी बुद्धांनी त्यांच्या शिष्यांना सांगितलेली कथा आहे. चिकाल म्हणजे लाकडी रिंग किंवा कडे. पूर्वी लक्ष्यभेद करायला ते वापरले जायचे. महासागरामध्ये ते कडे तरंगते आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडे, उत्तरेकडून दक्षिणेकडे... आणि एक आंधळे कासव आहे, जे तळाशी जाते आणि परत वर येते. त्या कासवाला तळाशी जायला १०० वर्षं आणि परत वर यायला १०० वर्षं लागतात. असे हे चक्र सतत सुरु आहे. एकदिवशी ते कासव वर आल्यावर त्याच्या गळ्यामध्ये ते कडे अडकते. म्हणजेच, या कासवाप्रमाणे जन्म-मृत्यूच्या या फेर्‍यात मनुष्य कितीतरी वेळा वर जातो आणि खाली येतो. पण, तथागत आलेला असताना तुमची गाठ गळ्यात पडते. पण, जर पुन्हा ते कडे निघाले, तर तुम्ही कुठे तरी वर-खाली फिरत राहाल आणि ती कडेही फिरत राहील. यापेक्षा चांगलं उदाहरण काय पाहिजे. या कथेमधील बोध हाच की, आज तुम्ही कार्य कराल. पण, करतं असलेलं कार्य सोडू नका. कारण, मृत्यू हा कधी येईल हे तुम्हाला माहिती नाही. त्यामुळे मृत्यूची जाणीव कायमठेवून कामकरायला लागा, असा संदेश बुद्धांनी दिला.’’  तेव्हा, गुरु-शिष्य संवादाला कुंचल्याच्या माध्यमातून मूर्तरुप देणारे हे चित्रकला प्रदर्शन जरुर पाहावे, मनात साठवून ठेवावे....
विचार व्यक्त केल्याशिवाय अमूर्तच...
 
‘‘आम्ही चित्रकार म्हटल्यावर पहिल्यांदा गोष्ट व्ह्यूज्वलाईज होते. त्यानंतर आम्ही त्याचे स्केच करतो. मनात विचार येतात-जातात, पण करावंसं वाटलं की, त्याला मनातून लगेच पोषण मिळालं पाहिजे. नाही मिळालं तर तो विचार विरुन जातो किंवा विस्मृतीत जातो. त्याची तीव्रता कमी होते. ‘हे छानं होऊ शकतं’ असं वाटतं, पण दुसर्‍या दिवशी ते आठवतं, पण करावसं वाटत नाही. त्यामुळे विचारांना खतं मिळालं पाहिजे, ओलावा मिळाला पाहिजे. म्हणून, प्रत्येक विचाराला भाषा असते. तुम्ही तुमच्या मातृभाषेत विचार करतात आणि त्या विचारांना तसं दृश्यही असतं. जोपर्यंत ते विचार शब्दांतून, अभियनांतून, चित्रांतून व्यक्त होत नाही, तोपर्यंत ते अमूर्त असतात. त्यामुळे माझी चित्र रिऍल्स्टिक असल्यामुळे पंचमहाभुतांशिवाय ती पूर्णच होऊ शकत नाही.
-वासुदेव कामत, सुप्रसिद्ध चित्रकार.
 
 
 
 
 - विजय कुलकर्णी