महाशिवरात्र

    दिनांक  07-Feb-2018   

 
11th Century Hindu Temple of Quanzhou, China. PC: The Hindu

आज सुमितची स्वारी आल्या आल्या स्वयंपाकघराकडे वळली. “आजी, खमंग वास येत आहे. काय भाजत आहेस?”, इति सुमित.
“महाशिवरात्रीच्या उपासासाठी तयारी करून ठेवत आहे. संध्याकाळी थालीपीठासाठी ही उपासाची भाजणी. न्याहारीला, साबुदाण्याची खिचडी. दुपारी खजुराची खीर, वाऱ्याच्या तांदळाचा भात, बटाट्याची भाजी आणि दाण्याची आमटी. त्यासाठी दाणे भाजून ठेवले आहेत, खजुर निवडून ठेवले आहेत. मधल्या खाण्यासाठी दाण्याचे लाडू करावे म्हणते. आणि वाटलं तर उपासाचे पापड आणि साबुदाण्याच्या पापड्या पण तळता येतील!”, दुर्गाबाई म्हणाल्या.
“एकदम कडक उपास आहे बरे का आमचा सुमित!”, आबा मिश्किलपणे म्हणाले.


“पण मेनू बेस्ट आहे! आजी, शिवरात्रीला मी इकडेच येतो राहायला. आई - बाबा जाम बोर आहेत, ते असले भारी उपास करतच नाहीत.”, सुमितने म्हणाला.
“अरे, माझा महादेवच इतका भारी आहे, मग त्याचा उपास पण भारीच असणार ना! त्यातून ही महाशिवरात्र आहे! मग तर उपासना पण भारी करायला हवी!”, आबा म्हणाले.


“आबा, ‘भारी’ उपास तर कळला. ‘भारी’ उपासना काय असणार?”, सुमितने विचारले.


“महाशिवरात्रीच्या रात्री आपल्या जवळच्या मंदिरात शंकराची महाआरती असेल. शंख, डमरू आणि झांजेच्या ठेक्यावर ‘हरि ओम, हर हर, हर महादेव!’ चे नाद आणि धूप, दीप, कापुराचा उजेड याने आसमंत भरून जाईल! त्यानंतर मात्र घरी एकांतात रात्रभर शिवस्मरण करायचं!”, आबा म्हणाले.


“हे भारी आहे! उपसाबरोबर मी आरतीला पण येईन! आबा, शिवरात्रीची सुद्धा आकाशातली गोष्ट आहे का?”, सुमितने विचारले.
“आहे तर! सांगतो. बघ हं, प्रत्येक महिन्यात शिवरात्र असते. अमावस्येच्या दोन दिवस आधी शिवरात्र येत. अमावस्येच्या आदल्या दिवशी, म्हणजे चतुर्दशीला चंद्रकोर दिसणे खूपच अवघड असते. पण, त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे त्रयोदशीला, चंद्राची बारीक कोर पहाटे उगवतांना दिसते. त्रयोदशीला पृथ्वी, सूर्य आणि चंद्र आकाशात कसे असतात बघ –
 

 
“त्रयोदशीला पहाटे चंद्र उगवतो. आणि त्यानंतर साधारण दीड ते दोन तासांनी सूर्योदय होतो. चंद्राची बारीक कोर सूर्योदयानंतर सुद्धा काही वेळ आकाशात दिसते.


“त्रयोदशीची चंद्रकोर जेंव्हा उगवत्या सूर्याच्या माथ्यावर विराजमान होते, तेंव्हा आकाशात साक्षात शिवाचे मुखदर्शन होते. पहा, डोक्यावर चंद्राची सौम्य सुंदर चंद्रकोर धारण केलेला तेजस्वी देव!”, आबा म्हणाले.

 
“Oh! काय सुंदर आणि भव्य देव आहे हा! महादेव हे नाव सार्थ आहे! बर आबा, दर महिन्यात जर शिवरात्र असते तर मग महाशिवात्रीला इतके जास्त महत्व का?”, सुमितने विचारले.


“सुमित, शंकर हा अंधाराचा देव आहे. आणि महाशिवरात्र ही सगळ्यात मोठी रात्र आहे. सर्वात गडद अंधार असलेली रात्र! अर्थात Winter Solstice ची रात्र! या नंतर दिवस मोठा होत जाणार, अधिक प्रकाश आणि उब असलेले दिवस येणार. त्या आनंदात ही रात्र जागून काढायची. शिवाची उपासना करायची. रात्री जागरण करता यावे, झोप लागू नये, सुस्ती येऊ नये म्हणून उपास करायचा. म्हणजे दिवसभर कमी खायचे.”, दुर्गाबाईंनी नाक मुरडले, तसे आबा विषय बदलत म्हणाले, “तुला माहित आहे का? आजही इराण मध्ये Winter Solstice ची रात्र, ‘शब ए याल्दा’ अर्थात ‘सर्वात मोठ्या रात्रीचा उत्सव’ म्हणून साजरी केली जाते. फळे खाऊन, रात्री जागरण करतात. रात्री मित्र मंडळी एकत्र जमून काव्य गायन करतात.”, आबा म्हणाले.


“उपास, जागरण आणि भजनच करतात म्हणा की!”, दुर्गाबाई म्हणाल्या, “हे पारसी लोक धार्मिक बर का! त्यांनी सुद्धा आपल्या प्रमाणे प्राचीन परंपरा जपून ठेवल्या आहेत!”


“पण आबा, Winter Solstice तर २१ / २२ डिसेंबरला होऊन गेला. आता तर फेब्रूवारी महिना आहे. मग महाशिवरात्र इतक्या उशिराने कशी काय?”, सुमितने विचारले.


“कसं आहे सुमित, पृथ्वी डोलत डोलत स्वत:भोवती फिरते. हे डोलणे अतिशय संथ आहे, २६,००० वर्षात पृथ्वीची मान एकदा डोलवून होते. पण यामुळे होते काय, की सर्वात लहान दिवस अलीकडे सरकत राहतो. कौषीतकी ब्राह्मण ग्रंथात अशी नोंद आहे, की त्यावेळी महाशिवरात्र ही सर्वात मोठी रात्र होती. त्यावरून आपल्याला असे सांगता येते की, ब्राह्मण ग्रंथातली नोंद ५,००० वर्षांपूर्वीची आहे.”, आबा म्हणाले.


“पण उत्तरायणाचा दिवस जर मागे गेला असेल, तर तसे तो उत्सव पण मागे सरकवून दुरुस्ती नको का करायला?”, सुमितने विचारले.


“अगदी योग्य प्रश्न विचारलास सुमित! उत्तरायण मागे सरकले आहे, हे लक्षात यायला हजार एक वर्ष तरी लागतात. ते लक्षात आल्यावर दुरस्ती केली गेली. महाशिवरात्र माघ महिन्यातच राहिली, पण तो उत्सव उत्तरायणाचा न राहता, शिवाचा उत्सव म्हणून होत राहिला. या वेळी उत्तरायणाला सूर्य मकर राशीत प्रवेश करत असे. म्हणून उत्तरायणाचा उत्सव मकर संक्रांतीला सुरु केला.


“आता मकर संक्रांत सुद्धा Solstice नंतर २० दिवसांनी येते! तेंव्हा पुन्हा एकदा दुरुस्तीची वेळ आली! स्वातंत्र्यानंतर भारताचे राष्ट्रीय सौर कॅलेंडर तयार करण्यात आले. या कॅलेंडर प्रमाणे उत्तरायण, सौर पौषच्या १ तारखेला असतो. अर्थात २२ डिसेंबरला असतो. आता ते कॅलेंडर वापरात आणायची तेवढी खोटी आहे! ते झालं, की मग उत्तरायणाचा सण Winter Solstice लाच साजरा केला जाईल!”, आबा म्हणाले.


“बर, शंकरराव तुम्ही मगा त्रयोदशीचा चंद्र आणि शिवरात्रीची गोष्ट सांगितली. चंद्राचे आणि शिवाचे काय नाते आहे?”, दुर्गाबाईंनी विचारले.


“समुद्र मंथनातून आलेले हलाहल विष शंकराने कंठात धारण केले. पण त्या विषामुळे त्याच्या अंगाचा दाह होऊ लागला. त्यावर उतारा म्हणून शीतल चंद्रकोर शंकराने जटेत खोवली.


“चंद्र हा शंकराचा परम् भक्त होता. त्याने फार पूर्वी प्रभास क्षेत्री शिवाची तपश्चर्या करून, सोमनाथ नावाचे शिवमंदिर बांधले. म्हणजे पहा, इथल्या शंकराचे नावच ‘सोमाचा, चंद्राचा नाथ’ असे आहे!


“आणिक काय, तर चंद्राचे नाव ‘सोम’, तसेच शंकराला सुद्धा ‘सोम’ म्हणले आहे. ‘स + उमा’ म्हणजे उमेसह जो आहे तो ‘सोम’ म्हणजे शंकर.


“अजून एक पहा. मंगळ ग्रहाचा वार मंगळवार, बुधाचा बुधवार, तसा चंद्राचा वार सुद्धा सोमवार आहे! शंकराचा वार आहे!


“चंद्र शिवाचा भक्त आहे, तो शिवाची उपासना करतो हे तर ठीकच आहे! पण त्या देवाचे सुद्धा भक्तावर प्रेम असे की तो – भक्ताचा वार आपल्या आवडीचा वार म्हणून declare करतो! सोम, सोमनाथ, सोमसुंदर, चंद्रशेखर अशी भक्ताशी नाते जोडणारी नावे धारण करतो. इतकच काय? शीघ्र प्रसन्न होणारा आशुतोष, भोलेनाथ, महादेव आपल्या भक्ताला डोक्यावर घेऊन नाचतो!”, आबा म्हणाले.


संदर्भ - 

१. Maha Shivaratri and Winter Solstice – D K Hari

२. Archaeoastronomy in India - Subhash Kak

The Hindu: Behind China’s Hindu temples, a forgotten history - Ananth Krishnan
 

- दिपाली पाटवदकर