शत्रू देशांच्या गुप्तहेर जाळ्याला भेदण्याची गरज

    दिनांक  05-Feb-2018   
 

 

जगातील सर्वाधिक हिंसक भागात असलेले भारताचे भौगोलिक स्थान आणि जन्मत: भारतविरोधी असलेले पाकिस्तान व चीनसारखे त्याचे शेजारी, भारतातील गुप्तवार्तांकन दलांचे काम अवघड आणि अडचणीचे करून टाकतात. राष्ट्रापुढील असंख्य सुरक्षा आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी भारताच्या गुप्तवार्तांकन दले सक्षम आहेत की नाहीत, याचे नियमित आणि गंभीरतेने आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे.
 
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा कट रचण्यात आला होता. पण, सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेमुळे दहशतवाद्यांचे मनसुबे उधळून लावण्यात आले आहेत. या प्रकरणी मथुरेतून एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याच्या चौकशीत दिल्लीतील अक्षरधाम मंदिर आणि प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याचे त्याने कबूल केले आहे.
 
बंदी घालण्यात आलेल्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) या संघटनेच्या सात संशयित सदस्यांना मुंबई आणि कल्याण परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शनिवारी रात्री ही कारवाई केली.
 
गुप्तवार्तांकनातील अपयश
 
पूर्वसूचित असणे म्हणजेच पूर्वशस्त्रसज्ज असणे होय. हे एक विश्वस्वीकृत सत्य आहे. पण, दुर्दैवाने आणि सांख्यिकीयदृष्ट्या आपल्या गुप्तवार्तांकन संस्था आजवर कधीही नव्हत्या इतक्या प्रमाणात तणावाखाली असल्याचे दिसून येते. वारंवार घडणार्‍या दहशतवादी कृत्यांवरून आणि मोठ्या अपयशावरून, सक्रीय असण्याऐवजी त्या प्रतिक्रियावादी होत असल्याचे दिसते. प्रतिगुप्तवार्तांकन आणि दहशतवादविरोधी कार्यवाहींकरिता तंत्रशात्रीयदृष्ट्या गुप्तवार्तांकनातील अपयश जास्त आहेत.
 
२६ नोव्हेंबर २००८ असो की कारगिल किंवा श्रीलंका (कार्यवाही पवन), गुप्तवार्तांकन हाच देशाचा कच्चा दुवा ठरलेले आहे. काश्मीर खोर्‍यात आणि ईशान्य भारतात, जिथे आपली सुरक्षा दले वर्षानुवर्षे दहशतवादी आणि बंडखोरांचा सामना करत आहेत, तिथे तर विशेषकरून हे अपयश जाणवते. समुद्रमार्गे पश्चिम बंगाल, ओडिशा आणि आंध्र प्रदेशमध्ये येणार्‍या बांगलादेशी स्थलांतरितांचा ओघ सुरूच आहे. सुंदरबनच्या त्रिभुज प्रदेशात तस्करी हा आयुष्याचा एक भागच झालेला आहे. पश्चिम किनार्‍यावर सोन्याची, अंमली पदार्थांची आणि इतर वस्तूंची तस्करी सुरूच आहे. पण, हे सर्व थांबवण्याकरिता आवश्यक असलेले कृतीयोग्य गुप्तवार्तांकन मिळवू शकलेलो नाही.
 
‘मोसाद’ची कमाल
 
इस्रायली गुप्तहेर खाते ‘मोसाद’ने कमालच केली आहे. हजारो ज्यूंच्या कत्तलीला कारण असलेला नाझी नेता ऍडॉल्फ आईकमन हा दक्षिण अमेरिकेत अर्जेंटिनामध्ये नाव बदलून राहत होता. अत्यंत धाडसी छापा घालून ‘मोसाद’ने आईकमनला पळवलं. इस्रायलमध्ये आणलं नि त्याच्यावर खटला भरून त्याला फासावर लटकवलं. १९७६ साली पॅलेस्टाईनी अरब गनिमी संघटनेने बरेच ज्यू प्रवासी असलेलं एक विमान पळवलं. युगांडाच्या एन्टेबी विमानतळावर ते उतरवून ज्यूच्या बदल्यात इस्रायलच्या ताब्यात असलेल्या अरब अतिरेक्यांच्या सुटकेची मागणी केली. ‘मोसाद’ने एन्टेबी विमानतळावर छापा मारला व त्यांना सोडवले. इस्रायली कमांडोजपैकी फक्त एक प्रत्यक्ष कारवाईत ठार झाला. त्याचं नाव लेफ्टनंट कर्नल यॉन नेतान्याहू. सध्याचे इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचा थोरला भाऊ. ‘मोसाद’ने दुबईत एक कारवाई केली. ‘हमास’ या अरब अतिरेकी संघटनेचा एक म्होरक्या महमूदला संधी साधून गाठलं. त्याला इलेक्ट्रिक शॉक्स देऊन त्यांच्याकडून माहिती काढली. मग त्याला विषाचं इंजेक्शन दिलं आणि पसार झाले. असे यश आपल्या गुप्तहेर संस्थांना केव्हा मिळवता येईल?
 
जगातील सर्वाधिक हिंसक भागात असलेले भारताचे भौगोलिक स्थान आणि जन्मत: भारतविरोधी असलेले पाकिस्तान व चीनसारखे त्याचे शेजारी, भारतातील गुप्तवार्तांकन दलांचे काम अवघड आणि अडचणीचे करून टाकतात. राष्ट्रापुढील असंख्य सुरक्षा आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी भारताच्या गुप्तवार्तांकन दले सक्षम आहेत की नाहीत, याचे नियमित आणि गंभीरतेने आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. प्रभावी सुरक्षा मिळण्यासाठी, कृतीपात्र गुप्तवार्तांकनांची आवश्यकता असते. भारतापाशी अनेक गुप्तवार्ता दले आहेत. त्यापैकी सर्वाधिक प्रसिद्ध असलेल्या दले म्हणजे ‘रिसर्च ऍण्ड अनालिसिस विंग’ अर्थात ‘रॉ’, भारताची बाह्य-गुप्तवार्ता दल आणि ‘इंटेलिजन्स ब्युरो’ म्हणजे देशांतर्गत गुप्तवार्ता दल. जॉईंट इंटेलिजन्स कमिटी भारत सरकारची ही समिती इंटेलिजन्स ब्युरो, रिसर्च ऍण्ड अनालिसिस विंग, लष्करी गुप्तवार्ता संचालनालय, यांच्याकडून प्राप्त झालेल्या गुप्तवार्तांचे विश्लेषण करते. भारताभोवतीचे गुप्तहेरांचे जाळे (Breaking Intelligence Encirclement) भेदण्याची गरज आयएसआयने भारतविरोधी हेरगिरीचे, विध्वंसक आणि घातपाती जाळे, नेपाळ, बांगलादेश, म्यानमार, मध्यपूर्व इत्यादी भागांत विणले आहे. त्याद्वारे भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न होत आहे. ज्याचे आधारे बहुआयामी छुपा हल्ला चढवता येऊ शकेल. गुन्हेगारी जगत (अंडरवर्ल्ड), शस्त्रास्त्र तस्कर, अंमली पदार्थ मंडळी, खोट्या नोटा पसरवणारे, हवालाचालक, सीमावर्ती तस्कर इत्यादींशी संगनमत करून; भारतास अस्थिर करण्यासाठी, छुप्या युद्धाचे सामर्थ्य वाढवले जात आहे. भारताभोवतीचे हे गुप्तहेरांचे जाळे, छुप्या आक्रमक उपायांनी भेदले पाहिजे.
 
नॅशनल इंटेलिजन्स ग्रीड-(नॅटग्रीड) हाच भविष्यातला मार्ग
 
कुठलीही गुप्तवार्तांकन संस्था प्रत्येक वेळी बरोबर नसते. गुप्तवार्तांकन आणि कार्यकारी दले यामध्ये सहकार्य आणि संतुलित सहकार्य फार महत्त्वाचे असते. धोका कोणता आहे आणि शत्रूची कार्यपद्धती काय आहे? भारतीय गुप्तवार्तांकन दले प्रभावी आहेत काय? गुप्तवार्तांकनातील कमतरता काय आहेत? आणि देशाच्या सुरक्षेवर त्यांचा काय आघात होत आहे? या प्रश्नांची उत्तरे आवश्यक आहे.
 
धोक्यांना जाणून घेण्याकरिता आपण सर्वोत्तम तंत्रज्ञान वापरले पाहिजेत. महासागरी सुरक्षेकरिता भू-अवकाशीय तंत्रज्ञान वापरल्याने गुप्तवार्तांकन खूपच सुधारेल. गुप्तवार्तांकनात खासगी क्षेत्रातील सहभाग, विशेषत: खासगी आस्थापनात असणे गरजेचे आहे. आपण गुप्तवार्तांकनाची पुनर्रचना केली पाहिजे. सायबर अवकाश संरक्षित केले पाहिजे. आपले शत्रू सायबर अवकाशातही छुपे युद्ध करत आहेत. पाकिस्तानच्या छुप्या कारवायांचे आपण बळी ठरत आहोत. महासागरी क्षेत्रात आपण छुप्या कारवायांना, जशास तसे उत्तर देऊ शकतो काय? गुप्तवार्तांकन हे एक मोठेच आव्हान आहे. गुप्तवार्तांवर आधारित कुशाग्र कार्यवाही करणे; विशेषत: श्रीलंका, बांगलादेश यांच्यासोबत गुप्तवार्ता देवाणघेवाण करणे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील माहितीचे युद्ध लढणे हे या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे.
 
‘नॅटग्रीड’ हे समाकलित गुप्तवार्तांकन जाळे, भारत सरकारच्या प्रमुख गुप्तवार्तांकन दलांचा माहितीसाठा परस्परांस जोडते, ज्यामुळे सर्व समावेशक गुप्तवार्ता माहितीसाठा तयार होतो, जो गुप्तवार्तांकन दलांना उपलब्ध होत असतो. २००८ मधील मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या परिणामस्वरूप या जाळ्याची प्रस्तावना झाली होती. भारत सरकारने जुलै २०१६ मध्ये अशोक पटनाईक यांना ‘नॅटग्रीड’चे प्रमुख कार्यकारी अधिकारी नियुक्त केले होते. प्रकल्पास प्रभावी करण्याचा सरकारचा प्रयत्न म्हणून या नियुक्तीकडे पाहिले जात आहे.
 
नॅटग्रीड हा भारतातील सुरक्षा आणि गुप्तवार्तांकन यंत्रणांतील आमूलाग्र परिवर्तनाचा भाग आहे. २६/११ हल्ल्यांपूर्वी अमेरिकन लष्करचा कार्यकर्ता डेव्हिड कोलमन हेडलीने भारतास अनेकदा भेटी दिलेल्या होत्या. २६/११ रोजी ज्या ठिकाणांवर हल्ले झाले होते, त्या त्या ठिकाणांवर त्याने टेहळणीही केलेली होती. जर त्या वेळी ‘नॅटग्रीड’सारखी प्रणाली अस्तित्वात असती तर, हल्ल्यांच्या आधीच हेडली पकडला गेला असता.
 
‘नॅटग्रीड’ हे गुप्तवार्ता देवाणघेवाण घेणारे जाळे आहे. निरनिराळी दले आणि भारत सरकारच्या मंत्रालयांच्या स्वतंत्र एकल माहितीसाठ्यांना ते जोडत असते. तो दहशतवादविरोधी एक उपाय आहे. सरकारी माहितीसाठ्यातील प्रचंड माहितीचे संकलन ते करून देऊ शकते. त्यात कर-माहिती, अधिकोष-खाते-तपशील, श्रेयपत्र (क्रेडिट कार्ड) व्यवहार माहिती, पारपत्र आणि स्थलांतर नोंदी, रेल्वे व विमान प्रवासाचे तपशील इत्यादींचा समावेश होत असतो. ही संयुक्त माहिती केंद्रीय दलांना उपलब्ध करून दिली जात असते. सुरक्षा दलांनी, ‘नॅटग्रीड’ने निर्माण केलेल्या गुप्तवार्तांकन माहितीसाठ्याचा पुरेपूर वापर करून घेतला पाहिजे. त्यामुळे दहशतवाद्यांची ओळख पटवणे, त्यांना ताब्यात घेणे, त्यांच्यावर खटले चालवणे आणि त्यांची कारस्थाने निष्फळ करणे शक्य होईल.
 
अजून काय करावे?
छुपी कृती (कॉव्हर्ट ऍक्शन) हे देशाचे धोरण असले पाहिजे. आपणही अशा कार्यवाही पश्चिम बंगाल (विशेषत: सुंदरबन) आणि गुजरात, केरळातील किनार्‍यांवर दहशतवाद्यांविरुद्ध वापरल्या पाहिजेत. दहशतवादाचा सामना करत असताना आपण मानवी गुप्तवार्तांकनावर अधिक भरवसा ठेवला पाहिजे. मानवी गुप्तवार्तांकनास पर्याय नसतो. रिसर्च ऍण्ड अनालिसिस विंग, इंटेलिजन्स ब्युरो, भारतीय सैन्य हे मानवी गुप्तवार्तांकनातील अनुभवी आहेत. त्यांचे कौशल्य भारतीय नौदल व भारतीय तटरक्षक दलाकडे गेले पाहिजे.
 
राज्य आणि केंद्रीय दलांना, राष्ट्रीय गुप्तवार्तांकनाचे प्रशिक्षण देण्याकरिता तसेच सागरी व महासागरी वर्तमान धोक्यांकडे लक्ष पुरवण्याकरिता, राष्ट्रीय गुप्तवार्तांकन महाविद्यालय निर्माण करणे आदर्शवत ठरेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी; संरक्षण सहकार्य, गुप्तवार्ता आणि व्यूहरचनात्मक सहकार्य या संबंधात अनेक देशांना भेटी देऊन याबाबत करार केलेले आहेत. आता आपण सर्व आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर; दहशतवाद, तस्करी, समुद्रावरील गुन्हेगारी इत्यादींबाबतच्या गुप्तवार्ता आदानप्रदान करण्याचा मुद्दा उपस्थित केला पाहिजे.
 
उपग्रह निगराणीने, दहशतवाद्यांच्या प्रगत दूरसंचारास ऐकण्याचे सामर्थ्य असलेली ड्रोन व इतर मनुष्यविरहीत वाहने यांचा वापर वाढला पाहिजे. नेमके आणि वास्तव काळ गुप्तवार्तांकन म्हणजे दहशतवादी हल्ला कधी, कुठे आणि केव्हा होणार हे जास्त महत्त्वाचे आहे. मोजके कुशल व्यावसायिक गुप्तहेर, इतरांपेक्षा जास्त यश संपादू शकतात. आपल्याला तस्कर; शस्त्रास्त्रांच्या, दारुगोळ्याच्या, अंमली पदार्थांच्या, खोट्या नोटांच्या, अवैध स्थलांतरे घडवणार्‍या तस्करीत गुंतलेले गुन्हेगार इत्यादींबाबत गुप्तवार्तांकनाची गरज आहे.
 
सर्व किनारी जिल्ह्यांकरिता, ज्यात संशयितांची, किनार्‍यावरील धोकाप्रवण क्षेत्रांची गुप्तवार्तांकने असतील अशा गुप्तवार्तांकन संचिका तयार करण्याची आवश्यकता आहे. निरनिराळ्या दहशतवादी संघटनांच्या शाखांबाबतच्या गुप्तवार्ताही अद्ययावत राखल्या पाहिजेत. पुढील दहशतवादी हल्ला किनार्‍यावर केव्हा आणि कुठे होईल, या प्रश्नांचीही उत्तरे शोधली पाहिजेत.
 
 
 
- (नि.) ब्रि. हेमंत महाजन