खरेच का आम्ही राहिलो मराठी...?

    दिनांक  28-Feb-2018   
परवा मराठी भाषा दिन साजरा झाला. आता समाजमाध्यमांवर त्या दिवशी दणक्यात हा दिवस साजरा करण्यात आला. ‘डे असो की मग ‘दिन’असो, त्या त्या दिवशी त्याच्या प्रयोजनाची दिवाळी साजरी केली जाते. मराठी भाषा दिनाला मराठी प्रेम उफाळून आले होते. त्यात काही गैर नाही; किंबहुना त्या दिवसापुरतेतरी मराठी भाषाप्रेम जागे झाले, हेही नसे थोडके! मराठी ही किमान १० कोटी लोक बोलतात, अशी भाषा आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या १० कोटींच्या वर आहे. महाराष्ट्र हे मराठीभाषक राज्य आहे. देशातल्या मोठ्या आणि महत्त्वाच्या राज्यांपैकी हे एक राज्य आहे. चौथा क्रमांक लागतो महाराष्ट्राचा देशात. याचा अर्थ, महाराष्ट्रात सगळेच मराठी बोलतात, असे नाही. महाराष्ट्रात राहणाऱ्यापैकी ७३ टक्के लोक मराठी बोलतात. ही संख्या झपाट्याने कमी होते आहे. महाराष्ट्रात राहणारे मराठी, असा सोयिस्कर समज आम्ही करून घेत असतो. ते राजकारणासाठी असते, मतांच्या टक्क्यांसाठी असते. मात्र, त्याला उदार अंत:करणाचे शर्करावेष्टन आम्ही करत असतो.
 
महाराष्ट्रात अमराठी लोकांचा टक्का वाढतो आहे. आता त्यांनी महाराष्ट्रात राहूच नये का? देश म्हणून आम्ही सारे एकच आहोत की नाही? देशात कुणालाही, कुठेही राहण्याचा अन् व्यवसाय करण्याचा घटनादत्त अधिकार आहेच. मराठी लोकही जगाच्या पाठीवर सगळीकडे वास्तव्यास आहेतच... हे सगळे खरे असले, तरीही महाराष्ट्रात अमराठींचा टक्का वाढतो आहे, हेही तितकेच खरे आहे. मराठी माणूस जिथे कुठे आहे, ज्याही राज्यात आहे, तिथली भाषा त्याने आत्मसात केली आहे. कर्नाटकात तर तो भाषक समस्येने धगधगतो आहेच, पण तिथेही त्याच्याशी कुणी मराठीत बोलत नाहीत. त्याला तिथे राहायचे असेल, तर त्याला तिथली भाषा तातडीने अवगत करावी लागली आहे. परवा, रेल्वेत दोन तरुण मुले चढली. ती तामिळनाडूत व्यवसायानिमित्त वास्तव्यास होती. ती तामिळीतच एकमेकांशी बोलत होती. नंतर कळले, ते दोघेही सोलापूरकडचे आहेत. मराठी आहेत. मात्र, तिकडे त्यांच्याशी सुरुवातीलाही किमान हिंदीततरी संवाद साधायला कुणीही तयार नव्हते. त्यांना तिकडे जगायचे असेल, तर तामिळी भाषा शिकणे अत्यावश्यक झाले होते आणि जगणे काहीही करायला लावते...
एकुणात ते काय, १० कोटी लोक मराठी बोलतात त्यांत बृहन्महाराष्ट्रात राहणाऱ्याचाही समावेश आहे. म्हणजेच १० मधले किमान तीन कोटी लोक नियमित मराठी बोलत नाहीत. महाराष्ट्रात राहणारा मराठी, असे म्हणत असतानाच, ‘जो मराठी बोलतो तो महाराष्ट्री,’ असेही म्हटले जाते. वास्तवात महाराष्ट्रातील ७३ टक्केच लोक मराठी बोलतात. उर्वरित त्यांच्या त्यांच्या प्रांताचीच भाषा बोलतात किंवा फारच झाले, तर हिंदी बोलतात अन् मराठी माणसेही त्यांच्याशी किमान हिंदीत संवाद साधतात. खरेच मग आम्ही राहिलो का मराठी?
 
भाषा ही माती आणि संस्कृती घेऊन येत असते. भाषांतरासाठी दोन समान अर्थांचे शब्द जुळविले गेले, तरीही त्या शब्दांचा प्रकट होणारा अर्थ वेगळाच असतो. आई म्हणजे मदर, असेच होत असले, तरीही आई म्हटल्यावर आपल्या डोळ्यांसमोर जी मूर्ती उभी राहते ती मॉम किंवा मदर नक्कीच नसते! आई हा शब्द किंवा समष्टी, निखालस मराठीपण घेऊन येत असते. तसेच ते खाद्यसंस्कृतीच्या बाबतही असते. मुळात भाषा ही संस्कृतीतून उदयास येत असते. त्यानुसार क्रिया येतात आणि मग क्रियापदेही येतात. कृषी संस्कृती किंवा ग्राम संस्कृतीत अनेक क्रिया असतात आणि मग क्रियापदेही येतात. ‘सडासंमार्जन’या क्रियापदात अंगण झाडणे, गोठा साफ करणे, शेण गोळा करणे, पाणी भरणे, त्याचा सडा तयार करणे, तो टाकणे, मग रांगोळी काढणे अन् हे सारे करत असताना ओव्या, स्तोत्र गुणगुणणे, हे सारेच अनुस्यूत असते. आता त्या क्रिया लोप पावल्या आहेत, कारण आमची भाषा बदलली आहे. इंग्रजी शब्दांचा वापर वाढला आहे. वाचताना किंवा ऐकताना त्यातून मराठी शब्द वेगळे काढावे लागतात. खाद्यपदार्थांच्या कृती सांगत असतानाही- दोन ‘टी स्पून’मीठ घ्या, असे सांगण्यात येते. ‘बेक’करा, ‘सव्र्ह’करा, ‘डिश डेकोरेट’करा... असे सांगितले जाते. पुरणाची पोळी कशी करायची हे सांगत असताना- ‘‘ती दोन्ही बाजूंनी नीट ‘बेक’करा अन् त्याला ‘बटर’लावा,’’असे सांगितले तर ती पुरणाचीच पोळी असेल, पण त्यातला सांस्कृतिक गोडवा, लाघव निघून गेलेले असेल. आजकाल आम्ही अगदी निष्ठेने करत असतो. परवाच चौकात गाडी थांबली असताना एक मम्मी, तिच्या स्कूटीवर समोर उभ्या असलेल्या तिच्या चार वर्षांच्या रडणाऱ्या लेकराला अगदी पोटतिडकीने सांगत होती- ‘‘हे बघ रोहन, मी तुझ्यावर ‘इंजस्टिस’करत नाहीय्...’’ मुलांशी मुद्दाम इंग्रजीतच संभाषण करा, असे शाळावाले सांगतात अन् मुलांचे ‘करीअर’ घडावे यासाठी त्यांना इंग्रजी नीट आलेच पाहिजे म्हणून आम्ही आवर्जून त्यांच्याशी बोलताना इंग्रजीचा वापर करत असतो. आम्ही सवंगपणे आमच्या भाषेवर, संस्कृतीवर असा ‘इंजस्टिस’करत असतोच... मग आम्ही राहिलो का मराठी?
जगाच्या स्पर्धेत टिकायचे असेल, तर इंग्रजी(च) यायला हवी. त्याला पर्याय नाही, असे सांगण्यात येते. इंग्रजीच काय, कुठल्याही भाषेतील शब्द स्वीकारून आपली भाषा अधिक समृद्ध करायला काहीच हरकत नाही. ते आमच्या उदारतेचं प्रतीक आहे, पण अनुनय म्हणून इंग्रजीचं आपल्या भाषेवर अतिक्रमण गौरवणे, हे आत्मलांच्छन आहे. ती भाषक गुलामी झाली. आम्ही स्वातंत्र्यानंतर ही गुलामी त्यागू शकलो नाही. भाषेसोबत तसे विचारही येतात. खाद्य आणि पेहराव संस्कृतीही येते. लग्नात सूट घालण्याची आमची पेहराव संस्कृती नाही. जोडे घालून व्यासपीठावर चढायचे आणि मग दीप प्रज्वलनाच्या वेळी जोडे काढून ठेवायची अडचण होते. परत ते घालतानाही सायास पडतात. तेही आमचे नाही. बम्र्युडा, टी शर्ट आणि डोक्यावर हॅट हादेखील आमचा पेहराव नाही. आता मात्र आमचे ‘ग्रॅण्ड पा’तसल्या वेशात दिसू लागले आहेत. भाषेसोबत शारीरभाषाही बदलत असते. आम्ही बोलतो इंग्रजीत, मात्र आमचे हावभाव मराठीच असतात! अगदी शब्दांचे उच्चारण आणि त्यानुसार होणारे मुद्राभावही भाषेनुसार बदलत असतात. मराठी माणूस खूप हातवारे करून बोलत नाही. खांदे तर तो उडवतच नाही. मराठी माणूस जेव्हा इंग्रजी बोलायला लागतो, तेव्हा त्याचे हावभाव मराठीच असतात. देशी असतात. त्यामुळे तो विदुषक वाटू लागतो. पेहरावापासून आम्ही निखालस असे मराठीही नाही अन् मग इंग्रजीही नाही. विचित्र असे कडबोळे झालेले आहे आमचे. आमची भाषाही नीट आणि अस्खलित नाही. इंग्रजीच बोलायचे असेल, तर काहीच हरकत नाही. शुद्ध इंग्रजीच बोला. न्यूनगंडातून इंग्रजी बोलली जाते आणि मग त्यात, ‘‘युनो... ते युनो...’’असे करत आम्ही ‘युनो’चे सदस्य होत असतो! आमच्या मुलाला मराठी अजीबात कळत नाही किंवा त्याला मराठी वाचनाचा अजीबात छंद नाही, हे सांगताना कोण कौतुक दाटून आलेले असते! मौंजेचा ‘थ्रेड सिरेमनी’करताना आमचं पार हसं झालं असतं, हेही आमच्या लक्षात येत नाही. आजकाल मराठी माणूस मरत नाही, त्याची ‘डेथ’होते. भाषेनुसार आम्ही मग पेहराव, खानपान... सारेच बदलून टाकत असतो. आमचे पर्यावरण आणि भूगोलानुसार ते योग्य नसते. त्यातून मग अनेक मानसिक आणि जीवशास्त्रीय विकृती निर्माण होतात. आम्ही इंग्रजीच्या लोभामुळे मराठी जगण्याच्या पद्धतींचेही इंग्रजीकरण केले आहे. दुकानांच्या पाट्याच नाही, तर आमच्या घरांवरच्या पाट्याही आता मराठीत असत नाहीत! कुठल्याच इंग्रजाला लग्नाची पत्रिका द्यायची नसते, सारे भारतीयच आम्ही निमंत्रित करत असतो, तरीही आम्ही ‘इंग्रजी’ पत्रिका आवर्जून वेगळ्या छापून घेतच असतो. आमची संस्कृतीही, आम्ही इंग्रजाळत असताना त्यातून क्रिया आणि क्रियापदेही गहाळ होत आहेत. त्यातून आमची भाषा क्षीण होते आहे. आम्ही केवळ मराठी बोलूनच चालणार नाही, तर मराठी वागायला, वाचायला आणि विचार करायलाही लागलो पाहिजे. आमच्या मराठी चित्रपटांतही हिंदी गाणी असतात, नावे इंग्रजी असतात आणि मग त्याला मराठी प्रेक्षकही नसतात... तरीही आम्ही मराठी असल्याचा भास आम्हाला का व्हावा...?