नद्या कोकणच्या

28 Feb 2018 17:30:54



कालिदासाच्या मेघदूत या काव्यात यक्ष एका मेघाला दक्षिणेकडून उत्तरेकडे प्रवास करताना खाली काय काय दिसेल, भारतातला निसर्ग, पर्वत, नद्या कशा दिसतील याचं वर्णन करतो अशी कथा आहे. आपण कल्पना करूया की, हाच मेघ समजा कोकणच्या उत्तर किनार्‍यावरून दक्षिणेकडे प्रवास करतोय, तर त्याला कोकणातलं नदीसौंदर्य कसं दिसेल?



कोकण म्हटलं की डोळ्यासमोर येतात नजरही पोहोचणार नाही इतके अथांग, थेट क्षितिजाला भिडणारे, गर्जनेने आसमंत व्यापणारे निळेशार समुद्र. कोकण हा मुळातच पाण्याने समृद्ध प्रदेश. पूर्वेला सह्याद्री पर्वत आणि पश्चिमेला अरबी समुद्र यांच्यामध्ये वसलेल्या ७२० किलोमीटर लांबीच्या आणि सुमारे ४० ते ६० किलोमीटर रुंदीच्या या चिंचोळ्या कोकणपट्ट्यातून अनेक छोट्या-मोठ्या नद्या वाहतात. कोकण प्रदेश उत्तरेकडे रुंद असून दक्षिणेकडे अरुंद होत जातो. कोकणातल्या सगळ्या नद्या या पश्चिमवाहिनी आहेत म्हणजेच पूर्वेला सह्याद्री पर्वतात उगम पावून त्या पश्चिमेला अरबी समुद्राला मिळतात. त्यामुळे या सर्व नद्यांची लांबी कमी आहे पण सह्याद्रीच्या तीव्र उतारामुळे त्यांचा वाहण्याचा वेग जास्त आहे.



कालिदासाच्या मेघदूत या काव्यात यक्ष एका मेघाला दक्षिणेकडून उत्तरेकडे प्रवास करताना खाली काय काय दिसेल, भारतातला निसर्ग, पर्वत, नद्या कशा दिसतील याचं वर्णन करतो अशी कथा आहे. आपण कल्पना करूया की, हाच मेघ समजा कोकणच्या उत्तर किनार्‍यावरून दक्षिणेकडे प्रवास करतोय, तर त्याला कोकणातलं नदीसौंदर्य कसं दिसेल?



कोकणच्या उत्तर टोकावर, पालघर जिल्ह्यात सर्वप्रथम पाहायला मिळतं ते वैतरणा नदी खोरं. सुमारे सव्वाशे किलोमीटर लांबीची ही नदी सह्याद्री पर्वतात नाशिक जिल्ह्यात त्र्यंबक येथे उगम पावते. सूर्या, पिंजरा या वैतरणेच्या उत्तर भागातल्या उपनद्या आहेत, तर दक्षिण भागात तानसा नदी वैतारणेला येऊन मिळते. वैतरणा ही मुंबईची जलदायिनी आहे. मुंबईचा बहुतांश पाणीपुरवठा वैतरणा नदीवर बांधलेल्या मोडकसागर जलाशयातून होतो. दमणगंगा नदी सह्याद्री पर्वतात उगम पावून पालघर जिल्ह्यातून वाहत जाऊन गुजरातमध्ये प्रवेश करते.


आता थोडंसं दक्षिणेकडे आलं की वैतरणेसारखीच दुसरी प्रमुख नदी म्हणजे उल्हास नदी. रायगड जिल्ह्यातल्या राजमाची टेकड्यांवर उगम पावणारी नदी उत्तरेकडे वाहत जाऊन वसईच्या खाडीला मिळते. भातसा, काळू, मुरबाडी, पेज, बारवी, पोशीर, शिलार, भिवपुरी आदी छोट्या छोट्या नद्या उल्हास नदीला येऊन मिळतात. उल्हास नदीतून मुख्यत्वे नवी मुंबई आणि बदलापूरला पाणीपुरवठा केला जातो.


रायगड जिल्ह्यात उल्हास नदीच्या खालोखाल येते ती पाताळगंगा नदी. खंडाळ्याच्या घाटात उगम पावणारी ही नदी पश्चिम दिशेने वाहत जाऊन धरमतर खाडीला मिळते. याच नदीच्या किनार्‍यावर कर्जतजवळ मोठी औद्योगिक वसाहत आहे. पाताळगंगेसारखीच अंबा ही नदी रायगड जिल्ह्याच्या दक्षिण भागात उगम पावून उत्तरेकडे वाहत जाते आणि धरमतर खाडीला मिळते. त्यानंतर कुंडलिका ही एक उत्तर-पश्चिमवाहिनी नदी रोहा, कुडे, कोलाड असा प्रवास करत रोह्याच्या खाडीला जाऊन मिळते. रायगड जिल्ह्यातला सुप्रसिद्ध देवकुंड धबधबा तसेच भीरा जलविद्युत प्रकल्प या नदीवर आहे. रायगड जिल्ह्याच्या दक्षिण टोकाला येते ती सावित्री नदी. (जी अपघातामुळे सर्वांच्या परिचयाची आहे.) महाबळेश्वरला उगम पावलेली ही नदी रायगड जिल्ह्यात पोलादपूर, महाड, माणगाव, श्रीवर्धन असा प्रवास करत हरिहरेश्वर इथे बाणकोटच्या खाडीत अरबी समुद्राला मिळते. ही नदी म्हणजे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याची सीमारेषा आहे. काळ नदी ही सावित्रीची मुख्य उपनदी असून ती उत्तरेकडून वाहत येऊन दासगावजवळ सावित्रीला मिळते.


रत्नागिरी जिल्ह्यात उत्तर टोकाला सावित्रीला समांतर वाहते भारजा नदी. मंडणगड तालुक्यातून वाहणारी ही नदी केळशीच्या खाडीला मिळते. तिथून जसजसं खाली खाली यावं तशा रत्नागिरीतल्या दोन सुप्रसिद्ध नद्या पाहायला मिळतात त्या म्हणजे वसिष्ठी आणि शास्त्री नदी. सह्याद्री पर्वतात उगम पावलेली ही नदी चिपळूण तालुक्यातून वाहत जाऊन दाभोळच्या खाडीला मिळते. ही नदी चिपळूणची जीवनवाहिनी आहे. जगबुडी आणि कोंडजाई या दोन नद्या उत्तरेकडून खेड तालुक्यातून वाहत येऊन वसिष्ठी नदीला मिळतात. वसिष्ठी नदी खारफुटीची जंगले आणि मगरींसाठी प्रसिद्ध आहे. कोयना धरणातून सोडल्या जाणार्‍या पाण्यामुळे ही नदी बाराही महिने भरलेली असते. वसिष्ठी नदीला समांतर शास्त्री नदी संगमेश्‍वर तालुक्यातून वाहते आणि जयगडच्या खाडीला मिळते. बाव नदी ही शास्त्रीची उपनदी आहे.


आणखी दक्षिणेला आल्यावर कोकणपट्ट्याची रुंदी कमी कमी होत गेल्यामुळे नद्यांचे आकारही लहानलहान होतात. रत्नागिरी तालुक्यात भाट्ये खाडीला मिळणारी काजळी नदी आणि पूर्णगड खाडीला मिळणारी मुचकुंदी नदी या प्रमुख नद्या आहेत. अर्जुना ही राजापूर तालुक्यातली प्रमुख नदी असून ती जैतापूर खाडीला मिळते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गड नदी, कर्ली नदी, आचरा नदी, तेरेखोल नदी अशा प्रमुख नद्या आहेत. तेरेखोल नदी ही कोकणातली सर्वात दक्षिणेकडची नदी असून तेरेखोलच्या खाडीजवळ ती अरबी समुद्रास मिळते.


कोकणातल्या नद्या मळ्याच्या शेतीच्या दृष्टीने फार महत्वाच्या आहेत. नद्यांच्या किनारी गाळाची सुपीक जमीन तयार झाल्यामुळे कडधान्ये आणि भाजीपाल्याची शेती होते. सह्याद्रीच्या तीव्र उतारामुळे छोटी धरणे बांधून गुरुत्वाकर्षणाने पाणीपुरवठा करणं शक्य होतं. मात्र भारतातल्या इतर नद्यांप्रमाणेच कोकणातल्या नद्याही औद्योगिक प्रदूषणाची शिकार बनल्या आहेत. कोकणची जलश्रीमंती असणार्‍या या नद्या स्वच्छ आणि प्रवाही ठेवणं ही काळाची गरज आहे.

- हर्षद तुळपुळे
Powered By Sangraha 9.0